सह्याद्रीनामा
सह्याद्री-
धन्वदुर्गं महीदुर्गम् अब्दुर्गं वार्क्षम् एव वा।
नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत् पुरम् ॥
सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्गं समाश्रयेत्।
एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गं विशिष्यते ॥
(मनुस्मृति ७.७०–७१)
"धनुदुर्ग(सभोंवार वीस कोसा पर्यंत उदकरहित प्रदेशांने युक्त असलेला दुर्ग),महीदुर्ग(बारा हातांहून उंच,युद्धार्थ वरुन फिरतां येईल एवढा रुंद व आणि आवरणयुक्त दुर्ग,अब्दुर्ग(जलाने परिवेष्टित असा दुर्ग),वार्क्ष दुर्ग(तटाबाहेर चार कोसपर्यंत मोठमोठे वृक्ष,कांटेरी झाडें व जाळ्या यांनी व्याप्त असलेला दुर्गं),नृदुर्ग(हत्ती,घोडे,रथ व पायदळ यांनी रक्षित असा दुर्ग)आणि गिरिदुर्ग (ज्यावर चढण्यास एकच मार्ग आहे,ज्यावर जलसंचय,वृक्ष व धान्य निर्माण करणारी क्षेत्रे आहेत असा दुर्ग)यापैंकी कोणत्या तरी एका दुर्गाचा आश्रय करुन नगर रचावें.या सर्व दुर्गांत अनेक गुणयुक्त असलेला गिरिदुर्ग प्रश्स्त आहे.यास्तव प्रयत्नेकरुन त्याचा आश्रय करावा."
_____गिरिदुर्गांचे ठायीं देवादिकांचा निवास असतो.गिरीशिखरांवर देवादिकांची स्थाने असतात अशी सर्वसाधारण समजूत असल्यामुळे मनूने उद्गार काढले आहेत की,गिरिदुर्गीवर होणार्या निर्वाणीच्या संघर्षात आत्मयद्न करुन देवलोकीं अढळपद मिळविणार्या वीरांना अनुलक्षून त्यानें हें वैशिष्ट नमूद केले आहे की काय कोण जाणे.
गड व दुर्ग हीं सघर्षाचीं प्रतिकें.दुर्ग हें शस्त्रसज्ज आराधनेचे आसन.भवानी ही स्वातंत्र्याची अधिष्ठात्री देवता.दुर्ग हें स्वातंत्र्य लक्ष्मीचे यद्नकुंड.तरवारीचे खणखणाटात आणि तोफांचे धडधडाट,रणवाद्यांच्या मैफिलींत दुर्गांची वास्तुशांति व्हावी लागते.आत्मार्पणाची अहमहमिका व मर्दुमकीची शर्थ यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते.महाराष्ट्रातील किल्ल्यांनी स्वातंत्र्यलक्षमीची पुजा अनेक वेळा हरप्रकारच्या साहित्याने केली आहे.
______हिमालय हा निवृत्तीप्रधान आहे आणि सह्याद्री हा प्रवृत्तीप्रधान.हिमालय हि देवभूमी आहे तर सह्याद्री ही वीरभूमी आहे.आक्रमकांपासून बचाव करण्यासाठी आणि शत्रुंचा निप:त करण्यांकरिंता उठावणी करण्यासाठी सह्याद्रीसारखी सोयीची पर्वतश्रेणी नाही.गैरमाहितगाराला दुर्गम व धोक्याची आणि माहितगाराला सुगम व बिनधोक.स्वत: सह्याद्री हा मैदानी लोकवस्तीपासून दूर आहे आणि ही मैदाने त्यांच्या टप्प्यांतही आहेत.पदचारी व अश्वारुढ सैन्यांच्या काळांत या किल्ल्यांत मुक्काम ठेवून बंदोबस्ताने राहता येत असे आणि सभोवतालच्या मुलखांत शत्रूच्या छावण्या पडल्या तरी त्यावर अग्निवर्षाव करुन किंवा छापे घालून त्यांचा परामर्ष घेतां येत असे.या दृष्टीने विशेष सोयीचे असे फक्त दोन पर्वत हिंदुस्थानात आहेत:अरवली व सह्याद्री.म्हणूनच दुर्गनिर्मितीचे तंत्र येथे अनेक वैशिष्ट्यांसह पराकोटिला पोहोचलेले होते.
_____मध्ययुगीन राज्यकर्त्यांच्या राजधान्याही डोंगरी किल्ल्यांवरच असत,सम्राटांच्या आणि सामन्तांच्याही,चंद्रादित्यपुर(चांदूर)ही राजधानी राष्ट्रकूटांची,वातापिपुर (बादामी)ही राजधानी चालुक्यांची आणि देवगिरी दौलताबाद ही यादवांची.त्याचप्रमाणे पन्हाळा ही राजधानी सामन्त शिलाहारांची.राजधानी हे संघर्षाचे अंतिम केंद्र असल्यामुळे हे किल्ले उद्धस्त झालेले आहेत;तरी येथील अवशेषांवरुनही त्यांचे महत्व अनुमानतां येते.हे सर्व किल्ले मैदानांलगत आहेत.सर्वस्वीं डोंगरी अशा राजधानी फक्त मराठ्यांची ती म्हणजे रायगड.
माहिती साभार-
सह्याद्री
-स. आ. जोगळेकर
संकलन
-नवनाथ आहेर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा