सह्याद्रीनामा

"न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....!

"सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही.
या सह्याद्रीतील कित्येक मराठी मनांनी आपल्या अस्थिपंजरांचा या उंचीच्या वाढिला हातभार लावला आहे.सह्याद्रीत जन्माला आलोत म्हणजे हा काही नुसता योगायोग नाही येथील मनांनी स्वातंत्र्यदेवतेला आपल्या रक्ताने अभिषेक घालणार्यांची हि समरांगणभूमी आहे.त्या आपल्या पुर्वजांचे पांग फेडण्यासाठी आम्हाला निदान तो  तेजोमय दिव्यासम तेजस्वी व ओजस्वी इतिहास मनात जपता यायलाच हवा."

 न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....!

"सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायाला करा हिमाचल लक्ष खडे
समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते..!

"कुसुमाग्रजांनी वर्णन केल्याप्रमाणे या कड्यां कपार्यांतील वणवे आम्ही आमच्या उरात दडवलेले आहेत.आमच्या बाप दाद्यांनी काबुल-कंधाहार पथावर डंके वाजविले.त्याचा आम्हाला स्वाभिमान असलाच पाहिजे.तो इतिहास आम्ही मना मनात घोटून घोटून भरला पाहिजे.पानिपता सारख्या कित्येंक मैदानांवरील किंकाळ्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी थिजल्यात त्या आम्हाला ऐकू आल्याच पाहिजे."

न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....!

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात…!"

"माफी काय म्हणून दिलीत?म्हणून जाब विचारणार्या धन्याला नेसरीच्या खिंडीत आपल्या देहाच्या बलिदानानेच जवाब देणार्या सरसेनापती प्रतापराव,विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजीं या सात विरांच्या छाताडातील स्वाभिमान आम्हाला आमच्या छाताडात पेटवता,जागवता आलाच पाहिजे...!

न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....!

"पोटच्या पोराचं लगीन मागं टाकून कोंढाणा गाजविणार्या नरविरांचा पराक्रम आम्हाला जसा मानाने जरी पटका डोक्यावर मिरवतात तसा छातीठोक पणे मिरवता आलाच पाहिजे न मिरवता मिरवता ढाल तुटली म्हणून शेला हाताला गुंडाळून कोंढाण्याच्या स्वातंत्र्यलक्ष्मीला आपल्या रुधिरानेच अभिषेक घालणार्या नरविर तान्हाजींच्या ऊरातील ईमानाचा पोत आम्हाला आमच्याही उरात पेटता ठेवता यायलाच हवा..!

न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....!

"मुझे तन चाहिए, ना धन चाहिए
बस अमन से भरा यह वतन चाहिए
जब तक जिंदा रहूं, इस मातृ-भूमि के लिए
और जब मरूं तो तिरंगा ही कफन चाहिए।"
-भगतसिंग

"तिरंगाही कफन चाहिए म्हणणारे भगतसिंग,राजगुरु,सुखदेव यांसारखे कित्येक क्रांतिकारक हसत हसत भारतभुमीच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले,काही मारले गेले,काहींनी स्वत:हून बलिदान दिले.

'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, 
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'

असे म्हणत आपल्याला पंचविसीच्या उंबरीत जान कुर्बान करणार्या क्रांतीकारकांच्या पाऊलांवर पाऊल देऊन जरी आम्हाला चालता नाही आले तरी त्या विचारांनी मात्र प्रेरीत होत.स्वातंत्र्याच्या या पाऊलखुणांना जपता आलंच पाहिजे...!

न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या  भितीशी दोन हात करावेच लागतील....!

"असे रामायण,महाभारत ते १८१८ च्या रायगडावरील परकियांच्या व स्वकीयांच्या तलवार,बाण,तोफांनी कधी मारत तर कधी मरत राखलेला सबंध सिंधु व सिंध प्रांतांतील शुरविरांचे ते मातृभूमीवरील प्रेम आम्हाला आमच्या बाहू,मनगटांत भरता यायलाच हवं..!

न म्हणून म्हणतो त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....!

-नवनाथ आहेर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी