गडकिल्ल्यांचे कालमापन व तर्क
*गडकिल्ल्यांचे कालमापन तर्क वितर्क*
_______आपण सर्वचजण सह्याद्रीत भटकत असताना अनेक असे किल्ले पाहतो की ज्या किल्ल्यांच्या वास्तू पुर्णत: नामशेष झालेल्या आहेत.काही किल्ल्यांवर वास्तूंचे चौथरे शिल्लक आहेत मात्र ते ही मातीत गाडले गेले आहेत.तर काही किल्ल्यांवरील इमारतींच्या निदान भिंती तरी शिल्लक आहेत असे आपल्याला दिसते.मग,आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की या किल्ल्याचा नक्की कालखंड कुठला असेल बरं?त्या अनुषंगाने आपण पुस्तकांचा वा हल्ली नेटचा आधार घेतो मात्र बहुतांशी किल्ल्यांचा बांधकामाचा काळ हा निश्चितपणे सांगता येत नाही.पुस्तकांमध्येही काही उल्लेख आपल्याला आढळत नाहीत.मात्र एक आहे की किल्ल्यांच्या स्थानांवरुन आणि त्यांच्या बांधकामाच्या पद्धतीवरुन त्यांच्या कालमापनाबद्दल काही निष्कर्ष निघू शकतील असा एक विश्वास वाटतो.परंतु इथेही एक अडचण आहे की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घराण्यांच्या काळात बहुतांशी किल्ल्यांची खुप वेळा डागडुजी झाल्या कारणाने बांधकामाच्या स्ट्रक्चरहून किल्ल्याचे कालमापन करनेही अवघडच आहे.
एक परदेशी प्रवासी सातवाहनांच्या सामर्थ्याचे वर्णन करताना म्हणतो की,
'आंध्र सातवाहनांच्या प्रदेशांत तटबंधी असलेली तीस शहरे होती.'
ती तीस शहरे नक्की कोणती याचा काही शोध लागलेला आहे.या प्रवाशाचा काळ हा पहिल्या शतकातील आहे.पहिल्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत सातवाहनांचे साम्राज्य हे केवळ मध्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत होते.यावरुन असा निष्कर्ष काढता येतो की हा निष्कर्ष काढता येतो की प्लिनीने उल्लेख केलेली हि ठाणी वा शहरे ही महाराष्ट्रातीलच असली पाहिजेत.याच शतकात इतर प्रवाशांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्यात काही बंदरांचे उल्लेख आहेत त्यातील काही बंदरांची ओळख पटलेली देखील आहे.त्यातील
१)मन्दगोर म्हणजे बाणकोट(मन्दारगिरि)
२)मलिझगर म्हणजे जयगड किंवा राजापूर(मलयगिरि)
३)बायझँटिओन म्हणजे विजयदुर्ग
मात्र या स्थानांचा उल्लेख परदेशी प्रवाशांनी व्यापारी बंदरे म्हणून केलेला आहे,जलदूर्ग म्हणून उल्लेख केलेला नाही.सातवाहनांनंतर महाराष्ट्रात अभीर, त्रैकूटक,वाकाटक,चालूक्य, राष्ट्रकूट, यादव वगैरे सम्राट घराण्यांच्या सत्ता होऊन गेल्या आणि कदम्ब, शिलाहार वगैरे सामन्त घराण्यांच्या सत्ताही होऊन गेल्या या सम्राटांच्या वा सांमन्ताच्या कालखंडातील श्रीमंत व धनाढ्य लोकांनी अनेक चांगली कार्ये केली आहेत.त्या त्या कार्यांना अनुसरून वा त्या कतृत्वाबद्दल काही शिलालेख वा दानपत्रे खोदून ठेवलेली आहेत.या कालखंडात त्या त्या राज्यकर्त्यांनी आपापल्या राज्याच्या संरक्षणार्थ काही ना काही उपाययोजना या केलेल्या असल्याच पाहिजेत हि शक्यता नाकारता येत नाही.त्यात जागोजाग छावण्या, गढ्या, किल्ले, जंजिरे उभारलेले असले पाहिजेत.पण,कोणता किल्ला व गढी कोणत्या काळात बांधले याचा तपशिल मात्र नाही.आपण जर अजिंठ्यातील लेणी पाहिली तर त्यांतील शिलालेखांतील राजांची नावे हि मुद्दामहून खोडलेली आहेत त्यावरुन वाटते की कदाचित शत्रूपक्षाने हेतूपरस्पर हे शिलालेख तोडून टाकले असावेत.
_______महाराष्ट्रात ज्या लेण्या खोदल्या आहेत त्या लेण्यांची स्थाने भारताच्या नकाशावर घेऊन जर रेषांनी यांच्या स्थानांना जोडले तर आपल्याला त्या काळातील माल वाहतुकीचे मार्ग निश्चित करता येतात.लेणी किंवा मंदिरे हि धर्मकार्ये आहेत मात्र ही धर्मकार्ये आडबाजूला असण्याची शक्यता नाही तर ते वाहतुकीच्या मार्गावरच असायला हवीत/आहेत
.व्यापारी व रहदारी वाहतुकीसाठीं त्या काळी घाट अस्तित्वात होते हे या लेण्यांच्या स्थानांवरुन आपल्याला निश्चित करता येते.घाटातून होणार्या वाहतूक नियंत्रणासाठी व सशस्त्र आक्रमकांना अटकाव करण्यासाठी त्याकाळांत डोंगरी छावण्यांची तरी योजना अंमलात आणली गेली असली पाहिजे हे तरी नक्की आहे आणि या ज्या छावण्या होत्या त्या या लेण्यांच्या आसपासच असल्या पाहिजेत.काही शिलालेखांत नाशिक येथे गोवर्धनला सातवाहनांची सैन्यांची छावणी होती असे उल्लेख अढळतात.यावरुन असा ढोबळ निष्कर्ष काढता येतो की ज्या किल्ल्यांच्या कड्यांमध्ये किंवा त्या किल्ल्याच्या परिसरात ज्या लेणी खोदल्या आहेत ते किल्ले या लेण्यांना समकालीन असले पाहिजेत.अर्थात हा फक्त तर्क आहे याला थोड्या आधीक प्रमाणात भुगोलाची जोड आहे इतकच.....!
बदामी हि प्राचीन चालुक्यांची राजधानी होती येथे ज्या कड्यांत लेण्या आहेत तेथेच बदामीचा उध्वस्त दुर्ग आहे येथे चालुक्य व पल्लवांचा संघर्ष झाला.यावरुन हा किल्ला निदान सहाव्या शतकातील असावा असे दिसते.सातव्या शतकाच्या सुरुवातीला पुलकेशि चालुक्यांनी कोकणच्या मौर्यांची पुरी हि राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऐहोळ या कर्नाटकातील शिलालेखांत केलेला आहे.
'पुरी ही पश्चिम समुद्राची लक्ष्मी;मत्त गजांच्या गंडस्थलांप्रमाणे आकार असलेल्या शेकडों नावांच्या सह्याने पुलकेशीनें पुरीला वेढा घातला....!'
असा उल्लेख तेथील शिलालेखांत आहे.अर्थात हि पुरी राजधानी नक्की कोणती याबाबत मतभेद आहेत.सर्वसाधारणपणे हि घारापुरी(घेरापुरी) असावी असा एक मतप्रवाह आहे. येथे आता प्राचीन तटबंधीचे अवशेष काही अढळत नाहीत मात्र तेथे एखादा जंजिरा असावा असा एक तर्क नाकारता येत नाही.तिसरा गोविंद राष्ट्रकूट यांनी चांदूर डोंगररांगेतील मार्कंड गडावरुन काढलेला सन८०८ चा ताम्रपट अलिकडे प्रसिद्ध झाला आहे.त्यांत त्याने या किल्ल्याचा उल्लेख मयूरखंडी या नावाने केलेला आहे.खुद्द चांदूरचा किल्ला हा दृढप्रहार यादवांनी निर्माण केल्याचा एक संभव वाटतो.येथेच त्यांची राजधनीही होती.लेणीं खोदण्याची प्रथा ही सातवाहनांपासून राष्ट्रकुटांपर्यंत चालू होती.मंदिरे उभारण्याची प्रथा हि चालुक्य व यादव यांच्या कालखंडात सुरु झाली.शिल्पशास्त्रांतील हि क्रांती लक्षात घेता दगडी दुर्ग उभारण्याची प्रथा सार्वत्रिक चालू झाली असावी असा एक तर्क या ठिकाणी करता येऊ शकतो.पुर्वीच्या कालखंडात वीरांच्या स्मरणार्थ ज्या स्मारकशीळा अर्थात वीरगळ उभारल्या जात असत.या वीरगळींचे अनेक प्रकार महाराष्ट्रात आहेत.त्यामध्ये किल्ल्याचे संरक्षण करत असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ तटबंधी दर्शविलेल्या वीरगळही आपणास अढळतात.पण दुर्दैव हे की आपल्याला या वीरगळांचे कालमापनही करता आलेले नाही.पण लेण्या,किल्ले व वीरगळ यांच्या कालमापनाहून एकमेकांच्या कालमापनाचा अस्पष्टसा आदमास आपल्याला येऊ शकेल अशी आशा वाटते.यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.सुरुवातीच्या कालखंडात अगदीच भरभक्कम तटबंधीने वेढलेले,परकीय शत्रूंपासून संरक्षण होण्यासाठी अनेक विविध प्रकारच्या युक्त्या जरी वापरलेल्या नसतील तरी साधारणपणे दगडाच्या तात्पुरत्या स्वरुपाची तटबंधी असणार्या छावण्यांस्वरुप गडकोटांचे असलेले अस्तित्व मात्र नाकारता येत नाही.
_______या सोबतच माझी सर्व सह्याद्रीप्रेमींस विनंती आहे की सातवाहनां पासून ते १९४७ म्हणजे भारत स्वातंत्र्य होई पर्यंतच्या इतिहासाच्या सनावळ्या ढोबळरीत्या लिहून घेऊन त्या अगदी पाठ करुन ठेवाव्यात.म्हणजे मग महाराष्ट्राच्या इतिहासाचा आदमास पटकन येतो.
धन्यवाद...!
#सह्याद्री
संदर्भ-
प्राचिन भारताचा इतिहास
-रं. ना.गायकवाड
महाराष्ट्रातील शिलालेख व ताम्रपट
-स..मो.ग.दिक्षित
*महाराष्ट्र स्त्रोत्र सह्याद्री
-स.आ.जोगळेकर
*प्राचिन मराठी कोरीव लेख
-शं. गो. तळपुळे
*शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरिव लेख
-महामहोपाध्याय वासुदेव विष्णु मिराशी
(विदर्भ संशोधन मंडळ नागपूर)
*महाराष्ट्रातील पुरातत्व
-हसमुख धीरजलाल सांकलिया
-मधुकर श्रीपाद माटे
(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ)
*डॉ.श्रीनंद बापट यांचे Ancient Maharastra या विषयावरील समग्र व्याख्यान..
(हे व्याख्यान यु ट्युबवर उपलब्ध आहे.सर्वांनी ऐकावे)
संकलन-
नवनाथ आहेर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा