किल्ले फोंडा व रणसंग्राम-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
किल्ले 'फोंडा'
ऐतिहासिक साधनांतून
भाग -१
_______५ ते १० जानेवारी १६६४ साली पहिल्यांदा महाराजांनी सुरत हे समृद्ध शहर लुटलं...
लक्ष्मी स्वराज्यात आली.सुरतेहून आल्यापासून महाराज राजगडावरच होते.राजगडाच्या इशान्येस अवघ्या चार पाच कोसांवर गेल्या दोन तीन महिन्यापासून सारख्या तोफा बंदुकांचा धडाका उडत होता.शाईस्तेखानाने पुण्याहून जाताना एका महशूर राजपूतास मागे ठेवले होते.त्याचे नाव. होते जसवंतसिंह राठोड.जसवंतसिंग राठोड याने पाऊसाळा संपल्यावर किल्ले कोंढाण्यावर हल्ला केला. मराठ्यांनी त्याला चांगलाच ठोकला,त्याचा व त्याच्या सेनाचा पार धुव्वा उडवला.
तो कायमचा निघून गेला.त्यानंतर लगेच महाराजांनी नेतोजी पालकरांना मोंगली मुलखांत पाठवले.स्वत: महाराज अहमदनगर प्रांतात घुसले अहमदनगर लुटले.पार औरंगाबादेपर्यंत धडक मारली.महाराजांच्या या तुफान वधुमसान,घमासान मोहीमा मोंगली सरदारांना सोसवत नव्हत्या.मोंगलांशी या लढाया चालू असतानाच आदिलशाही खवासखान दक्षिण कोकणांत उतरल्याची बातमी महाराजांस मिळाली.
महाराज एकदम मुधोळवर चालून गेले.पोहोचले मुधोळांत कोण होता तिथे? बाजी घोरपडा होता दगाबाज तो.महाराजांना भयंकर चिड होती.महाराज खासा भवानी घेऊन बाजी घोरपड्यावरच चालुन गेले.बाजीही लढू लागला त्यातच महाराजांच्या निष्ठावंत इमानी भवानीचा एक वार खाडकन बाजी घोरपड्यावर पडला व बाजीची शेवटची घटका डळमळली.त्याच्या रक्ताने महाराजांची भवाना लाल झाली.बेईमानांचे रक्त पिऊन ती संतुष्ट झाली होती.महाराजांनी बाजी घोरपडेचा राहता वाडा जाळून टाकला नामोनिशान मिटवून टाकले.बेईमान असेच ठोकायचे असतात हे इतिहासाने आम्हाला शिकविले आहे.
______________________________
*एक पत्र
शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र-१०४१
"खवासखान विजापूराहून फौजेसुद्धा रवाना जाहले.त्याची हरोळी बाजी ह्याणी व लखम सावंत व खेम सावंत ह्याणी प्रतिद्नापुर्वक जतन करुन सेनासमवेत निघाले.ते तिकडे येत आहेत....त्यास बाजी घोरपडे पुढें मुधोळास घरीं कांही जमेतीनसी आले.हें कळताच फौजेनसी आम्ही तेच क्षण स्वारी केली.त्याचा प्रांत लुटून तळपट करुन ठाणियास जेरदस्तीत आणिले.हें जाणोन त्यांणीं सर्व जमेतीनसी लढाईस निघाले.युद्ध तारफेचें जाहलें.बाजी मारिले व कितेक खासे लोक पडले.ह्या प्रकारे तो प्रसंग करुन लुटून फस्त केले.मत्ता बहूत लागली.पुन्हा आपलेसे करुन मुधोळ पंचमहाल आपलासा करुन स्थापिले."
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रं-२८०४
दिनांक-३० नोव्हेंबर १६६४
एक डच व्यापारी आपल्या आधिकार्याला लिहीतो-
"खवासखानाच्या सैन्यास पोचविण्यासाठी कॅपटन घोरपडे ह्याच्या ताब्यांत विजापूरच्या राजानें जी रोकड रक्कम दिली होती तिच्यीवर बालेघाटांत अकस्मात हल्ला करुन व इतर काहीं जहाजें लुटून शिवाजीराजांनी लूट मिळविली,ती ८ लाख होन असावी असा अंदाज आहे आणि खुष्किच्या मार्गाने त्यांनी ह्या शिवाय २० लाखांचा माल लुबाडला असावा.कॅपटन घोरपडे ह्याला त्या बंडखोर शिवाजीराजांनी आकस्मात गांठून त्याच्यावर जो विजय मिळविला तो विजय खवासखानिच्या कल्पनेपेक्षां फार निराळ्या प्रकारचा आहे,कारण घोरपडे एक उत्तम सेनापतींपैकी होता.त्याला इतकी जबर दुखापत झाली की,तो लौकरच मेला आणि पैशांखेरीज घोरपड्यांचे दोनशे लोक मारले गेले."
*जेधे शकावली
"शके १५८६ कार्तिक राजश्री स्वामी सेनेसहवर्तमान जाऊन घोरपडे मारले."
______________________________
खवासखान याच घोरपड्यांची वाट पहात बालेघाटाखाली निवांत तळ ठोकून घोरपड्यांची वाट पहात बसला होता.तितक्यात महाराजांचा जासूद गेला.त्याने बातमी दिली..
"खानसाहेब आपण अशी जागा शोधली आहे की,जे मृत्यूचे घर आहे!कोकणची सर्व जमीन म्हणजे आमचे राज्य होय.माझे सैनिक हे काही भुतांपेक्षा कमी नाहीत.कीतीही लोकांची कत्तल झाली तरी त्यांस काही फरक पडत नाही.या आमच्या डोंगरदर्यांत माणूस पायावर चालत येतो खरा पण त्या माघारी जायला पाऊल आमचीच लागतात.दक्षिणेकडील लोकांमध्ये आपण थोर आहात आणि ते थोरपण मी राखू इच्छित आहे.तेव्हा तुम्ही दिवस उगवायच्या आत येथून निघून जाणे,नाहीतर मी एका क्षणात काय करेल सांगता येणार नाही.ते आपणांस कळून येईनच.!"
खवासखान कसनुसाच हसला न त्याने बकबक चालू करुन शिवाजी राजांस लढाईसाठी अव्हान दिले.मोंगल अदिलशहाचे सरदार खर तर या बाबतीत छाप पटाईत होते.
"उथळ पाण्याला खळखळाट फार"
हां अगदी असच हो....
खवासखानाला कल्पना नव्हती की महाराज वरच येऊन बसलेत.महाराजही वाटच पाहून होते.कधी एकदा जासूद येतोय आणि कधी एकदाचा खवासखानाला ठोकतोय असेच झाले होते.तो बर्या बोलाने येथून जाणार नाही याची कल्पना महाराजांना होतीच तसेच झाले.जासूदांने खवासखानाचा करिना महाराजांसमोर कथन केला.महाराज उठले महाराजांनी मावळ्यांस इशारद केली.मराठे निघाले खानावर चालून.इकडे खवासखान निवांतच होता त्याला कळायच्या आतच गलबला झाला.
"गनिम आ गया..गनिम आ गया..."
महाराजांनी लांबूनच खानाच्या सैन्याला गराडा घातला.खानाला कळले न तो थंड पडला.घोरपड्यांची वाट पाहता पाहता मराठेच पुढ कुठीन आल आले बाबा इकडे..!
पण तो मोठा धिट व लढावू वृत्तीचा होता.
त्यानेही आपल्या सैन्यास लढाईचे आदेश दिले.
तो आपल्या शिपायांस समजावून सांगतच होता की त्याच्या आजू बाजूंनी सटासट बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येवू लागला.खवासखानाचे शहा हजरत,सिद्दी सरवर व मीरान शेख आदी सरदार नेटाने मराठ्यांशी झुंड घेत होते.जोरदार,घमासान लढाई झाली व महाराजांनी अखेर निकाली झडप खवासखानावर घातली आणि विजापूरी सैन्य विजापूरलाच पळत सुटले.
______________________________
*शिवराजभूषण
"खवासखानानें शिवाजीराजांसी वैर मांडले.पण त्याच्या विजापूरी सैन्यावर डंका वाजवून शिवाजीराजांना विजय मिळविला.कुठें बिचारा आदिलशहा आणि कुठे ते दिल्लीपतीशी स्पर्धा करणारे शिवाजी महाराज.!"
*सभासद बखर-
"कोंकणांत कुडाळीं लखम सावंत देसाई म्हणोन पुंड होता.बारा हजार हशमांनिशा राहात असे.कुडाळ म्हणजे आदलशाही,त्यानें विजापूरास सांगून पाठविलें की,फौज घोडा राऊत हशम मेळवून आपण राजियांवरि चालोन जातों आणि कोंकण सोडवितो.म्हणोन सांगोन पाठविलें.त्याजवरुन विजापरीहून खवासखान सरलष्कर घेऊन,मोठा योद्धा,दहा हजार स्वारांनिशी कुडाळास आला.लखम सावंत बारा हजार हशमांनिशी सामील होऊन कोंकण सोडवित चालले.इतकियांत राजांस खबर कळून लष्कर व हशम निवड करुन नीट चालून त्याजवर घेतले.ह्यावरीं लखम सावंत कुडाळ प्रांत सोडून फिरंगणांत बाहेर देशांत पळाला."
*शिवकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्र-१०९६
दिनांक-२७ नोव्हेंबर १६६५
गोव्याचा व्हाइसराय ते पोर्तुगीजराजा
"अदिलशहाचा एक सेनापती खवासखान हा दोन हजार घोडेस्वार व पायदळ ह्यांसह आमच्या मुलुखांत शेजारीं असतो.त्याच्या प्रदेशांत शिरुन शिवाजीराजांनी त्याच्याशीं सहज युद्ध केले आणि कोकण सोडून घाटावर चढून जाण्यास त्याला भाग पाडले.एवढ्या विजयांवर संतोष न वाटून शिवाजीराजे अदिलशाही मुलुखात बरेच आंत घुसले..!"
(टि:-हि लढाई खुप मोठी आहे.विस्तार भयास्तव मोजक्या शब्दांत देत आहे.)
______________________________
महाराजांनी खवासखानाचा पराभव केला वमहाराज लगेच वाडीकर सावंत भोसल्यांवर चालून गेले.सावंतांना गोवेकर फिरग्यांचा मोठा आधार.पण महाराजांचे रौद्ररुप पाहून पोर्तुगिजही दोन पाऊले मागे हटले.शेवटी सावंत भोसल्यांनी पदर पसरला.
"आपण सावंत भोसले कुळींचे,आपले पुत्र आहों"
महाराजांनी उदारता दाखविली.भोसले सावंतांशी तह केला.अभय दिले.स्वराज्यात सामिल केले व महाराज निघाले. अदिलशाहिच्या एका मोठ्या नामांकीत किल्ल्यावर चालून गेले तो म्हणजे किल्ले 'फोंडा'.अत्यंत मातब्बर किल्ला होता.हा भुईकोट किल्ला होता.भवती खंदक खोल.महाबतखान नावाच्या एक अतिशय शूर वस्वामिनिष्ठ योद्धा किल्लेदार होता.तो नेटाने लढू लागला.महाराज फोंड्याला मुळी वेढाच घालून बसले होते.कोट व कोटकरी काही केल्या नमेनात.अखेर महाराजांनी करामतीने किल्ल्याच्या तटाखाली सुरुंग ठासले.अन् एके दिवशी त्या सुरुंगांचा धडका उडविला.फोंड्याचे बुरुंज अस्मानात उडाले.महाबत खानाचे हातच जणू महाराजांनी छाटले.मराठे हल्ला चढवून फोंड्यात घुसले.अखेर महाबतखानाचा उपाय हरला.महाराजांनी त्याचे कौतुक केले.त्याला कौल दिला नावाजणी केली व परत विजापुरास पाठवणी केली.
फोंड्याची व्यावस्था लावून महाराज पुढे निघाले.महाराजांच्या समोर होता बारदेश गोवा परिसर.महाराजांनी गोव्यावर चढाई केली.पण गोव्याच्या गोरंदराने(मराठे मुद्दामून गव्हर्नर च्या जागी गोरंदर हा शब्द प्रयोग करत.)मान झुकवली.आपला वकील महाराजांकडे पाठवला व फिरंग्यांशी तह केला.खर तर हे फिरंगे नावाचे परपोषी महाराजांना पुर्णच उपसून फेकायचे होते.पण हे काम तेवढे सोपेही नव्हते न स्वराज्यापासून खुप दिवस महाराज बाहेर होते.तळकोकणच्या किनार्यावर फारच थोडी ठिकाणे बादशहाने राखली होती.भवताली सर्व बाजूंनी मराठ्यांची सत्ता निर्माण झाल्याने ते ही आता पोर्तुगिजांच्या आश्रयास पळत होते.करतील ते काय..
इथे शिवराय नावाचा आसूड त्यांची पाठ सडकावून काढत होता.महाराजांनी कुडाळ पासून किल्ले फोंड्या पर्यंत धडक मारुन शत्रूला पळता भूई थोडी केली.
______________________________
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रं-१०२१
दिनांक-५ डिसेंबर १६६४
गोवा ते सुरत
"शिवाजीराजे फोंडा किल्ल्याकडे परतले किंवा तेथे येऊन थांबले असून त्यांच्या सफरीचे हेंच उद्दिष्ट होतें असे दिसते."
*शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रं-१०२१
दिनांक-५ डिसेंबर १६६४
गोवा ते सुरत
"गोमंतकरांचा आश्रय निघोन फोंड्याचा किल्ला भांडू लागला.त्यास सुरुंग लावून बुरुज उडवून बळीने घेतला.ह्याप्रमाणे एकंदर ते संवस्थान घेतलें.
*मल्हार रामराव चिटणिस बखर-
"फोंडे हेथील कोट जुंझू लागला.ठाणे मजबूत आणि लोकही हिंमतीने लढू लागले.महाराज मोर्चे देऊन बसले.किल्ला जेरीस न ये,ते समयीं सुरुंग तयार केले.उडवावे तो घाटावरु बहलोलखान मदतीस फौज घेऊन आला.हें कळल्यावरुन मोर्चे उठवावे.आधी मोंगल आला त्याचे पारपत्य करुन,मग येऊन किल्ला घ्यावा,ऐसा विचार केला आणि लष्कर निघण्याची तयारी केली.किलियांतील लोक,फौज शह शह पडल्यांमुळे उठोन जाती जाणून बेफामपणे बुरुजावरि,तटावरि उभे राहिले.त्या संधीत सुरुंग तयार होते,त्यांस बत्ती देवविली.त्यांणी किलियातील लोक फार जायां झाले.किल्लेदार उडोन गेला.लोक घाबरे झाले.तेव्हा स्वारी जाण्यास तयार जाली होती.तशीच हल्ला करुन किल्ला घेतला.कोट फत्ते केला.हें वर्तमान घाटावरी बहलोलखान येत होता त्यांस कळले.मदतीस जावें तेंच ठाणें गेलें हे जाणून परत गेला.महाराज फत्ते पावले.किव्ला फोंडे हेथें महाराजांनी इभ्रामखान ह्याणी हल्लेचे समयी, काम करुन निशाणाबरोबर आधी गेला.त्याची नवांजीस करुन त्यासंच सुभा देऊन ठेविले.त्या प्रांती भिवगड,पारगड डोंगर चांगले पाहून किल्ले वसविले.
(टिप:-विस्तार भयास्तव संदर्भ कमी देत आहेत.आणखी अनेक साधनांत या सबंधी उल्लेख आहेत.)
*शिवकालीन पत्रसार संग्रह एक पत्र क्र-१०४२
(हे बहुदा महाराजांनी फिरंग्यांना लिहलेले पत्र असावे.)
"ह्यानंतर फिरंगी ह्याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो.त्याणी तह करुन तोहफा नजराणा पाठविला.सावंत ह्यास तेथे दम न निघे.टोपीकार ह्यास धार न पडे."
______________________________
शिरोड्याजवळचा रेडीचा किल्लासुद्धा महाराजांनी ताब्यात घेतला.तो ही मानाने भगवा मिरवित फिरंग्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होता.पण तरी वेंगुर्ले बंदर वत्याच्या आसपासचा मुलुख मात्र आदिलशाही झेंड्याखाली होता.सांधेकर राजे,सावंतवाडीकर सावंत-भोसले,श्रृंगारपुरकर सुर्वे,पालीकर जसवंतरावदळवी,जावळीकर मोरे,जव्हारकर राजे,रामनगरकर राजे हे जर महाराजांच्या बाजूने उभे राहिले असते तर,जंजिरेकर,गोवेकर,मुंबईकर,वि
______________________________
माझे मनोगत :-
______इंग्रज,पोर्तुगीज,डच या लोकांचा पत्र व्यावहार लक्षात घेता.या लोकांचे मराठ्यांवर व एकंदरीत सर्वप्रकारावर कीती लक्ष होते.याचा आदमास येतो.कुठे राजगड व कुठे कुडाळ तरीही त्या ठिकाणी महाराजांचा हा दरारा खरच वखाणण्याजोगा आहे.त्यांच्या नुसत्या येण्याने देखील शत्रू गलितगात्र होत होता.हे आम्ही समजून घेतले पाहिजेच.
"जिवाची मुंबई न दिलाचा गोवा" अशा प्रकारे गोवा फिरत असताना माझ्या बांधवांना तो गोव्याच्या सिमेवर असणारा हा किल्ले फोंडा व त्या अनुषंगाने झालेला रणसंग्राम समजेल काय?
गोव्याला जाऊन काय पहाल?
ते मला माहीत नाही.मात्र मराठ्यांच्या शौर्याच्या पराक्रमाच्या या पाऊल खुणा तिथे आहेत.त्या मात्र एकदा का होईना डोळ्याखाली घाला व त्या भुगोलास नक्की भेट द्या..!
धन्यवाद...!
'लेखनसिमा'
______________________________
संदर्भ-
*शिवकालीन पत्रसार संग्रह
-भारत इतिहास संशोधक मंडळ
शंकर नारायण जोशी
*शिवराजभूषण
-दु.आ.तिवारी,जळगाव
*सभासद बखर
-श्री.शंकर नारायण जोशी
*जेधे शकावली
-डॉ.अ.रा कुलकर्णा
*मल्हार रामराव चिटणिस बखर
शिवाजी महाराजांचे सप्तप्रकरणात्मक चरीत्र्य
*Shivaji and his times
-jadunath sarkar
*पोर्तुगिज मराठा सबंध
-स.शं.देसाई
*मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३
आशिया विभाग(भाग १ ते ५)
संपादक-ए.बी.द ब्रागांस परेरा
अध्यक्ष पुराणवस्तू समशोधन विभाग,गोवा सरकार
अनुवाद- स.शं.देसाई
(विश्वकोश कार्यालय,वाई)
*राजा शिवछत्रपती-उत्तरार्ध
-बाबासाहेब पुरंदरे
*रणपती शिवाची महाराज
-आप्पा परब
किल्ले 'फोंडा' व रणसंग्राम
भाग २
_________महाराजांनी फोंडा किल्ला महाबतखानाकडून हस्त करुन.फिरंगाणाशी तह करुन महाराज आदिलशाहीचा मुलुख मारीत गोमंतकातून महाराज सागर किनार्यावर बंदर मालवण येथे आले.सह्याद्रीत फिरत असताना महाराजांचे आपल्या आरमारावरही लक्ष होते.सह्याद्री इतकेच प्रेम ते समुद्रावरही करत.आता स्वत:च लाटेवर स्वार होऊन स्वारीवर निघावे असा मनसुबा महाराजांच्या मनी उमलला.मालवणला आल्यानंतर त्यांनी आरमाराची पाहणी केली.समुद्रावर फेर नजर टाकत असताना ते चमकले वत्यांनी देसाई -प्रभू देसाईंना विचारले,
"या बेटाचे नाव काय?"
"जी महाराज कुरटें बेट...देसाई उत्तरले..
महाराजांनी बेट पहायची इच्छा वर्णिली व महाराज सख्या सोबत्यांसोबत बेटावर निघाले,बेटावर आले.महाराज आनंदले आजू बाजूला आफाट खार्या पाण्याचा समुद्र आणि या बेटावर गोड पाणी हे नवलच वाटले त्यांना.
त्यांनी आपल्या कारभार्यांस आद्ना केली की,
"या जागी बुलंद किल्ला वसवावा....!"
महाराजांनी जागेचे भूमीपुजन केले तो दिवस होता श्रीनृप शालिवाहन शके १५८६,मार्गशिर्ष वद्य द्वितीया(२५ नोव्हेंबर १६६४)
सिंधुदुर्गाची जडण घडण चालू झाली.
"या स्वराज्याच्या स्वराज्यलक्ष्मी साठी एक अनमोल असा दागिना तयार होण्या निघाला होता...!"
महाराज सिंधुदुर्गाचे काम मार्गी लावून तेथून निघाले.पुढचे बेत मनात तयार होतेच.आदिलशाही हद्दित त्यांनी एकदम मुसंडी मारली.घाटावर येऊन त्यांनी खुंदावंदपुरावर छापा घातला व ते लुटले.त्यानंतर महाराज शाहीं आमलाखालील कर्नाटकात घुसले व महाराजांनी हुबळी शहर मारिले.इंग्रजांना 'मिरी' निर्यात करण्यासाठी हुबळीशी व्यापार करावा लागे.अत्यंत महत्वाचे हे शहर महाराजांनी लुटून त्याची धुळधाण केली.
_______महाराज त्यानंतर पुन्हा तळकोकणांत उतरले आणि विजापूरकरांचे प्रख्यात प्रसिद्ध असे 'वेंगुर्ला' बंदर महाराजांनी मारले.ते श्रीमंतांकडे प्रथम खंडणी मागायचे की,
"बुवा तुम्ही आम्हाला एवढी एवढी खंडणी द्या.आम्ही काही करत नाही.आम्ही आपले निघून जातो."
पण,सहज अशी खंडणी देतो कोण हे?
म्हणून मग महाराज त्यांना चोपून काढायचे.
"हे लुट हे खंडणी हे जरी इतरांच्या दृष्टीनी लुट होती,चोरी होती.तरी ते करणे गरजेचे होते.कारण,आम्हाला देश वाचवायचा होता,स्वराज्य वाचवायच होतं,सैन्य होते त्याचा पगार,जनावरांना खाद्य वगैरे हा ही सर्व भाग होता.न म्हणुनच तो आमच्यासाठी स्वराज्यासाठी ईमाने इतबारे आई भवानी समोर मांडलेला तो एक गोंधळच होता...!"
महाराजांच्या या धुमाकुळाचा प्रचंड परिणाम झाला.बादशाही मुलुखांतील पेठा,ठाणी,पेढ्या,वखारी यांत एकच घबराट उडाली,आता कोण रक्षण करणार?
"बादशहा आपल्याला वाचवूं शकत नाही व शिवाजीला जिंकू शकत नाही."
हिच गोष्ट सगळीकडे बोलली जाऊ लागली.
दरबारात ज्याच्या तोंडचा विषय होऊ न गेला होता.
"शिवाजीराजे....!"
त्यानंतर महाराज पुन्हा प्रतापगडला आले.पण मागे मोंगल व आदिलशाही मुलुखात महाराजांनी घातलेल्या धुमाकुळाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली होती.हे सर्वांचेच झालेले पराभव औरंगजेबाला झोंबत होते.औरंगजेबाला व त्या आदिलशहाला हे पटेनात की एवढ्या मोठ्या फौजेपुढे,प्रचंड तोफखान्यापुढे आणि आपार पैशापुढे हे मराठे हार जाऊच शकत नाही..
*जानेवारी १६६५ ला महाराजांनी पुन्हा बसनूरची स्वारी झाली...
महाराज पुन्हा मार्च १६६५ सुरुवातीला राजगडावर आले...
महाराज पुन्हा
पुढे मिर्झाराजे आले...
महाराज आग्र्याला गेले...
तेथून सलामत सुटून आले....
*"लेख फोंडा किल्ल्यास अनुसरुन आहे त्यामुळे इतर लिखाण थांबवितो..."
_______या मध्यंतरीच्या कालखंडात फोंडा किल्ला पुन्हा एकदा आदिलशहा कडे गेला.
*शिवकालीन पत्रसार संग्रह पतेर क्र-११२६
दिनांक २४ एप्रिल १६६५
शिवाजीराजांनी पुन्हा एकदा फोंडा किल्ल्याला वेढा देण्याकरिंता २००० लोक पाठविले.दोन महिने वेढा घालून आणि शिवाजीराजांचे ५०० लोक दगावल्यानंतर,किल्ल्यातील लोकांनी आपल्या वस्तू घेऊन जाण्याला परवानगी देण्याच्या अटीवर किल्ला शिवाजीराजांच्या स्वाधीन केला.
एका पत्रातील हा उल्लेख आहे परंतू इंग्रजांची इथे काहीतरी गफलत झालेली दिसतेय.किल्ल्याला वेढा दिल्याचा उल्लेख बरोबर आहे.पण किल्ला महाराजांच्या सैन्याने घेतला हि चुकीची बातमी इंग्रजा पर्यंत पोहोचली असावी.पुढील पत्रांवरुन व उल्लेखांवरुन लक्षात येईल.
आदिलशहाने महाराजांवर सिद्दी मसाऊद,सिद्दी जौहरचा मुलगा आणि रस्तुमजमा या तिघांना पाठवले होते.महाराज यावेळी बालेघाटावर आपल्या प्रदेशांत होते.सिद्दी मसऊदला हे कळताच तो टाकोटाक महाराजांवर चालून जाण्यासाठी निघाला पंरतू सोबत असलेल्या रस्तुमजमाला ते मान्य नव्हते.कारण तो महाराजांस पन्हाळ्याच्या आधी पासूनच सामिल असल्याचे पुरावे मिळतात.रस्तुमजमाच्या मनात नव्हतेच की शिवरायांवर हल्ला करावा पण मसाऊदने थेटच महाराजांच्या छावणीवर हल्ला करण्याचा बेत आखला.पण,जवळ जाताच त्याने तुतार्या व नगारे वाजवून महाराजांना सावध केले.तरी देखील सिद्दी मसाऊद ने ६०० स्वारांनिशी शिवाजीराजांचा इतक्या शिताफींने पाठलाग केला की त्यांत शिवाजीराजांचे ५०० स्वार व १०० शिपाई पडले.
यानंतरचा शिवराजांच्या सैन्याचा प्रवास काही पत्रांतून आला आहे.ती पत्रे येथे देत आहे.
*शिवकालीन पत्रसार संग्रह १ पत्र क्र-११२६
२४ एप्रिल १६६६
कारवार ते सुरत
"तु फोंड्याचा वेढा उठविला पाहिजे.नाहींतर तुला कामावरुन दूर केलें जाईल.असा सुलतानाचा रुस्तूमजमाला खलिता आला.ह्या पत्राने भिऊन जाऊन रुस्तूमजमानें फोंड्याचा वेढा उठविण्याचे प्रयत्नांती कमाल करण्याद्दल महमदखानाला सांगून पाठविले.महमदखानानें लगेच किल्ल्यापासून दोन तीन मैलांवरील रुस्तूमजमाच्या एका गावीं मुकाम करुन आपण फक्त आपल्या मुलुखाची व्यावस्था पाहण्याकरितां आलों आहे,असे सांगून शिवाजी राजांच्या सेनापतीला कळविले.शिवाजीराजे वरुस्तुमजमा ह्यांचा स्नेह असल्याचे माहीत असल्यामुळे महमदखानाबद्दल कोणताही संशय न घेऊन ,दुसर्या दिवशी आपले सर्व मुसलमान लोक घेऊन गेला असतां,ही संधी साधून महंमदखानाने ठिकाणावर राहिलेल्या लोकांवर त्वरेनें हल्ला करुन प्रार्थनावाले लोक मदतीला येण्यापूर्वीच प्रथम पराजय केला.
रुस्तूमजमाच्या महमदखानाने खुदबां पडून फोंडाकिल्ल्याकडे परतणार्या शिवाजीराजांच्या फौजेतील मुसलमान लोकांचाही पराजय केला.
रुस्तुमजमाच्या महमदखानाचा फोंडा किल्ल्याचा शिवाजीराजांचा वेढा उठवितांना एकदा पराभव झाला.
रुस्तुमजमाच्या महमदखानाचा फोंडा किल्ल्याचा शिवाजीराजांचा वेढा उठवितांना दुसर्यादा पराभवझाला.
रुस्तुमजमाच्या महमदखानाचा फोंडा किल्ल्याचा शिवाजीराजांचा वेढा उठवितांना तिसर्यांदा पराभवझाला.
रुस्तुमजमाने शिवाजीराजांपासून कुडाळ ठाणे घेतले.
रुस्तुमजमाने शिवाजीराजांपासून बांदा ठाणे घेतले.
रुस्तुमजमाने शिवाजीराजांपासून संकलेश्वर ठाणे घेतले.
रुस्तुमजमाने शिवाजीराजांपासून डिचोली ठाणे घेतले.
______शिवरायांच्या एका सेनापतीने फोंडा किल्ल्यास वेढा दिला त्या समयी पोर्तुगिजांची स्थिती काही पोर्तुगिज साधनांतून आली आहे.ती येथे देत आहे.
*१६६६ च्या मार्च महिन्यात विजापूरच्या ताब्यात असलेला फोंडा किल्ल्यास वेढा दिला.तो लढविण्यासाठी अंतुज महालातील विजापूरच्या अंकीत असलेल्या मोकासदार देसायांनी पोर्तुगिजांकडे दारुगोळ्याची आणि शस्त्रांस्त्रांची मागणी केली.देसायांच्या विनंतीचा विचार करण्यासाठी पोर्तुगिज हिंदुस्थानचा कॅप्टन जनरल अंतोनोयू मेलू द काश्चु याने राज्य सल्लागार मंडळांची बैठक दिनांक २२ मार्च रोजी बोलविली.याच बैठकीत चौलच्या कॅप्टनने गव्हर्नरला पाठवलेल्या पत्राचाही विचार करण्यात आला.चौलचा कॅप्टन पत्रात म्हणत होता की,
"चौल शहरातील व्यापार्यांकडून दोन लक्ष रुपये गोळा करुन ते आपणाकडे पाठवावे आपण ते लवकरच परत करु अशा आशयाचे पत्र शिवाजीने आपणाला लिहिले आहे.गव्हर्नरने दोन्ही पत्रे राज्य सल्लागार मंडळासमोर चर्चेसाठी ठेवली.या प्रसंगी केलेल्या भाषणात तो म्हणाला की,शिवाजी घेतलेले दोन लक्ष रुपये परत करु म्हणतो,परंतू त्याच्या अश्वासनांवर विश्वास ठेवता येत नाही.फोंड्याच्या किल्ल्याच्या बाबतीच बोलायचे झाल्यास हा किल्ला शिवाजीने घेतला तर आमच्या साष्टी प्रांताला त्याच्या पासून धोका पोहचेल.असे रासईच्या किल्लेदाराचे मत आहे.ते पुढे म्हणतात की शिवाजीच्या फौजा लुटीच्या आशेने साष्टीत घुसल्या तर त्यांना आवरणे कठीण जाईल.म्हणून विजापूरच्या मांडलीक देसायांनी आमच्यापासी दारुगोळा व शस्त्रास्त्रांची मागणी केली आहे.ती त्यांना देण्यात यावी.असे रासईच्या किल्लेदाराचे मत आहे.मात्र हि मदत शापोरा येथे एका निर्जन ठिकाणी शिवाजीला सुगावा लागणार नाही अशा रितीने करावी अशी सुचना केली आहे.
राज्य सल्लागार मंडळाने निर्णय दिला की,फोंड्याचा किल्ला लढविण्यासाठी तेथील देसायांना दारुगोळ्याची मदत पाठवावी.चौल प्रकरणी त्यांनी गव्हर्नरला सल्ला दिला की,त्या ठाण्याचे शिवाजीच्या संभाव्य हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी वसई येथील पायदळाचा एक भाग तिकडे पाठविण्यात यावा.राज्य सल्लागार मंडळाच्या निर्णयानुसार गोव्याच्या गव्हर्नरने फोंड्यास दारुगोळ्याची व शस्त्रांस्त्रांची मदत पाठविली.त्या मदतीमुळे किल्ल्यातील शिबंदीला कुमक येई पर्यंत किल्ला लढविणे शक्य झाले.अखेर विजापूरचा सरदार रुस्तुम जमा याने येऊन शिवाजी राजांचा वेढा उठविण्यास भाग पाडले.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
______वरील पत्र व्यावहारावरुन असे लक्षात येते की महाराजांनी एका सरदाराकरवी फोंडा किल्ल्यास १६६६ मध्ये वेढा घातला.पण इंग्रज म्हणतात की फोंडामहाराजांच्या लोकांनी घेतला.कदाचीत येथे इंग्रजांची गफलत झालेली दिसून येते.रस्तुमजमाला थेट सुलतानाचे पत्र आल्याने त्याने वेढा उठविण्यासाठी महमदखानाला पाठवले.बहुतेक त्याने महाराजांच्या लोकांशी गनिनाकावा करत महमदखानाकरवी फोंडा किल्ला व इतर ठाणी आपल्या ताब्यात घेतली.
______________________________
६ जून १६७४ दुर्गदुर्गेश्वर रायगड आनंदाने शहारला.महाराज अभिषिक्त राजे झाले.या भूमीवर छत्र धारण कर्ते झाले.आनंदाचा सोहळा आटोपला आणि महाराजांच्या काळजातील सल म्हणजेच दुर्ग जंजिरा या जंजिर्याच्या सिद्दींचा बिमोड करावा,पण सिद्दी काही अटोपत नव्हता मग महाराजांना जंजिर्यासमोरच कांसा बेटावर
"राजापुरीच्या उरावर दुसरी राजापूरी उभारण्याचा निर्णय घेतला"
मावळे लोक कामाला लागले.जंजिरेकर सिद्द्यांच्या मार्याखाली पद्मदुर्ग बांधावयास काढला.केवढ ते कौतुक,काय ती दुरदृष्टी....
पाहता पाहता सिद्दयांशी झुज देत पद्मदुर्ग तयार झाला.
आता महाराजांनी पुन्हा एकदा आदिलशाही विरुद्ध आघाडी खोलली.महाराज स्वत: या मोहीमेवर निघाले होते.पण त्याचे महाराजांनी दोन टप्पे केले.दत्ताजी पंताना तीन हजार स्वारांसह कोल्हापूर प्रांतात रवाना केले.आण्णाजींना पुन्हा किल्ले फोंड्यावर चालून जाण्याचे आदेश दिले.
______________________________
*शिवकालीन पत्रसार संग्रह १ पत्र क्र-१६७५
दिनांक २ सप्टेंबर १६७४
कारवार ते सुरत
"फोंड्यापासून १६ मैलांवरील,शिवाजीराजांच्या हद्दीतील नरसा ह्या ठिकाणच्या एका श्रीमंत व्यापार्याला धरल्यांमुळे शिवाजी महाराज फोंड्याचा खान सुभेदारावर संतापले आहेत.सुभेदार त्यांना भिऊन जलमार्गाने तोफखाना वगैरे कुमक फोंड्याकडे पाठवूं लागला आहे.आमच्याकडेही त्याने तोफा व गलबत मागितले आहे.
*शिवकालीन पत्रसार संग्रह १ पत्र क्र-१६८३
दिनांक २ सप्टेंबर १६७४
मुुंबई ते सुरत
"शिवाजीराजांचे सैन्य दख्खनकडे फोंडा किल्ल्याचे बाजूला,रुस्तुमजमाच्या मुलाचे व शिवाजीराजांचे भांडण झाल्यांमुळे वळले आहे,असे समजते."
*शिवकालीन पत्रसार संग्रह १ पत्र क्र-१६८४
दिनांक २ सप्टेंबर १६७४
वेंगुर्ला ते बटेव्हिया
"ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यांच,फोंड्यावर अचानक छापा घालण्याकरिंता शिवाजी महाराजांचा आण्णाजी ह्या नावाचा सेनापती कुडाळास आला.परंतु महमदखानाला आधा कळून तो सावध राहिल्यामुळे आण्णाजीला अपयश आले.
(टिप-
या ठिकाणी गफलत आपल्या इतिहासकारांची झालीये की इंग्रजांची ते ठाऊक नाही.मात्र आपले इतिहासकार म्हणतात की १६७५ ला आण्णाजी फोंड्यावर चालून गेले वया इंग्रजांच्या पत्रात तेच साल १६७४ आहे.मी एक संकलक आहे मी केवळ संकलन केले आहे.)
______________________________
पण एवढ्यांत मोगलांची चळवळ चालू झाली.कल्याण भिवंडीवर मोगलांनी धाड घातली आणि त्यांनी घरे पेटविली.ताबडतोब मराठी सेना कल्याणात आली व मोंगल पसार झाले.परंतु मोंगल सुभा बहादूरखान हा चढाई करणार ,अशी चिन्हे महाराजांना दिसू लागली.महाराजांनी तर फोंडा व कारवारवर चढाई करण्याची जय्यत तयारी केली होती.पण इकडे मोंगल उठला.
त्यावेळी महाराजांनी बहादूरखानाला एक पत्र लिहिले,
"मी बादशहाला शरण आहे!मी माझे सतरा किल्लेबादशहाच्या स्वाधीन करण्यास तयार आहे.तसेच पुर्वीप्रमाणे माझा मुलगा संभाजीराजा यालाही सैन्यासह बादशहांच्या चाकरीसाठी पाठविण्यास मी तयार आहे त्याला पुर्ववत सहा हजारी मनसब मिळावी आणि माझ्याकडे भीमा नदीच्या दक्षिणेचा मुलूख रहावा."
पेडगावला बहादूरखान आनंदला त्याने हा खलिता औरंगजेबाला पाठविला.कारण त्याच्या संमतीशिवाय तहास उपयोग नव्हता.पण औरंगजेब तर दुर पंजाबात होता.तेथे खलिता पोहचून उत्तर येण्यास निदान तीन मास तरी लागतील हे महाराज जाणून होते व हे दिवस महाराजांना पुरेसे होते..
या तीन महिन्यांत कोल्हापूर, फोंडा व कारवार काबीज करुन घ्यावे असा महाराजांनी अचूक डाव टाकला..
_______महाराज फोंड्याकडे जायला निघाले ते तेथून राजापुरास आले.राजापूराहून त्यांनी लहान लहान चाळीस गलबते वेंगुर्ल्यास रवाना केली व स्वत: कुडाळकडे कूच केले.त्यांच्याबरोबर पंधरा हजार घोडेस्वार,चौदा हजार पायदळ व दहा हजार मजूर होते.मराठ्यांनी याच वेळी कोल्हापूर घेतले.महाराज कुडाळहून फोंड्यास गेले आणि त्यांनी फोंडा किल्ल्यास वेढा घातला.
क्रमश:
धन्यवाद...
______________________________
संदर्भ-
*शिवकालीन पत्रसार संग्रह
-भारत इतिहास संशोधक मंडळ
शंकर नारायण जोशी
*Shivaji and his times
-jadunath sarkar
*पोर्तुगिज मराठा सबंध
-स.शं.देसाई
*मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३
आशिया विभाग(भाग १ ते ५)
संपादक-ए.बी.द ब्रागांस परेरा
अध्यक्ष पुराणवस्तू समशोधन विभाग,गोवा सरकार
अनुवाद- स.शं.देसाई
(विश्वकोश कार्यालय,वाई)
*राजा शिवछत्रपती-उत्तरार्ध
-बाबासाहेब पुरंदरे
*रणपती शिवाची महाराज
-आप्पा परब
______________________________
किल्ले 'फोंडा' व रणसंग्राम
समकालिन साधनांतून
भाग ३
_______महाराजांनी फोंडा किल्ल्यास वेढा घातला.हा किल्ला भुईकोट होता.पावसाळा जवळ आला होता.पण धो धो कोकणी पावसांतही महाराजांनी वेढा चालु ठेवायचा हा चंग मनी बांधला होता.सह्याद्रीतील या रणमर्दांना पावसाची आणि ऊन्हाची तमा नव्हती.एक डाव मांडला होता स्वराज्याचा न त्यासाठी तन,मन,धनाने फक्त लढणे होते,गनिमांच्या नागड्या तलवारी अन् तोफेच्या भांडयांपुढे या रणमर्दांची छाती जणू तटाटून फुगत होती.किल्ला महंमद खानाकडे होता.किल्ल्यात कशीबशी चार महिन्याची रसद होती व विजापुरावरुन कुमक येण्याची काही आशा नव्हती.बघता बघता फोंडा कोटाच्या आजू बाजूला महाराजांचे हेर फिरु लागले.चौकी पहारे बसले.पाहता पाहता लढाईला तोंड लागले.तिर कमानी व गलोल,गोफण्या घेऊन मराठे मर्द फाकडे किल्ले फोंड्याच्या तटाशेजारी उभे ठाकले.महाराज डावा मागे डाव टाकत होते.महाराजांना या आदिलशाही व मोंगल रणनितीची व त्यांच्या चपळाईचा आता पुर्ण अंदाज आला होता.त्यांनी अशा कित्येक बड्या बड्या सरदारांना धूळ चारली होती.महंमदखान निकराने महाराजांचा हर एक डाव परतवत होता.महाराजांनी एक अफलातून युक्ती काढली की किल्ले फोंड्याच्या तटालाच सुरुंग लावायचे न तटच उडवून द्यायचे.चाकणच्या संग्रामदुर्गाच्या रणनितीची महाराजांनी येथे युक्ती वापरली.पहिल्या दहा दिवसांत महाराजांनी चारदा सुरुंग लावले पण काही फायदा झाला नाही.त्यांनी किल्ल्याच्या मुख्य तटापासून दहा बारा हातांवर एक संरक्षण भित बांधली होती.त्या भिंतीच्या आधारे महाराज किल्ल्यावर हल्ला करत होते.महंमदखानाने या भिंतीला काही सुरुंग लावले व ती भिंतच पाडली.मराठी सैन्याला आता लढाईला काही अडसर नव्हता.फोंड्याच्या बुरुजांवरील संरक्षक तोफा कधी तरी आग ओकत होत्या.पण, महाराज जाणून होते की यांंच्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात तोफगोळा शिल्लक नाही.फोंड्यापासून जवळच गोवेकर पोर्तुगिजांनी राजाच्या कुरापती काढायला सुरुवात केली.कारण,पोर्तुगिजांना माहीत होते की जर फोंडा शिवाजीराजांकडे गेला तर आपल्या पुर्ण हालचालींवर बंधने येतील.तसेच साष्टी प्रांतालाही यापासून धोका होता.पण महाराजांनी पोर्तुगिजांची ही नाटक बंद करुन वेढा चालूच ठेवला.तरी मागील प्रमाणे गोवेकर पोर्तुगिज फिरंगी हे चोरटी मदत करतच होते.अखेर एक दिवस बोरी नदीवर महाराजांनी पहारा लावला हा सर्व प्रसंग पाहूयात इंग्रज व पोर्तुगिज पत्रांतून..
*पत्र क्र-१७४१
दिनांक १४ एप्रिल १६७५
कारवार ते मुंबई
"शिवाजीराजांचे २००० घोडदळ व ७००० पायदळ इतकें सैन्य गेले सहा दिवस फोंड्याला वेढा घालून बसले आहे.पाऊसांत देखील वेढा चालू ठेवून फोंडा घेण्याचा शिवाजीमहाराजांचा निश्चय झाला आहे.महंमदखानाजवळ ४ महिन्यापेक्षा रसदेचा आधिक पुरवठा नाही.विजापुराहूनहि काही कुमकेची आशा नाही.
*पत्र क्र-१७४२
दिनांक २० एप्रिल १६७५
राजापूर ते मुंबई
"शिवाजी महाराज सर्व सैन्य घेऊन फोंड्याशी चंग बांधून बसले आहेत.पुष्कळ प्राणहानी झाली.त्यांनी चार वेळा सुरुंग लावले.परंतु तितक्याही वेळा शत्रूने उलट सुरुंग लावले.तटापासून बारा फुटांवर सैन्याचे रक्षणाकरितां त्यांनी भिंत बांधली असून तेथून ते किल्ला घेतल्याशिवाय उठणार नाही असें म्हणतात."
*पत्र क्र-१७४३
दिनांक २२ एप्रिल १६७५
कारवार ते मुंबई
"ह्या प्रांताचा आधिकारी रुस्तुमजमा १५०० घोडदळ व पायदळ घेऊन फोंड्याला कुमक करावयास आला.पाऊसकाळांत शिवाजी महाराज हेथेंच छावणीकरिता राहणार असल्याकारणाने फोंडा त्यांचे हातांत नक्की जाणार असे सर्वांनाच वाटत आहे.त्यांचे सैन्य ३० हजार आहे,असे लोक बोलतात."
*पत्र क्र-१७४१
दिनांक ३ मे १६७५
कारवार ते मुंबई
"फोंड्याचा वेढा नेटाने चालविला आहे.शिवाजीमहाराजांनी दोन मार्याच्या जागा ताब्यात घेऊन खंदक भरुन टाकला आणि ५०० शिड्या तयार करुन त्यांच्यावर चढून जाण्याचे धाडस करणार्यांना बक्षीस देण्याकरितां शिवाजी महाराजांनी प्रत्येकी अर्धा शेर वजनाचे ५०० तोडे करविले.शिवाजी महाराजांनी पुष्कळ सैन्य तेथे इरेस घातल्यांमुळे त्यांच्या ताब्यात किल्ला जाणार,असीच आमची आपेक्षा होती.इतक्यांत वेढा उठवून शिवाजी महाराज निघून गेल्याची बातमी आज सकाळी आली.बहलोलखान स्वत:चे ८००० घोडदळ व ७००० पायदळ आणि शिवाय मोठे सैन्य बरोबर घेऊन त्यांच्यावर चालून येत आहे.म्हणून शिवाजीमहाराज गेले असावेत."
*पत्र क्र-१७४७
दिनांक ८ मे १६७५
कारवार ते मुंबई
"शिवाजीमहाराजांनी फोंडा जिंकून महमदखानाला बेड्या घातल्या
किल्ले शिवाजीराजांचे स्वाधीन करावे,असे शेजारच्या किल्लेदारांना पत्र त्याचे हातून जबरदस्तीने लिहून घेतले.पण त्याचे कुणी ऐकणार नाही."
*पत्र क्र-१७५१
दिनांक २१ मे १६७५
कारवार ते मुंबई
"काही दिवसांपूर्वीच फोंडा घेताच शिवाजी महाराजांनी सरसहा सर्वांची कत्तल केली.आसपासचा सर्व आदिलशाही मुलूख शिवाजीमहाराजांच्या आमलाखालीं आणून देण्यांचे वचन दिल्यामुळे फक्त महमदखान आणि ४-५ लोक ह्यांचे प्राण बचावले."
*पत्र क्र-१७५२
दिनांक २५ मे १६७५
कारवार ते मुंबई
"फोंडा हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे फळ आहे."
*पत्र क्र-१७५३
दिनांक १४ एप्रिल १६७५
राजापुर ते मुंबई
"बहलोलखान अजून मिरजेतच आहे.त्यांने फोंड्याची कुमक करण्याचा प्रयत्न केला;परंतू शिवाजीमहाराजांनी झाडें तोडून तीं आडवीं घालून मार्ग बंद केले व सर्वत्र पहारे ठेवले.ह्यामुळे त्याचे काही चालले नाही.असी आमची माहीती आहे."
*जेधे शकावली:-
"शके १५९६ फाल्गुन वद्य ५ राजश्री स्वार झाले,ते शके १५९७ चैत्र वद्य ५ राजश्री स्वामींनी फोंडाकोट सुरुंग लावून उडविला."
*काही पोर्तुगिज साधनांतू आलेली माहीती-
______शिवाजी महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला.मागच्या प्रमाणे याही वेळी पोर्तुगिजांनी फोंड्याच्या आदिलशाही शिबंदीला दारुगोळ्याची व अन्नाची चोरुन मदत केली.शिवाजी महाराजांना याचा सुगावा लागल्याने त्यांनी बोरी नदिवर पहारा बसविला.एके दिवशी अन्नधान्याची आणि दारुगोळ्याची दहा शिबाडे बोरी नदीतून फोंड्यात जात असताना मराठ्यांनी ती पकडली.व्हिसेरेकडे जाब मागितला तर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकविण्याचे ठरविले.त्यांनी साष्टी प्रांतात कुकल्ली आणि वेरडे या दोन गावात सैन्य पाठवून गावची लुटालूट केली त्याचा योग्य परिणाम झाला.व्हिसेरे चौथचा कर भरण्यास तयार झाला.
शिवाजी महाराजांनी १६७५ च्या ८ मेला फोंडा किल्ला घेतला.त्यामुळे फोंड्याच्या अंकीत असलेले तिसवडी ,चंद्रमहल,केपे,बाल्ली,कोणकण हे आदिलशाही महाल त्यांच्या आमलाखाली आले.त्यानंतर त्यांनी दक्षिणेकडे चाल करुन सिवेश्वर,कडवाड(कारवार),कद्रा,
_______या लढाई नंतर इंग्रज आपल्या सुरत करांना सांगतायेत की तुमचे शेजारी जे पोर्तुगिज आहेत.ते तुम्हाला जळी स्थळी त्रास देतायेत.तुमच्यासोबत दुष्टाव्याने वागतायेत.परंतु तुमचे आलेले नविन स्नेही शिवाजी महाराज त्यानां त्यापेक्षाही आधिक त्रास देत असल्यामुळे जशास तसे चालू आहे.महाराजांनी एटगिरी,गदग,रायबाग ही ठाणी मारली.
महाराजांनी संभाजीराजेंना गोवळकोंडा हद्दीतील भागानगरावर पाठवल.संभाजीराजेंनी चिरतोड कुच केली न भागानगर लुटल.
हं...!
सिंहाच्या बछड्याने या परकिय शाह्यांवर आपल्या बलशाली पंजाचा मारलेला तो तडाखा होता.बहलोलखान आडवा आला त्याला आडवा करत संभाजीराजे पुन्हा फोंड्यावर आले.महाराष्ट्रातील भाऊ बहीण,मित्र मैत्रिणींनो फोंडा किल्ल्यास स्वराज्यातील महाराज ,संभाजीराजेंसोबत कित्येक निष्ठावंतांचे चरण लागलेत.तेथे त्यांची चरणधूळ आहे.मराठी फौजा कित्येक दिवस तेथे मुक्कामास होत्या.मी जेव्हा इंटरनेटवर फोंडा किल्ला शोधला तेव्हा अगदी चार शब्दही मिळाले नाहीत.तो किल्ला नेमका कुठे आहे याचीही माहीती नाही.आफाट पराक्रम लाभलेला हा किल्ले फोंडा सुशिक्षित इंटरनेटच्या जमातीपासून दुर्लभच राहिला.फार वाईट वाटल म्हणून हा लेखन प्रपंच उभारला...
केवळ एक लढाई सर्वांनी नावाजली ती म्हणजे संभाजाराजेंची व येसाजी कंक कृष्णाजी कंकांची
आरे..पण त्या आधीही येथे आपल्याच मराठी माणसांचे रक्त सांडलेय त्याच काय?
ती चुक माझी आहे की मी आज पर्यंत फोंडयाचे संकलन करुन नेटवर टाकू शकलो नाही.
हां आता मात्र समाधान वाटत आहे.
कुणी फोंडा किल्ला शोधला तर त्याला ही माहीती वाचता येईल.
सुरुवात स्वत:पासून करा.
जग बदलतय सोबत आपल्याला आता इतिहास प्रचार व प्रसरणाची माध्यमेही बदलावीच लागतील.
या धावपळाच्या युगात मोबाईलच व कंम्प्युटर सर्व झालय...
पुस्तक दुरावली आहेत..!
_______कारवार जिंकण्याची महाराजांची खुप दिवसाची इच्छा पुर्ण झाली.कारवार स्वराज्यात आले.याच बरोबर फिरंग्यांना असा तडाखा बसला की,
त्यांना 'शिवाजी' या तीन अक्षरी नावाच्या वादळाचा अंदाज आला व महाराज रायगडास आले...!
इकडे बहादूरखानाला महाराजांनी तहासाठी केलेल्या पत्राचे उत्तर आले.औरंगजेबाने एक हत्ती व संभाजीराजेंसाठी मनसबीचे फर्मान पाठविले.बहादूरखानाने ते महाराजांकडे पाठवले.त्यांचे वकील महाराजांकडे पाठवले...
महाराज या शाही फर्मानाची वाट पहातच होते.
बहादूरखानाचे वकील महाराजांसमोर आले आणि त्यांनी करिना कथन केला.
महाराज त्यांना म्हणाले,
"असा कोणत्या पराक्रमाचा दबाव तुमच्या खान साहेबांनी आमच्यावर आणला आहे.म्हणून आम्ही तुमच्याशीं असला तह करावा?तुम्ही ताबडतोब येथून निघा नाहीतर मीच तुम्हाला काहीतरी करुन ठेवेन."
बहादूरखाना़च्या महाराजांनी अशी तोंडात मारली की,त्याची ना घर का ना घाट का..!
अशी स्थिती झाली बहादूरखानाच्या डोळ्यांच्या पुढे चांद चारे चमकले चांद तारे..!
अररे....केवढी हा बेअब्रू!
महाराजांनी तहाच्या नावाखाली या बहादूरखानाला तीन महीने हत्ती सारखा झुलवत ठेवला.महाराजांनी त्याच्या व मोंगलशाहीच्या आब्रूची लक्तरे दिल्लीच्या वेशीला टांगली.अशा कित्येक बहादूरखानांना या सह्याद्रीच्या सिंहाने धुळ चारली होती.हा एक बहादूरखान कीस झाड की पत्ती.…?
________महाराजांनी त्यांच्या जिवनातील फोंडा व परिसरातील लढायांचा अढावा मी समकालीन साधनांतून घेण्याचा प्रयत्न केला.पुढे महाराज निर्वतले.त्यानंतर संभाजीराजे अभिषिक्त राजे झाले व त्यांनी फोंड्यावर चढाई केली.एका सिंहाचा तडाखा किल्ले फोंडा व परिसराने अनुभवला..
महाराजांनी कारवार,वेंगुर्ला परिसर व पोर्तुगिज इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले.पण लढाई आली की हार जीत आलीच.या जय पराजयाच्या लढाईत आपल्या कित्येक इमानी व निष्ठावंत बापजाद्यांचे रक्त त्या मातीत सांडले आहे.त्याचा आदर,सन्मान राखला पाहीजे.एका धडधाकट्या बलवान धुरंदर बेताज सिंहाचा तडाखा आदिलशाही फिरंग्यांनी सोसला.
आता पाहुयात सिंहाच्या बछड्याने म्हणजेच संभाजीराजेंनी केलेली फोंड्यावर चढाई पुढील भागांत...!
क्रमश:
धन्यवाद.…!
संदर्भ:-
शिवकालीन पत्रसार संग्रह
-भारत इतिहास संशोधक मंडळ
शंकर नारायण जोशी
*जेधे शकावली
-डॉ.अ.रा कुलकर्णा
*Shivaji and his times
-jadunath sarkar
*पोर्तुगिज मराठा सबंध
-स.शं.देसाई
*मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३
आशिया विभाग(भाग १ ते ५)
संपादक-ए.बी.द ब्रागांस परेरा
अध्यक्ष पुराणवस्तू समशोधन विभाग,गोवा सरकार
अनुवाद- स.शं.देसाई
(विश्वकोश कार्यालय,वाई)
*राजा शिवछत्रपती-उत्तरार्ध
-बाबासाहेब पुरंदरे
*रणपती शिवाची महाराज
-आप्पा परब
किल्ले फोंडा व रणसंग्राम
ऐतिहासिक साधनांतून
भाग४
_____मागिल भागांत किल्ले फोंडा कोटाच्या आसमंतात मराठ्यांच्या इतिहासाच्या उमटलेल्या पाऊलखुणा आपण पाहिल्या.महाराज निर्वतल्यानंतर संभाजीराजेंनी एक मोहीम किल्ले फोंड्यावर काढली व फिरंग्यांना पालाण घातले.त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात.हा कोट आज मितीला तुम्हाला सहज सापडणार नाही मलाही प्रथम नाही सापडला.नेटवरही काहीच माहीती नाही.मात्र तो आहे.
त्या पाऊलखुणा आजही तेथे अस्तित्वात आहेत.
गडाच आत्ताच नाव "शिवाजी फोर्ट" असे आहे.
फोंडा या शहराच्या काहीसा बाहेर हा भुईकोट आजून अस्तित्वात आहे.तो पुर्वीसारखा जरी बलशाली नसला तरी त्याचा दरारा मात्र शाबूत आहे.पाहू यात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजेंचा रणसंग्राम....
______पाऊसमार्याखाली जागजागी पडलेले मोगलांचे तळ आता निघू लागल होतेे.गडागडांना गवती झापा चढल्या.किल्ले रामशेजचा नेक किल्लेदार मोठा चिवट वशूर आपल्या छातीचा कोट करुन तो किल्ले रामशेज लढवत होता.चिकाटीने किल्ल्याला पडलेला घेर झुंजवत होता.पण यामुळे औरंगजेबाचा तळकोकणावरचा फौजीताण कमी झाला व संभाजीराजेंनी आपल्या आठ हजार पायदळाला इशारद केली.औरंगजेबाच्या उठत्या सैन्याचा फायदा घेत संभाजीराजेंनी फिरंग्यांच्या वाढत्या हालचालींना आळा घालण्याचे ठरवले.त्यांनी येसूबाईंचा निरोप घेतला आबासाहेब व थोरल्या आऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन संभाजीराजे महाड घाटाने राजापुरात उतरले.चेऊल उर्फ रेवदंड्याचे राघो विश्वनाथ ,दमणचे हरी शिवदेव,दाभोळचे वेंकाजी निमदेव यांना तातडीचे हरकारे रायगडाहूनच गेले होते.धुवाध्धार पावसात तळकोकणांच्या मर्दान्यांची खाशा डेर्यात बैठक बसली.संभाजीराजेंनी आपला मनसुबा खुला केला,आम्ही खासेच रेवदंड्यावर चालून जाणार आहोत.तेव्हा तुम्ही आपापल्या ठाण्यांवर हुशार असणे.किल्ला भुईकोट काय होती नव्हती ताकद ती फक्त तोफांतच पण पाऊसाचे दिवस त्यामुळे तोफा निकामी त्या कामास येणार नव्हत्या महाराजांनी याच वेळी फिरंग्याकडील किल्ले रेवदंड्यावर स्वारी केली.रेवदंडा आता जमिनदोस्तच करायचा याच उद्देशाने संभाजी राजे व मराठे किल्ल्यावर चालून गेले.पण फिरंगी काही कच्चे नव्हते.मुळात हे लोकच फार चिवट त्यामुळे ते लढण्यातई पटाईत होते.त्यांची शस्रे अधूनिक होती.त्यांच्या तोफा बंदुका चांगल्या प्रतीच्या होत्या.मात्र घेरा चालूच होता.दहा दिवस,वीस दिवस, दिड महिना झाला वेढा चालूच होता.संभाजीराजे मागे हटायला तयार नव्हते.देशावरील व सर्व ठाण्यांवरील खबरा अगदी वित्तंबातमी बहिर्जींचे नेक हरकारे खबरबाज महाराजांना पुरवत होते.महाराजांनी याचवेळी रेवदंडा,दमण,वसई भागात मराठी फौजा घुसवल्या व पोर्तुगिजांची लंगडेतोड चालू केली.त्या विजरईने प्रजेसह पाद्र्यांना सुद्धा फर्मान काढले की हातात मिळेल त्या हत्यारानिशी लढायला सावध रहा.आपले सांम्राज्य वाचविणे आहे.मराठ्यांनी पार फिरंग्यांची धुळधाण केली.
सगळ्या फिरंगाणात खबरा पोहोचल्या पणजीचा विजरई तळफिरंगाणात हत्यारे सैन्य संचणी जोरात करत असल्याची बातमी महाराजां पर्यंत पोहोचली व वेढा निळोजापंतांवर सोपवून संभाजीराजे रायगडला आले.पाहता पाहता पाऊस संपला व फिरंग्यांच्या हालचाली सुरु झाल्या.ते पणजीची मांडवी खाडी ओलांडून लगतची गावे रात्री बेरात्री बेचिराख करु लागले.कैद माणसे सक्तीने बाटवू लागले.माणसे हवालदिल झाल्याच्या खबरा रोज रायगडावर येऊन धडकत होत्या.या सर्वांची बातमी रेवदंडा वेढ्यावर असलेल्या निळोपंताना कळली व त्यांनी सबंध रेवदंडा,दमण,वसई पट्टा त्यांनी आपल्या पटाखाली धरला.त्याने भेदरलेले चार हजार फिरंगी मुंबईला आसर्याला गेले.पणजीची वाढती हालचाल पाहून महाराजांनी फोंड्याचे सुभेदार धर्माजी नागनाथ सोबत येसाजी कंकांनाही खलिता धाडला,खलिता पोहचताच टाकोटाक ते रायगडास हजर झाले.संभाजीराजेंनी येसाजींना फोंडाकिल्ला लढविण्याचे आदेश दिले.संभाजीराजे जाणून होते हे फिरंगे जाऊन जाऊन फोंडा कोटाकडेच जाणार.
येसाजीं सोबत त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे ही होते.
लगोलग त्यांनी गड उतार केला व निघाले फोंडा कोटाकडे.
गड उतार करताना येसाजी कृष्णाजीला बोलले....
"पोरा मनाजोगी मसलत मिळाली बघ,
आता त्या व्हिसेरे न त्या गोरंदराचे शिरच कापून काढू बघ...!"
सर्व बाजूंनी नुसता धुमाकूळ मांडला होता मराठ्यांनी,फिरंगाण पार जेरीस आणल होत.रायगडावरुन जस जसे खलिते जात होते.तस तशी शिबंदी तळकोकणात जमा होत होती.पोर्तुगिज लोकही रेवदंड्याचा वेढा मजबूत करत होते.तिकडे फिरंग्यांणी फोंडा कोटाला वेढा घातल्याची बातमी येऊन धडकली न महाराजांच्या कपाळावर आढ्या पसरल्या.महाराज चिंतेत पडले.इकडे रेवदंडा परिसरात ३० हजाराच्या आसपास मावळा लोक एकवटला होता.
याचवेळी तेथील फ्रेंचाच्या छावणीत एक वकील धाडला वत्याला सक्त ताकीत दिली की,
"फिरंग्यांस कोण्या वजेची मदत करण्याची आगळीक करु नये.येथील आमचे मावळे लोक वाढले आहेत.खर्चासाठी दिड हजार पागोड्यांचे कर्ज म्हणून द्यावे नाहीतर आम्ही तुमच्यावरही हल्ला करु...!"
______इकडे फोंड्याच्या वेढ्यास आठ दिवसांच्या वर कालावधी लोटला होता.फोंडा कोटाचा नायकवडी रायगडावर हजर झाला न त्यांनी फिरंग्याच्या जुलूमाचा करिना महाराजांना सांगितला.फिरंग्यांनी चालविलेला धर्मांधपणाचा तो किळसवाणा प्रकार ऐकला.पुढे नायकवडी बोलते झाले...
"आज रात्रीच फिंरंगे कोटावर वर्माचा व निकालीचा हल्ला करणार आहेत."
महाराज ताडकन जागेहून उठले,
"खंडोजी हंबीरमामांना बोलावून घ्या.पाच हजाराचा घोडा लोक तयार ठेवा आम्ही खासेच निघतो आहोत येसाजींना कुमत करण्यास व वेढ्याचा उपराळा करण्यास....!"
एके सकाळी लढाऊ साज घातलेले संभाजीराजे बाहेर पडले व त्यांनी तयार असलेल्या 'चंद्रावतावर' मांड ठोकली.
मराठी फौजा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली फोंड्याच्या दिशेने वाटचाल करु लागल्या.
इकडे विजरई आल्वेर आपल्या शिपायांसह फोंडे कोटास वेढा टाकून तोफांचा मारा करत होता.
त्या तोफांच्या मार्याने फोंडा कोटाच्या तटास एक भगदाड पडले.आता एक शेवटचा निकालीचा हल्ला करायचा वफोंडा किल्ला आता ताब्यात येणार.
येसाजी कंक व कृष्णाजी कंक बाप लेक पुर्ण तटावर फिरत होते.मावळ्यांना प्रोत्साहन देत होते.नरड्याच्या घाट्या फुलवून,
"हर हर महादेव...!"
किंकाळ्या आसमंतात थिजत होत्या..!
त्यांच्याही चेहर्यावर आता चिंतेचे सावट पसरले होते.कुमक का येत नाही़ये.शेवटी हजारांच्या पुढे काही 'शे' मावळे कीती दिस टिकाव धरणार.या विचाराने ते चिंतावले होते.आता फोंडा किल्ल्याचे ते तट म्हणजे
केवळ,
"जिवन व मरणाच्या सिमा होत्या."
कोणत्याही वेळेस फिरंगी फौज किल्ला ताब्यात घेणार.पण मृत्यूलाही ज्यांनी थांबवल असे रणमर्द मराठे
लढतच होते....
लढतच होते...
विजरईने आपल्या सैन्याला असे शिस्तित उभे केले होते.भगदाड पडल्या जागेहून आत शिरायचे आणि आतली मराठ्यांची शिबंदी कापायची हा बेत आखून तो आपल्या सैनिकांना सुचना देत होता.इतक्यात तटावर उभ्या असणार्या येसाजी कंकांना दुरवर धुळीचे लोट दिसले.
त्यांनी कृष्णाजीला जवळ बोलावले
बोटाने इशारा करुन..
"पोरा त्ये बघ...!"
खर तर दोघांनाही समजेना की नक्की फौज कुणाची
चिंता आजून वाढू लागली.
मात्र त्या धुळीतही चमकला मराठ्यांचा सन्मान अर्थात "भगवा".
येसाजी कंक आनंदले...!.
सबंध फोंडा परिसर "हर हर महादेव" किंकाळ्यांनी दणाणून गेला.तो फिरंगी विजरई भेदरला..
क्षणात बाजी पलटली होती.
नव्या दमाचे मावळे लोक पाहता पाहता फिरंग्यांवर तुटून पडले.फिरंगी सैन्य या मावळाच्या मुशित वाढलेल्या इमानी हातांच्या घावांचा सामना करु शकले नाही.त्यांनी पळ काढायला सुरुवात केली.विजरई हुशार होता.त्याने बंदूकधारी एक तुकडी मागे ठेवली.
सर्व मराठे आता किल्ल्याच्या बाहेर आले.
येसाजी कंक व कृष्णाजी कंकही शत्रूंना भिडले व पाहता पाहता रणधुमाळी माजली.तलवारी,बंदुका सरसावल्या...
फिरंग्यांनी प्राण रक्षणार्थ आपल्या
बंदूकांचे तोडे शिलगावले..
त्यात येसाची कंक जाया झाले..
त्यांना जबर जखम झाली.
हे पाहून कृष्णाजी कंक नेटाने फिरंगी फौजेवर चालून गेले.त्यांनी फिरंग्यांची सळो की पळो केली.
मात्र त्या रणधुमाळीत एक गोळी कृष्णाजी कंकांना लागली व कृष्णाजी पडले.
एका झाडाखाली घोंगडीवर येसाजींच्या शेजारीच कृष्णाजींना झोपविण्यात आले.
संभाजीराजे जवळ गेले त्यांचे डोळे कृष्णाजीला पाहुन डबडबले.
त्यांच्या मुखातून शब्द निघेनात.
काय बोलाव तेही कळेना..
राजगडाच्या पायथ्याशी असणार्या भुतोंडे गावचे ही बडी असामी..
आबासाहेबांच्या कित्येक लढायांत येसाजींनी माहाराजांची पाठराखण केली.
"राजा नावांस आता छत्र सिंहासन पाहीजे,
हे छत्रसिंहासन ज्यांच्यामुळे उभे राहिले ते म्हणजे हेच लढणारे हात होते.संभाजीराजेंच्या डोळ्यापुढून क्षणात सर्व पट गेला..!"
त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाजींना पाहीले.कृष्णाजींनी एकदाच डोळे किलकिले करुन राजांकडे पाहीले व त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
"लवलवत्या पापणीने कृष्णाजींनी उभरत्या स्वराज्याच्या युवराजांस अखेरचा मुजरा रुजू केला आणि कृष्णाजी या स्वराज्या चरणी ईमान वाहून चालते झाले."
संभाजीराजेंनी मुठी आवळल्या हंबीरराव मामांना इशारद केली.
"सोडू नका नमकहरामांना पाठलाग करा त्यांचा व आमच्या समोर हाजीर करा...!"
फिरंगी फौजेचा मराठी फौजांनी पाठलाग केला.
सालसेत,बारदेशावर हंबीरराव उतरले,
दुर्भाट आगाशी मार्गे धर्माजी नागनाथ घुसले.
तिनही मार्गाने फौजा थेट गोव्यातच घुसल्या.संभाजी राजे खासा जुवे बेटावरच चालून गेले.त्यांनी जुवे बेट काबिज केले.आता फक्त एकच खाडी पार करायची व गोवाच मारायचा मनसुबा राजेंनी रचला.
भयाने लटलट कापणार्या पाद्र्यांनी रात्रीच सेंट झेवियरच्या चर्चमधील घंटा बडवायला सुरुवात केली.आता गोव्याचे या फिरंग्यांचे पुरतं नामोनिशान मिटवून टाकायच हा चंगच राजेंनी बांधला.
रात्री मुक्कामानंतर पुन्हा एकदा मराठ्यांनी घेतलेले बेट परत आपल्सा ताब्यात घेण्यासाठी तो विजरई भल्या पहाटेच आला.राजांनी एक टेकडी पाहून तळ ठोकला होता.विजरईला राजांच्या तळाचा ठाव ठिकाणा लागला आणि सकाळीच हा विजरई ती टेकडी चढू लागला.
राजांसोबत खंडोजी बल्लाळ होते.
"युवराज आता जातो नं या फिरंग्यास्नी कापून टाकतो..!"
शंभूराजे बोलले,
"होय,खंडोजी या भूमीला जर रक्ताचाच अभिषेक हवा असेल तर तो जरुर घालू.पण,आपल्या नाही या परक्या फिरंग्याच्या रक्ताचा..जरा आजून म्होर येऊं द्या त्यास्नी..मग दावूच मराठी धोप कशा सापाच्या जिव्हेदत लवलवतात न विंचवाच्या डंखासारख्या डंख मारतात ते..!"
राजांनी मार्यात येईपर्यंत काहीच हालचाल केली नाही.शांत बसून राहीले व जेव्हा तो विजरई मार्यात आला.तेव्हा मराठ्यांनी आपल्या कमरेला असेलेल्या आपल्या कित्येक गनिमांना शांत करुन शांत झालेल्या तलवारी पुन्हा एकदा उपसल्या व फिरंग्यांची धुळधाण केली.फिंरगी सैनिक मराठ्यांचा तो आवेष पाहून टेकडीहून पळत सुटले.फिरंगी सैनिकांनी भयाने नदीत उड्या मारल्या काही बुडून मेले काही वाचले ते गेले.राजांनी विजरईचा पाठलाग केला पण तो निसटला खरा.
_______महाराज तेथून निघून पुन्हा बारदेशावर चालून गेले.फिंरंगाण पार मारुन काढलं..दुर्भाट,जुवे,अंत्रुज,बा
तिकडे फिरंग्यांणी आपला जनाना सामान उचलले वपोर्तुगालला निघण्याची तयारीही केली होती.ते सेमट झेवियरच्या चर्चमध्ये जिवितासाठी करुणा भाकत होते.फिरंग्यांनी अखेर संभाजीराजेंच्या पायाशी नाक घासतच तहाची मागणी केली.
फिंरंग्यांकडे हा एकच शेवटचा मार्ग उरला होता.
राजेंनाही वेळ नव्हताच तिकडे स्वराज्य मोकाट होते.कुणी वेळ साधू नये हि भिती होती.
म्हणून ते तहास तयार झाले.
तितक्यात बातमी आली की,
"शाहआलम स्वराज्यावर चालून येतो आहे."
महाराज काहीसे ओरडलेच....
"काय..!"
महाराजांना जे वाटत होत अखेर तेच झालं.
प्रत्येक वेळी होत असलेली हिच बाजू संभाजी महाराजांच मन बेचैन करत होती.
_______हे फिरंगी लोक कोकणातील गरीब कोळ्यांच्या तरण्याताठ्या पोरी उचलायचे दिवसा धर्मप्रसारासाठी यांचा वापर करायचे रात्री त्यांची शरीर उपभोगायचे.लोकांना पकडायचे धर्म वाटवायचे,मना केली तर नाक कान कापायचे नाहीतर त्यांच्या पाद्र्यांच्या मनावर त्यांच्या शिक्षा ठरलेल्या होत्या.या हरामजाद फिरंगी टोपीकरांनी आमच्या आई बहीणीवर अनन्वीत अत्याचार केले यांना सोडू नका असे महाराजांनी फोंडा सोडतानाच आपल्या मावळ्यांना सांगितले होते,दिसेल तेथून पकडून समोर हजर करा.असाच एक मठ राचोलीचा तो मावळ्यांनी फोडून तोडून पार खणून काढला व त्या गोर्या पाद्र्यांना बैलाला औताला जुपतात असे एका दोरखंडात जूपुन संभाजीराजेंपुढे हजर केले.संभाजी राजेंनी सर्वांना निरखून पाहीले.यात कुणी समर्थांसारखा तर नाहीच पण साधा त्यांचे शिष्य दिवाकर गोसाव्यांसारखा सुद्धा दिसत नाही.ते ही धर्माचाच प्रसार करतात आणि हे?हे धर्माचीच पायवाट तुडवटतात.दुसर्यांचे हक्क व सुख पायदळी तुडवणारा कसला धर्म?
"बाटवणं म्हणजे काय असतं हो?बाटतात ती शरीरं- मनं कुणाला आणि कशी येणार बाटवता?"
तहाचा सर्व मामला कवी कलश व इतरांवर सोपवून संभाजीराजे पुन्हा स्वराज्याकडे निघाले.
______________________________
*पोर्तुगिज सांधनांतील माहीती
मी नदी ओलांडून दुर्भाट मार्गे फोंड्यावर चालून गेलो.तेथे मी सतत नऊ दिवस लढलो.परंतू तुफान पावसामुळे ठरलेल्या मुदतीत मी फोंडा किल्ला काबिज करण्याचे उदिष्ट पुर्ण करु शकलो नाही.त्याचा फायदा संभाजीला मिळाला.तो जातीने सैन्य घेऊन फोंडा येथील आपल्या सैनिकांच्या मदतीला आला.त्याच्यापाशी चांगले घोडदळ असल्यामुळे त्याला परिस्थितीवर मात करने शक्य झाले.आमची परिस्थिती मात्र शोचनिय झाली.कारण आम्हाला कुमक मिळण्याची आशा नव्हती.म्हणून यत्किंचीतही गोंधळ न माजू देता शत्रूशी लढत लढत शिस्तित माघार घेतली.दोन रात्री मी वाटेत काढल्या.एका कोसाचे अंतर पार करायला मला दोन दिवस लागले.परंतू सगळा तोफखाना व नेलेले सामान सुरक्षित आणण्यास मी यशस्वी झालो.
मी गोव्याला येऊन पोहोचल्यावर अवघ्यात शत्रूने सां इश्तेव्हांव(सेंट स्टिफन) ह्या बेटावर हल्ला चढविला.ती बातमी कळताच माझ्या हाताशी जे मुठभर लोक होते त्यांना घेऊन मी दुसर्या दिवशी शत्रूवर चाल करुन गेलो.आम्ही ज्या निश्चयाने शत्रूवर हल्ला केला.तो शत्रू तो निश्चय पाहून भ्याला व त्याने पळ काढायला सुरुवात केली.परंतू आमच्या सैनिकांच्या हातून जे वर्तन घडले ते अतिशय लाजीरवाणे होते.शत्रूचे एक लहान घोडदळ तेथे होते.ते घोडेस्वार पाहून आमच्या सैनिकांना ते आपणावर चालून येत असावेत असे वाटले.त्यांनी शत्रूला पाठ दाखवून पळ काढण्यास सुरुवात केली.आमच्या सैन्याने एवढी दहशत घेतली की,त्या भरात त्यांनी एकदम नदीत उड्या टाकल्या.काही सैनिक नदित बुडून मेले.शेवटी काही माणसांसोबत मी माघारी परतलो.शत्रूने आमचा पाठलाग केला.पण,नंतर त्याने नाद सोडून दिला.त्याच रात्रीची मी नदी ओलांडली आणि आमच्या उत्तरेकडील आरमारातील काही लोकांना नौका घेऊन सां इश्तेव्हांव बेटाकडे जाण्याचा हुकूम दिला...
(टिप-पत्र मोठे असल्याने पत्राचा अनुवादीत काही मुख्य भाग येथे दिला आहे.पुढील पत्र विस्तार भयास्तव देण्याचे टाळत आहे.)
______________________________
"होय मराठ्यांनी तो फोंडा आसमंत गाजवलाय....!यानंतर संभाजीराजे व मराठे अस नाव जरी ऐकल तरी हे फिरंगी आपल्या वरच्या बापाची धावा करायला सुरुवात करायचे इतकी दहशत मराठ्यांनी या फिरंगाणावर बसवली होती.संभाजीराजेंना जर आजून आयुष्य लाभले असते तर पुढील काळात या परक्यांचे पाय या देशाच्या छाताडावर कधी नाचलेच नसते.फोंडा कोटाच्या तटांच्या भिंती आजूनही आपल्याला येसाजी,कृष्णाजी,खंडोजी सारख्यां कित्येक रणमर्द मराठ्यांचे शौर्य तुमच्या कानी सांगतील जरुर.मात्र ते ऐकण्यासाठी आपले कान तेवढे सावध असायला हवेत अन् आपली तेवढी निष्ठा या गडकोट,इतिहासावर असायला हवी..!
मग अमावस्येच्या किर्रर् रात्री सुद्धा या पराक्रमाचे पाहून तुमचे डोळे दिपून जातील."
"मर्यादेयंविराजते"
धन्यवाद..!
संदर्भ-
Shivaji and his times
-jadunath sarkar
*पोर्तुगिज मराठा सबंध
-स.शं.देसाई
*मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३
आशिया विभाग(भाग १ ते ५)
संपादक-ए.बी.द ब्रागांस परेरा
अध्यक्ष पुराणवस्तू समशोधन विभाग,गोवा सरकार
अनुवाद- स.शं.देसाई
(विश्वकोश कार्यालय,वाई)
*ज्वलज्वलंतेजस संभाजीराजा
-डॉ.सदाशिव शिवदे
*शिवपुत्र संभाजी
-डॉ.कमल गोखले
*छावा
-शिवाजी सैवंत
______________________________
संकलन-
नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा