मानाजी पायगुडे-नवनाथ आहेर
______दिल्लीपती पातशहा शहेनशां ए हिंदुस्थां म्हणवून घेणारा औरंगजेब.४ एप्रिल १६७० नरवीर तानाजी मालुसूरेंनी कोंढाणा जिंकला तेव्हापासून मराठे व औरंगजेबाचा सुरु झालेला हा रणसंग्राम अखेर ३ मार्च १७०७ मध्ये नगरमधील भिंगार या गावी तब्बल ३७ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडानंतर संपला.मरेपर्यंत औरंगजेब या शिवराय निर्मित स्वराज्याशी व या बेलाग बुलंद सह्याद्रीशी टक्कर घेत होता.पण मराठे काही त्याला बधले नाहीत.मराठ्यांनी तितक्याच निकराने व बेताने औरंगजेबास जेरीस आणला.अखेर तो संपला.पण, त्याच्या मृत्यूनंतर दिल्लीची जी काही अवस्था झाली ती अत्यंत दयनीय होती.औरंगजेबाला एकूण पाच मुले होती.त्यातील एका मुलाला मुहम्मद सुल्तान ला औरंगजेबाने स्वत:च मारले होते व आता दुसरा पुत्र अकबर याच्या मागे तो दख्खनेत त्याचा पाठलाग करत होता.उरलेल्या ३ शाहजाद्यांमध्ये आता तख्तासाठी भांडण लढाया सुरु झाल्या.त्यातील मुहमद आझम व मुहम्मद मुअझ्झम यांच्यात जजाऊला लढाई झाली व नंतर मुहम्मद मुअझ्झम दिल्लीच्या गादीवर आला.त्याने नंतर आपला शेवटचा भाऊ मुहम्मद कामबक्षलाही ठार केल.त्यानंतर बादशहा मुअझ्झमचाही मृत्यू झाला....
अशाच प्रकारे दिल्लीची शाही दिवसेंदिवस खिळखिळी होत होती.अगदी कुणीही येऊन दिल्ली लुटत होत.दिल्लीला कुणी वाली नव्हता आता.साधारण १७४८ पर्यंत हाच गोंधळ दिल्लीत चालू होता.
________इ.स. १७४७ मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा नादीरशहाचा खून झाला. त्यामुळे त्याचा सेनापती अहमदशहा अब्दालीने सत्ता बळकावली. सत्तेवर येताच त्याने हिंदुस्थानातील राजकिय गोंधळाचा फायदा घेऊन जानेवरी १७४८ मध्ये हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. पंजाबचा मोगल सुभेदार शहानवाजखानाचा पराभव करून दिल्लीवर चाल केली. दिल्लीच्या बादशहाने (महमदशहा) त्याच्याविरुद्ध आपला मुलगा अहमदशहा वजीर कमरुद्दीन व मीरबक्षी सफदरजंग यांना पाठविले. २१ मार्च रोजी मनुपूर तेथे लढाई होऊन अब्दालीचा पराभव झाला पण वजीर कमरुद्दीन मारला गेला.
तेथे अहमदशहा अब्दालीचा पराभव झाला.तो तेथून माघारी फिरला आपली माणसं ठेवीत तो पुन्हा काबूलला गेला. दिल्लीत अनेक नात्यांचे गोंधळ होते,वजीर व बादशहांचे गोंधळ होते.यातच राहिलखंडातील आफगाण रोहील्यांनी दिल्लीवर हल्ला केला.यावेळी मात्र दिल्लीला मराठ्यांची आठवण झाली.शिंदे आणि होळकर दिल्लीला गेले व आफगाण रोहील्यांचा पराभव केला.त्यानंतर १७५२ मध्ये मराठे व दिल्ली यामध्ये एक तह झाला त्यानुसार मराठ्यांना दिल्लीचे संरक्षक म्हणून नेमले गेले.आजमेर व आग्रा हे सुभे तसेच जेथे जेथे मोघलांचे साम्राज्य होते.त्या साम्रज्यात चौथाईचे हक्क मराठ्यांना देण्यात आले.
_____१७५६-५७ मध्ये अहमदशहा अब्दाली पुन्हा एकदा दिल्लीवर चालून आला.यावेळी त्याने अमानुष कत्तल केली.मथुरा व गोकुळ वृंदावन येथील गाई कापल्या,देऊळे उध्वस्त केली.मुंडक्यांचे मिनारच्या मिनार रचले.तहान्वये मराठे दिल्लीच्या संरक्षणाकरीता निघाले.राघोबादादांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीकडे कुच केले.मराठे येतात हे कळताच अहमदशहा अब्दाली मिळालेली लुट घेऊन पुन्हा माघारी निघाला.मराठे अब्दालीचा पाठलाग करत निघाले.परंतू तो पर्यंत अब्दाली बराच पुढे गेला.त्याने आपला मुलगा तैमूरखान यास लाहोरच्या किल्ल्यात ठेवले.१७५८ च्या सुरुवातीला मराठे लाहोरच्या जवळ पोहोचले.मराठ्यांतर्फे सेनेचे नेतृत्व मानाजी पायगुडे करीत होते. मावळात लाल मातीत घुसळून तयार झालेला हा फाकडा मराठी गडी लाहोरच्या वेशीवर धडक द्यायला निघाला होता.मराठे लाहोरच्या किल्ल्याला वेध घेऊ लागले तसे अब्दालीचा पुत्र तैमुरशाह आणि सेनापती जहानखान हे लढाईसाठी तयार होऊ झाले पण समोर त्यांना मराठा आणि शीख सैन्य वाढताना दिसू लागले. त्यांना दहशत बसली,त्यांनी कच खाल्ली.आपला निभाव लागणार नाही हे पाहून ते मौल्यवान सामान घेवून मोजक्या फौजेनिशी लाहोरहून अटकच्या दिशेने निघाले. लाहोरचा किल्ला पडला. मराठ्यांची एक तुकडी किल्ल्यात शिरली.तैमूरखानाने त्याच्याकडे असलेल्या गुलामांची मुक्तता केली.त्यातील एक गुलामाने तहमासनामा या आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे की "मराठे आले म्हणून आमची मुक्तता झाली" त्याला प्रचंड प्रमाणात आनंद झाला.म्हणून तो लाहोरच्या किल्ल्यात मराठ्यांना घेण्यासाठी म्हणून धावत गेला.त्याने आनंदभरे किल्ल्याचे दार उघडले व मराठ्यांना आत घेतले. त्या लाहोरच्या किल्ल्यात पाऊल टाकणारा पहीला वीर होता मानाजी पायगुडे.ही सर्व मावळ मातीत जन्माला आलेली माणसं.कुठे लाहोर कुठे अटक कुठे पेशावर त्यापुढे खैबर खिंड.मराठे याचवेळी अटकेपर्यंत पोहोचले मराठ्यांनी सतलज रावी चिनाब नद्यापर्यंत मजल मारली.परंतू वरती बर्फ कोसळायला लागल्याने चिनाबचे पाणी अतिशय थंड होते.मराठ्यांना ती नदी ओलांडता आली नाही व तेवढा वेळ अब्दाली तेथून निसटला.
_____१४ जानेवारी १७६१ चे जे पानिपत युद्ध झाले त्याला मुख्य कारण म्हणजे १७५२ मध्ये मराठे व दिल्लीत झालेला तह.या तहान्वये मराठ्यांनी सदाशिवराव भाऊ,विश्वासराव पेशवे ,इब्राहिम खान गारदी ,जनकोजी शिंदे,मल्हारराव होळकर,महादजी शिंदे,पुरंदरे विंचूरकर,सिधोजी,घार्गे आदी सेनापतींच्या नेतृत्वाखाली अब्दालीशी लढा घेतला.त्यात अनेक मराठी सैन्य मारलं गेलं.यातील सदाशिवराऊ भाऊं बरोबर जे पथक होते.विठ्ठल शिवदेव,अंताजी माणकेश्वर,समशेर बहाद्दूर,खंडेराव नाईक निंबाळकर,महादजी नाईक निंबाळकर,सुभानराव माने,अमरसिंह जाधवराव,यशवंतराव पवार,दमाजी गायकवाड यात मानाजी पायगुडे सुद्धा होते.ते पानिपत रणसंग्रामात रणांगणावर पडले.
"मावळांतील माजघरांतील कित्येक कुंकवाचे करंडे पानिपतच्या रणभूमीत सांडले...!"
या तमाम युद्ध प्रसंगांतील वीर मानाजी पायगुडे यांचे वंशज श्री.राजाभाऊ पायगुडे यांच्या कडील तात्कालीन शस्त्रांची माझ्या अल्पबुद्धीस माहीत असलेली थोडीफार माहीती दोन शब्दांत सांगण्याचे महदभाग्य दुर्गदुर्गेश्वर रायगड स्थित दिवाण ए आम मध्ये मिळालं हे माझ मोठ भाग्य होय.या तलवार,कट्यारींनी,भाले,पट्टे आदी शस्त्रांनी तात्कालीन स्वराज्य राखलं यांच्या अस्तित्वाचा महीमा न्यारा आहे.यांना चालविणारे हात ईमानी होते.त्यांनी आपले इमान स्वराज्याच्या उंबरठ्यात वाहीले होते.स्वराज्यातील तुळस राखली जावी म्हणून त्या रणधुरंधरांनी आपल्या घरच्या तुळशी वृंदावनाचा मसनवाटा करुन घेतला होता.या आपल्या पुर्वजांच्या वंशजांचा आपण सन्मान केला पाहिजे.
त्यांच्याकडील शस्त्रे हातात घेऊन न्याहाळली पाहिजेत.ती नजर आणि आपले ईमान तिथपोहोत पोहोचले तर ही मुकी शस्त्रे ही त्यांच्या पराक्रमाच्या गाथाच गाथा आपल्या समोर उलगडतील...!
धन्यवाद...!
(टिप-हा सर्व रणसंग्राम मोठा आहे येथे चार शब्दांत देणे शक्य नाही.चुक भूल देणे घेणे)
माहिती साभार-
*निनाद बेडेकरांचे पानिपत रणसंग्रामावरील व्याख्यान
*पानिपत-विश्वास पाटील
*आणि पानिपत-संजय सोनवणी
*ज्ञानकोश-खंड ७
संपादक
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
संकलन-
नवनाथ आहेर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा