किल्ले सोनगड(सोनगढ दुर्ग)नवापूर महाराष्ट्र गुजरात बॉर्डर-नवनाथ आहेर
*मराठ्याच्या पाऊलखुणा जपणारा सोनगड(सोनगढ दुर्ग) *
(नवापूर महाराष्ट्र गुजरात बॉर्डर,सोनगड)
______महाराष्ट्रात सोनगड नावाचे मला माहीत असलेले ३ किल्ले आहेत.एक म्हणजे सर्वांना माहित असलेला रायगडजवळील महाडच्या वाटेवरचा चांभारगडजवळील सोनगड, दुसरा सिन्नर ठाणगाव मार्गाजवळील सोनेवाडी गावाच्या बाजूला खंडोबाचे देवस्थान असलेला सोनगड व तिसरा म्हणजे गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरील नवापुर जवळील सोनगड.कामाच्या निमित्ताने महिन्यातून गुजरातला जाणे होतेच होते.नवापुर बॉर्डर क्रॉस केल्यावर थोडे पुढे गेले की सुरत कडे जाताना उजव्या रस्त्याला एका डोंगरावर भगवा झेंडा भडकताना दिसायचा.सह्याद्री भटकंतीचा अनुभव असल्याने लक्षात येत होते की येथे किल्ला आहे मात्र कोणता? किल्लाच आहे की एखादे मंदिर आहे हे मात्र माहीत नव्हते.मागिल वर्षी शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर बडौद्याला निघालो असताना बॉर्डरजवळ मुक्काम करण्याची वेळ पडली.मग मात्र या सोनगड गावात जायचा योग आला.काही दिवसांनी शिवजयंती होती तिथे मुख्य रस्त्याच्या आत एक महाराजांचा पुतळा आहे तेथे शिवजयंतीची तयारी चालू होती.स्थानिकांना विचारले तेव्हा असे समजले की त्या दुरुन पाहिलेल्या डोंगरावर किल्ला आहे.तेथील किल्ल्यामुळेच गावाचे नावही सोनगड आहे अशी माहीती मिळाली.मी एकट्यानेच किल्ल्यावर जायचे ठरविले त्यावेळी काहीतरी सायंकाळचे साडेसहा झाले होते.मी रस्ता शोधत शोधत गेलो.रस्ता मिळला थोडेफार अंतर चालून गेल्यावर वाटू लागले की आपले काहीतरी चुकतेय.
पुर्णत: नविन वाट, किल्ल्याबद्दल काही माहिती नाही, त्यात अंधार पडायला लागला होता.तसाच माघारी फिरलो.त्याच्यानंतर सोनगडाबद्दल माहीती मिळवली हा किल्ला गायकवाड घराण्याने बांधला अशी नेटवर थोडकी माहीती मिळाली.पुढे मागे कित्येकदा त्याच रस्त्याहून जाणे झाले.कधी उन्हाळ्यात, कधी पाऊसाळ्यात तर कधी हिवाळयात प्रत्येकवेळी तो 'सोनगड' मला खुणवत होता.त्यावर भडकणारा भगवा झेंडा मनास उभारी देत होता.
_______आता मध्यंतरी किल्ले सुधागडची माहीती शोधत असताना 'गायकवाड घराण्याची कैफियत' हाती आली.आता ही कैफीयत कीती विश्वसनिय आहे हि साधनचिकित्सा मी येेथे करत नाही.पण एखादी गोष्ट आपल्याला अनभिज्ञ असावी व त्याबाबत कालांतराने काही नोंदी मिळाव्यात हा आनंद काहीसा सुखवणारा आहे.गायकवाड घराण्याच्या कैफीयतीबाबत बोलायचे झाले तर पेशवाईतील गुजराथ सुभ्याचे अधिपती गायकवाड घराण्याची माहीती देणारी हि कैफीयत आहे.हि बखर इ. स. १८१२ ते १८१९ या कालखंडात लिहीली गेली आहे.लेखक नमूद करतो की इंग्रजांना आपली हकीकत कळवून तिची नक्कल गायकवाडांनी आणली,त्यावरुन ही नकल करुन घेतलेली आहे.यात मुख्यत: गायकवाडांनी आपला अंम्मल गुजरातमध्ये कसा चालविला याची माहीती आहे. तर सोनगडाबबाबतचा फक्त काही उल्ले़ख मी या ठिकाणी देत आहे.
______________________________________
गायकवाड यांणी आपली हकीगत साहेब लोकांस लिहून त्याची नक्कल लिहून आणली त्याजवरुन बाडावर लिहिलें असे.
हकीगत स्वस्तीश्री राजा छत्रपति संस्थान सातारा यांणी दाभाडे यांस सेनापति व सेनाखासखेल दोन पदें देऊन गुजराथ वगैरे मुलुख सरंजामास नेमून दिला.त्यांच्याजवळ पिलाजी गायकवाड चाकरीस होते.त्यांचे शहाणपण जाणून सेनापतिं यांणी खासपागेचीं रोड घोडीं चाळीस पन्नास पिलाजी राव यांना सोेंपली.तीं घोडीं घऊन नवापूर परगणा व नारायणपूर येथें काही दिवस राहून ताजी केलीं.ती तयार झाल्यावर घोडी घऊन तळेगावास येऊन सेनापतींस दाखविलीं.त्याजवर सेनापति बहुत प्रसन्न जहाले.नंतर दोन तीनशें घोडी स्वाधीन केली तीं घेऊन, नवापूर परगण्यांत आणून, काहीं जमावांनी सुरत प्रांतात स्वारी करुन,माळवा नक्त संपादन करुन,घोडी त यार करुन, लोक जमविले होते त्यांस खर्चास देऊन, राजी राखून, काही ऐवज शिल्लक राहिला तो घेऊन,पुन्हा तळेगावास जाऊन घोडी दाखविलीं.व शिल्लक ऐवज तो ही सेनापतींस दिला.त्याजवरुन त्या घोड्यांची पागा सजवून सेनापति यांनी पिलाजी बावास पागेची सनद करुन देऊन घोडीं पागा सोंपली.आणि नवापूरी रहावे अशी आज्ञा जाहली.तेव्हां बांडे यांजकडे ते ठाणे होते.ते आपल्याकडून जाते असे समजोन सेनापतींस बांडे यांणी गैरवाका समजावून जागा देऊं दिल्ही नाहीं.मग पिलाजीराव यांणी विनंती केली की, "नवापुरापुढें दहा कोश बिकट अरण्य मवा़शी भिल्लांची जागा डोंगर आहे तेथे रहावयास आज्ञा द्यावी.तेथें राहून वस्ती करुन सरकार चाकरी बजावूं."
त्यांजवरुन त्यांची उमेद पाहून, सरकार उपयोग ध्यानांत आणून, दोन पागा दुसर्या तैनातीस नेमून देऊन, जागाही रहावयास नेमून देऊन रवाना केले.त्या समयीस दत्ताजीपंत शिवणेकर यांस कारभारी नेमून दिल्हे.व आज्ञा केली कीं,"बांडे व पोवार व तुम्ही त्रिवर्ग एकत्र होऊन गुजराथींत अंमल बसवून नक्षा राखावा." ती आज्ञा शिरसावंदून पिलाजीराव येऊन आबादीस प्रारंभ करुन छावणीस राहिले.बांडे व पोवार नवापूर व विसरवाडीस होते.त्यांजलाही अंमल बसविणेंविशीं पुर्वी आज्ञा सेनापतींनी केली होती.परंतु त्यांच्याने कजाखी होऊन आज्ञेप्रमाणें न घडलें म्हणोन पिलाजी बाबाची कर्तुत्वाची उमेद चाकरीविशीं पाहून आज्ञा होऊन वस्त्रें दिल्यावरुन नवापुरापुढें दहा कोश अरण्य जागा कायम करुन छावणी केली.
ठाणें जमवावें या मनसब्यानें डोंगरी पाहून किल्ला बांधून सोनगड नांव ठेविलें."
______________________________________पुढे सुरत,बडौदा, अहमदाबाद या ठिकाणांवर गायकवाड घराणे व मराठ्यांनी कसा आपला अमल चालविला कशाप्रकारे राज्य केले आदी माहीती या बखरीमध्ये आहे.एकूणच काय तर भूगोल माहीती असेल तर तेथील इतिहास आपल्याला अनुभवताही येतो.अनेक राज्यांत फिरत असताना भूगोल माहीती असल्या कारणाने तेथील इतिहासही लक्षात येतो.जेव्हा त्या त्या राज्यात जातो तेव्हा अभिमान वाटतो की तात्कालीन काळात येथे मराठ्यांच्या पाऊलखुणा आहेत.हां येथे आपल्या पुर्वजांनी भगवा भडकवला होता.मग तो काळ प्राचिन असो वा शिवकाळ असो.अशी खुप राज्ये आहेत.असो.
"इतिहासाला भूगोलाची सांगड महत्वाची...!"
धन्यवाद...!
संदर्भ-
गायकवांडांची कैफियत
संपादक-अविनाश सोवनी
संकलन-
नवनाथ आहेर
फोटो-
एक मी काढलेला बाकी इंटरनेटवरुन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा