थळ घाट(कसारा घाट,नाशिक) ते भोर घाट(खंडाळा घाट,लोणावळा) परिसरातील घाटवाटा व किल्ले*-नवनाथ आहेर


*थळ घाट(कसारा घाट,नाशिक) ते भोर घाट(खंडाळा घाट,लोणावळा) परिसरातील घाटवाटा व किल्ले*


_______ठाणे,नाशिक व नगर या जिल्ह्यांच्या सिमा कळसूबाईच्या डोंगरांत एकीमेकींना भिडतात.कळसूबाईच्या दक्षिणेस हरिश्चंद्रगडाचे पहाड आहेत.तेथ पासून फोंडा घाटा पर्यंत सह्याद्रीच्या अत्तुच्च्य शिखरांच्या व पठारांच्या प्रदेशाला घाटमाथा म्हणतात या दरम्यान असंख्य घाटवाटा आहेत.घाटमाथ्याहून कोकणात उतरण्यासाठी ज्या घाटवाटा आहेत.त्यातील काही घाटवाटा आजही वापरात आहेत.थळ घाट(कसारा घाट),म्हाळशेज घाट,खंडाळा उर्फ भोर घाट,ताम्हिणी घाट,वरंधा घाट,बावडा घाट,फोंडा घाट असे आजही वापरात असणारे मुख्य घाट आहेत.चौल व सोपारा या प्राचिन बंदरांना जोडणारा नाणेघाट हा पुर्वीचा सर्वाधिक वापरला जाणारा घाटमार्ग होता.नाणा व गुना या दोन आधिकार्यांनी किंवा ठेकेदारांनी परस्परांशी स्पर्धा करुन दोन घाट बांधले त्यातील नाणेघाट प्रथम पुर्ण झाला म्हणून सरकार दरबारी तो प्रथम जाहिर झाला अशी दंतकथा आहे.ती खरी की खोटी यात आपण पडायच नाही मात्र नाणेघाट हा आधिक सोईस्कर आहे.मी नाशिकजवळीळ वाघेरा या किल्ल्याजवळील सत्ती घाट जो दमण व जव्हार परिसरातून नाशिक परिसरांत डोंगररांग ओलांडून वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता ते खंडाळा घाटा पर्यंतच्या परिसराची माहिती या लेखात सामिल करतो आहे.तेव्हा त्याची सुरुवात हि अंबोली घाटाजवळून जवळून केली आहे.

१)कोंकणातील डहाणू,वाडें,सोपारा,चौल या परिसरातील दळणवळण हे अनुक्रमे अंबोली घाट,अव्हाट घाट,शिर घाट,थळ घाट(आताचा कसारा घाट) या घाटांतून होत असे  हे सर्व घाट घाटमाथ्यावर नाशिक परिसरात वर चढतात.

२)कोंकणातील कल्याण व शहापूर भागातील दळणवळण हे अनुक्रमे पिंप्री(बोर घाट),तोरण घाट,मेंढ्या घाट,चेंढ्या घाट या घाटांमार्गे होत होते. हे सर्व घाट घाटमाथ्यावर 'आकोला' तालुक्यातील परिसरांत वर चढतात.

३)कोंकणातील मुरबाड परिसरातील दळणवळण हे अनुक्रमे माळसेज घाटामार्गे होत होते.हा घाट घाटमाथ्यावर 'ओतूर' परिसरात घाटमाथ्यावर चढतो.
*या परिसरात हरिश्चंद्रगडाच्या आसपास अनेक छोट्या घाटवाटा आहेत.जसे नळीची वाट,सादले(सादडे) घाट,करपदरा घाट आहेत.*

४)कोंकणातील मुरबाड व वैशाखर्यावरुन दळणवळणासाठी 'नाणेघाट' हा घाट वापरात होता.हा घाट घाटमाथ्यावर जुन्नर परिसरात वर चढतो.

५)कोंकणातील मुरबाड,पुलु -सोनावळे 'कोपोली घाट,दर्या घाट,साकुर्डी घाट,'मार्गे दळणवळण केले जात होते.हे घाट घाटमाथ्यावर घोडें,आंबेगाव परिसरात वर चढतात.

६)कोंकणातील नेरळ,पनवेल या परिसरातील दळणवळण भिमाशंकर घाटातून होत होते.हा घाट घाटमाथ्यावर खेड व कडूस परिसरांत घाटमाथ्यावर चढत होता.(याच परिसरात अहुपे घाट आहे.)

७)कोंकण परिसरातील 'कर्जत' भागातील दळणवळण हे 'कोलिंबा घाट,सावळ घाट,कुसूर घाट' या घाटांमार्गे होत असे.हे घाट घाटमाथ्यावर खेड व कडूस,आंध्रचे खोरे,नवलाख उंबरे परिसरांत वर चढतात.(या परिसरात पाली घाट, १८ नंबरची वाट, फ्यानदी घाट, नाखिंदे घाट , कौल्याची धार, वाजंत्री घाट आदी घाटही आहेत.)

८)कोंकणातील खालापूर परिसरातील दळणवळण हे कोंकण दरवाजा(राजमाची) परिसरातून होत होते.हा घाट घाटमाथ्यावर नाणें परिसरात चढतो.

९)कोंकणातील खोपोली परिसरातील दळणवळण हे 'भोर घाट' आताचा खंडाळा घाट मार्गे होत होते.हा घाट कार्ले व लोणावळें परिसरात घाटमाथ्यावर चढतो.

१०)त्याच्या पलिकडील वस्ती म्हणजे 'पेण' या परिसरातील दळणवळण हे उंबरखिंड परिसरातून होत होते.यांतील घाटवाटा या लोहगड परिसरात घाटमाथ्यावर चढत होत्या.

पुढेही वाघजाई घाट,ताम्हण घाट,लिंग्या घाट,देव घाट,कुंभा घाट,कावळ्या घाट,शेवत्या घाट,मढ्या घाट,भोपे घाट,वरंध घाट,कामथा घाट,ढवळ्या घाट,आंबेनळी उर्फ रडतोंडी घाट,हातलोट घाट,आंबोली घाट,तिवरा घाट,कुंभारली घाट,मळा घाट,कुंडी घाट,अंबा घाट,विशाळगड घाट,अणुस्कुरा घाट,बावडा घाट,फोंडा घाट,नरदावा घाट,घोटगीचा घाट,रांगणा घाट,आंबवली घाट,राम घाट,केळ घाट,तिन्नई घाट असे असंख्य घाट आहेत.
बाकी घाटवाटा पुढील लेखात कधीतरी...!

_______युरोपांतील सर्व रस्ते रोमकडे जातात असा एक वाक्प्रचार आहे तसच प्राचिन महाराष्ट्रातील बहुतांशी रस्ते हे पैठण या राजधानीकडे व तगर( महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे. त्याचे प्राचीन नाव तगर, तगरपूर वा तगरनगर होय.या बाबतीत इतिहासकारांमध्ये मत मतांतरे आहे.) या व्यापारी पेठेकडे जात होते.तात्कालीन हिंदुस्थानाच्या राजसत्तेचे केंद्र हे उत्तरेंत होते तोवर पश्चिम समुद्र किनार्यावरील भडोच(आताचे भरुच) हे बंदर भरभराटीस आले होते.सातवाहनांच्या कालखंडात राजसत्तेची केंद्रे हि काहिसी दक्षिणेकडे पैठण व नाशिक परिसरांत आली.सातवाहनांच्या काळात मुख्यत्वे सोपारा,कल्याण व चौल हि बंदरे भरभराटिस आली.कदम्ब हे सातवाहनांचे दक्षिण महाराष्ट्रातील उत्तराधिकारी होते.यांच्या काळात थोडीशी दक्षिणेकडे झुकलेली व्यापारी केंद्रे आणखी दक्षिणेकडे झुकली.राजसत्तेची केंद्रे आणखी दक्षिणेकडे गेल्याने राजमार्गाची धाव राजधानीकडे असल्याने नविन घाटवाटा,नविन राजमार्ग तयार झाले.त्यांत शिवरायांच्या काळात राजधानी राजगड(पुणे) असल्याने कोंकण प्रांतातील बहुतांशी रस्ते हे पुणे शहराकडे वहात होते.या सर्व व्यापारी मार्गांचे संरक्षणही महत्वाचे असल्याने घाटालगतच काही किल्लेही निर्माण केले गेले.निटसा अभ्यास केल्यावर लक्षात येते की ज्या ज्या मुख्य घाटवाटा वापरात होत्या त्या त्या घाटवाटांच्या तोंडावर व पायथ्याला किल्ले आहेत.सह्याद्रीतील घाटांचे नियंत्रण हे हेच घाटमाथ्याच्या पुर्वेस किंवा पश्चिमेस असलेल्या अनेक किल्ल्यांचे मुख्य कार्य होते.काही घाट खुप छोट्या आकाराचे होते.त्यामुळे त्यांचे दळण वळणाचे प्रमाणही तसेच असल्याने त्यांचे रक्षण व नियंत्रण करण्याची गरज नव्हती.म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या वा शेवटीच्या ठिकाणी किल्ल्यांची गरज नव्हती.अशा घाटवाटांच्या भोवताल किल्ले नाहित.


१)दमण,पेठ,डहाणू,जव्हार या परिसरांतील वाहतूक हि घाट,गोंडा घाट,अंबोली घाट,अव्हाट घाट या घाटांमार्गे होती यांच्या पायथ्याशी भोपटगड आहे तर घाटमाथ्यावर चढत्या मार्गावर वाघेरागड,त्रिंबकग,घारगड,हरीष,कवनाई,त्रिंगलवाडी हे किल्ले आहेत.
२)सोपारा,कल्याण व चौल भागातील वाहतूक हि
शिर घाट व थळ घाटामार्गे होती याच्या पुर्वेला जवळपास किल्ला नाही.मात्र पश्चिमेला कवनाई व त्रिंगलवाडी हे किल्ले आहेत.
३)कल्याण व शहापूर भागातील वाहतूक हि पिंप्रि,बोर घाट,तोरण घाट,मेंढ्या घाट,चेंढ्या घाट या घाटांमार्गे होती यांच्या पायथ्याला भोपटगड तर चढत्या मार्गावर बळवंतगड,अलंग कुलंग,बितनगड हे किल्ले आहेत
४)माळसेज घाटाच्या पायथ्याला किल्ला नाही पण चढत्या मार्गावर हरिश्चंद्रगड,बहिरवगड(भैरवगड) हे किल्ले आहेत.
५)नाणे घाटाच्या पायथ्याला किल्ला नाही पण घाटमाथ्यावर जीवधन,चावंड,हडसर,निमगिरी  हे किल्ले पहारा करत उभे आहेत.
*अहुपे घाटाच्या पायथ्याला मच्छींद्रगड,गोरखगड व सिद्धगड हे किल्ले आहेत.
६)नेरुळ व पनवेल या कोंकणातील वाहतूक हि भिमाशंकर घाटमार्गे होती येथे भिमाशंकर घाट आहे.या घाटाच्या पश्चिमेला कोकणात चंदेरी किल्ला आहे.
*या परिसरांत धाकोबा व दुर्ग नावाचे दोन छोटेखानी किल्लेही या सह्याद्रीतील घाटवाटांवर लक्ष ठेवत होते.
७)कर्जत परिसरातील वाहतूक कोलिंबा घाट व सावळ घाटाने होत होती त्याच्या पश्चिमेला कोथळीगड आहे.त्याचप्रमाणे भिवगड व ढाक हे किल्ले आहेत.हे किल्ले कुसूर घाटावरही नियंत्रण ठेवत असत.
८)खालापूर व खोपोली परिसरातील वाहतूक हि कोंकण दरवाजा व भोर घाट(खंडाळा घाट) यामार्गे होत होती.यांच्या पायथ्याला गोरखगड आहे तर पुर्वेला घाटमाथ्यावर राजमाची किल्ला आहे.त्याट प्रमाणे लोहगड व विसापुर हे किल्लेही या भागावर नियंत्रण करत होेते.
९)खंडाळा घाटानंतर पुढे उंबरखिंड हि घाट वाट आहे.उंबरखिंडच्या पायथ्यास किल्ला नाही परंतू पुर्वेस घाटमाथ्यावर लोहगड किल्ला आहे.

______महाराष्ट्राच्या मावळतीस म्हणजे पश्चिमेस,घाटमाथ्यालगत,सह्याद्रीच्या कुशित,पुर्वेकडील उतारांवर काही नद्यांच्या खोर्यांना मावळे व नेरे म्हणतात.नेर म्हणजे नहर,पाण्याचा प्रवाह.सह्याद्रीच्या डोंगररांगेच्या पुर्वेकडील प्रदेश,ज्यामधून नद्या वाहतात,जेथे मोठ्या प्रमाणात पाऊस असतो व मोठ्या प्रमाणावर तांदूळ पिकतो.भागाला मावळ म्हणतात.मुंबई-पुणे रस्त्यावरील कार्ले लेण्यांच्या डोंगररांगेच्या उत्तरेला आंध्रा नदीचे खोरे आहे.हि नदी भिवपुरीच्या डोंगरांत उगम पावते व पुढे राजापुरजवळ इंद्रायणी नदीला मिळते.या नदिच्या खोर्याला आंध्र-आंदर-मावळ म्हणतात.शककर्ता शालिवाहन ज्या कुळात झाला तो महावंश म्हणजे सातवाहनांचे मुलस्थान आंदर मावळात असले पाहिजे.ज्या प्रमाणे कोकणातून वर येणारे घाट व त्यावर नियंत्रण करणारे किल्ले आपण पाहिले त्याचप्रमाणे मावळांवर नियंत्रण हे ही काही किल्ल्यांचे कार्य होते.'लोहगड' किल्ल्यावरुन नाणे मावळ व आंध्र(आंदर) मावळ या प्रदेशांवर नजर ठेवण्यात येत असे.याच्या जोडीला कोकणदरवाजाचे रक्षणासाठी 'राजमाची' हा किल्ला आहे.'तुंग,तिकोणा व कोरी' या गडांची हुकूमत पवनमावळावर आसून मुसे,मुठे व खेडे बारे या खोर्यांवर 'सिंहगड' नजर ठेवून आहे.तोरणा किल्ला हा गुंजण, कानद व वेळवंड खोर्यावर नजर ठेवून आहे.नंतरच्या काळात महाराजांनी तोरण्याच्या जोडीला 'राजगड' किल्ला बांधला.हिरडस मावळ व रोहिड खोरे या प्रदेशांवर रोहिडा उर्फ विचित्रगड या किल्ल्यांचा आधिकार होता.अशा बारा मावळे हि कोणत्या ना कोणत्या किल्ल्याच्या आधिन होती.विस्तार भयास्तव मी सर्व मावळांची माहिती देणे टाळतो आहे.
_________महाराष्ट्र हे जे सांस्कृतिक नाव आहे या नावामागे अनेक महावंशांचा इतिहास उभा आहे.ज्या ज्या ठिकाणी लढाया झाल्या,धारातिर्थे घडली त्या त्या ठिकाणी त्या महाकृत्यांची स्मारके आजही उभी आहेत.महाराष्ट्र केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर अटक पासून मद्रासपर्यंत व काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत आजूनही आमच्या विजयांची चिन्हे अस्तित्वात आहेत.भारतावर राजकीय व सांस्कृतिक परचक्रे आली तेव्हां तेव्हां त्याचे निर्मुलन व निवारण करण्यासाठी महाराष्ट्रच उभा राहिला आहे.शकोत्तर नाही तर शकपुर्व काळापासून हि महाराष्ट्राची परंपरा आहे.स्वातंत्र्यलक्ष्मीची पुजा महाराष्ट्राइतक्या एकनिष्ठतेने हिंदुस्थानातील दुसर्या कोणत्याही प्रदेशाने केलेली नाही.ग्रिक,शक व क्षत्रप हे तर परकीयच होते यांच्यासोबत खारवेल व हर्षवर्धन सारख्या आपल्याच स्वकीयांच्याही आक्रमणाला महाराष्ट्राने धिराने तोंड दिले आहे.तात्कालिन काळात स्वदेश,स्वधर्म व स्वातंत्र्य या नावाने परकियांच्या विरुद्ध ज्या ज्या उठावण्या झाल्या त्या सर्वांचा उद्गाता महाराष्ट्रच होय.भारतीयांच्या पापक्षालनासाठी महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांनींत रक्ताचं अर्ध्य या भारत भूमीला वाहिले हाच आमचा इतिहास आहे.तो  उदंड आहे,प्रेरणदायी आहे.       

"हि सर्व प्रेरणा देणारा,हि वृत्ती व निष्ठा अंगी भिनवणारा.आमच्या मनामनांत सहिष्णुतेचा पोत पाजळवणारा!परकिय आक्रमणं व अन्यायाच्या विरुद्ध मनातील शक्तीचे रुपांतरण  तलवारीत करणारा आमचा धगधगता प्रेरणास्त्रोत आपल्या पाठीशी उभा आहे.तोच आपल्या स्वातंत्र्याचे व शक्ती,निष्ठेचे 'अधिष्ठान' आहे तो म्हणजे माय बाप सह्याद्री.त्याच्याशी आपण मनाने 'इमानीच' राहिले पाहिजे.!"

(टिप-चुकभूल देणे घेणे.लेखात सर्वच घाटांची नावे देता आलेली नाहीत.जे जे मुख्य घाट वापरात होते.त्यांचाच विचार या लेखात केलेला आहे.)

धन्यवाद.....!

संदर्भ-
सह्याद्री 
-स.आ. जोगळेकर 

संकलन-
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी