राजगडवरील ती स्मारकशिळा-नवनाथ आहेर

"हि तो नरविरांची मांदियाळी..!"

"सदर फोटोत दिसतोय तो एक 'स्मारक शिळे'चा प्रकार आहे.आयताकार उभट प्रकारची शिळा व वरच्या बाजूस दिवा बत्तीची सोय,काही शिळांना मध्यभागी दिवा लावण्यासाठी कोनाडा असतो.
तात्कालीन कालखंडात विरगळ सोबतच काही ठिकाणी अशाही स्मारक शिळा उभारल्या जायच्या.देव,देश,धर्मासाठी आपला देह त्यागणार्या विराच्या प्रती ती एक निष्ठा वाहण्याचा हा एक प्रयत्न होता अशीच एक स्मारक शिळा तुम्हाला रायगडस्थित शिर्काई देवीच्या नविन घरट्याच्या मागेही दिसेल अन्यही काही ठिकाणी अशा स्मारक शिळा मी पाहिल्या आहे.
वरील फोटो हा राजगडाच्या सुवेळा माचीच्या सोपान मार्गाने बिनीच्या बुरुजाकडे जातानाचा आहे.
सोबतचे गणेश शिल्प मात्र नविन वाटते आहे.पण,हा एक विरोधाभास आहे की ज्या शुर विरांच्या रक्ताने या भूमीला अभिषेक झाला तेव्हा आपले देव देव्हार्यात सुरक्षित राहिले.पण,दुर्दैव आम्ही भुमीपुत्र यांच्या त्यागाला विसरलो.गणेश शिल्पाला छान शेंदूर लावलेला आहे(हे ही चुकच आहे.कुठल्याही वास्तूला शेंदूर वा रंग लावणे हे पुरातत्व खात्याच्या नियमांच्या विरोधात आहे.तसेच असे केल्याने मुळ शिल्पाचे नुकसान होते.शेंदूराच्या लेपाखाली मुर्तीचा मुळ तांदळा कायमचा झाकला जातो.असे अनेक ठिकाणची उदाहरणे सांगता येतील.).मात्र शेजारील हि स्मारक शिळेवर मात्र वर्षानुवर्षे कुणी त्यावर पाणी ओतून चार चिणकीची फुलेही वाहिली नसतील.
_______दुर्गराज राजगड स्वराज्याची पहिली वहिली राजधानी,तिचा यथासांग अभ्यास केल्यास सुवेळा माचीच्या पलीकडील काळेश्वरी बुरुजाच्या आसपासची जागा ही गडाची स्माशानभूमी होती.दक्षिण दिशा हि यमाची होय म्हणून कुठल्याही वास्तूच्या,किल्ल्याच्या,गावाच्या दक्षिण दिशेला स्मशानभूमी वा दफनभूमी असते.(अपवाद वगळता)तेथे काही समाध्या आहेत.
मग,मनात प्रश्न उभा राहतो की ही स्मारक शिळा इथे सुवेळावर कशी?
ती इथे आली की कुणी आणली की  ती येथेच होती?
शिवशाहीत स्मारकशिळा उभारण्याइतपत पराक्रमी व नामवंत असा कोण मातब्बर सुवेळावर मृत्यू पावला आहे?
या 'क' च्या बाराखडीचा अभ्यास केल्यास एक प्रसंग समोर येतो व तो म्हणजे राजाराम महाराज इ.स.१७०० ला स्वर्गलोकी गेले.त्यानंतर अवघ्या तिसर्या वर्षी औरंगजेबाने राजगडास वेढा घातला.सुवेळा माचीचा तटसरनोबत संताजी शिळींबकर होते.
शिळींबकर व राजगड हे नात फार मोठ जिकरीच आणि मोठ महत्वाच आहे ते पुन्हा कधीतरी.....
 तर,नोव्हेंबर १७०३ महिन्याच्या मध्यात संताजी शिळींबकरांनी या औरंगजेबाच्या तोफांच्या तोफगोळ्यांना निधड्या छातीने  टक्कर दिली त्यात ते ०३ डिसेंबर १७०३ रोजी तोफेचा गोळा लागून गतप्राण झाले हि स्मारकशिळा त्यांची तर नसेल?

असू शकते कारण एक तर महाराज गडावर असताना राजगडाशी टक्कर घेण्यासाठी कुणा गनिमाची माय व्याली नाही.तदनंतर राजगडावर वेढा हा प्रकार ऐकिवात नाही.
लढाईचा प्रसंग तो हाच इ.स.१७०३ चा त्याला खालील पुरावे प्रमाण आहेत..

*मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १७ लेख २३-

"क्षत्रीय कुलावंतस श्रीराजाशिवछत्रपती ह्याणी संताजीराव सिलींबकर देशमुख ह्यासी आद्ना केली ऐसी जे-अवरंगजेब किल्ले राजगडास बिलगला आहे.मोर्चे लावून येलगार...करतो.परंतु तुम्ही त्याचा हिसाब न धरिता शर्तीनसी नतिजा पावविता म्हणून...शंकराजी पंडित सचीव ह्याणी लिहिले व सांप्रत तुमचे मर्दानगीचे वर्तमान राजश्री सोनजी फर्जंद ह्याणी लिहिले...तुमचे सेवेचा मुजरा झाला."

११ डिसेंबर १७०३
 (मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड  १७ लेख-२४)
"प्रतापराऊ सिलींबकर देशमुख ह्यास शंकराजी नारायण सचीव.संताजीराऊ सिलींबकर तुमचे बाप राजगडी सुवेळेस खासा मोर्चास होते.औरंगजेबाच्या पातशाही मोर्चाकडून पातशाही मोर्चाकडून त्यास गोळी लागून स्वामी कार्यावरी पडले.ते वर्तमान आजीच राजगडीहून आले."

संदर्भ साभार-
किल्ले राजगड स्थळदर्शन
-श्री.आप्पा परब 

संकलन-
नवनाथ आहेर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी