किल्ले सुधागड(नविन माहिती) - नवनाथ आहेर

______किल्ले सुधागड असे इंटरनेटवर सर्च केल्यावर फोटोत आहे ती माहीती आपल्याला दिसते.मग विकिपीडीया,साईट,वा ब्लॉग कोणताही असो.पण या सर्वांवर एकच माहीती दिसतेय.
१)माहीतीमध्ये सर्रास सुधागडला भोरपगड असे नाव दिलेले आहे.अर्थात मी ही पुर्वी असेच बोलत होतो.पण गेल्या तिनेक वर्षात सुधागडाचा निटसा अभ्यास झाल्याने अस लक्षात आले की शिवपुर्व कालखंडात किल्ले सुधागडचे नाव हे फक्त 'भोरप' असे होते.शिवाजी महाराजांनी  गुरुवार,११ सप्टेंबर १६५६  रोजी बहुतांशी गडांचे नव्याने नामकरण केले.त्यात सुधागडाचेही नामकरण झाले असावे.त्याच्या आधी समकालीन साधनांत  सुधागडास केवळ 'भोरप' असे नाव असल्याचेच उल्लेख मिळतात.तसेच स्थानिक वृद्ध लोक फक्त 'भोराई देवीचा डोंगर' असे संबोधतात.

२)इंटरनेटवरील माहितीतील दुसरा उल्लेख म्हणजे
शिवाजी महाराजांनी इ.स.१६४८ रोजी भोरप जिंकून स्वराज्यात आणला.हा उल्लेख योग्य आहे.
त्यास खालील पुरावे प्रमाण आहेत.
*शिवाजी महाराजांनी कांगोरी,तुंग तिकोना,लोहगड,राजमाची,कुवारी,भोरप,घनगड,केळंजा,आदि किल्ले घेतले.
-मल्हार रामराव चिटणिस बखर

*शिवाजीराजांनी कांगोरी,तुंग,तिकोना,भोरप,कुंवारी,लोहगड,राजमाची हे सात किल्ले बलात्कारे घेतले.
-मराठ्यांची बखर

*कुलाब्याचे बोलणे येताच किल्ल्यास येऊन कांगोरी,भोरप,रोहिडा,वैराटगड,चंदन,वंदन,मोरगिरी,पन्हाळा,पवनगड,विशाळगड,रांगणा,सातारा,परळी वगैरे किल्ल्याचे हषम लोक यांणी शृंगारपूर येथे दळवी(सुर्वे)राजे होते.ते बदमस्त जाले,महाराजांच्या आद्नेत न वागत सबब बुडविले.
-श्रीशिवदिग्विजय बखर

वरील साधनांतील उल्लेख पाहता ज्यावेळी महाराज १६४८ ला घाटावरुन कोकणात उतरले त्यावेळी वरील किल्ले महाराजांनी घेतले त्यात 'भोरप' देखील स्वराज्यात आला.

३)इंटरनेट व ब्लॉगर्सच्या माहीतीतील तिसरा मुद्दा म्हणजे-
"इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारकेयांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्‍यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले."

हा जो उल्लेख आहे तो थोडासा चुकीचा आहे.वरील लढाई हि १६९४ च्या आसपास घडलेली आहे.घटना बरोबर आहे सरदारांची व मावळ्यांची नावेही बरोबर आहेत फक्त साल १६४८ नाही तर ते १६९४ च्या आसपास आहे.यासबंधी खालील काही महत्वाचे पुरावे-
*१५ डिसेंबर १६९४ सालचे एक पत्र अर्थात इनामाची सनद आहे.ती पोलादपूर येथील चित्रे दप्तरात मिळाली ती शिवचरीत्र साहित्यखंड १० मध्ये प्रकाशित झालेली आहे.विस्तार भयास्तव ची सनद येथे देण्याचे टाळतो.तर त्यामध्ये संभाजी हैबतराव देशमुख यांना मौजे कान्हवली तर्फ हे गाव इनाम दिल्याचे उल्लेख आहेत.
*दुसरी इनामाची सनद हि याच लढाईतील सरनाईक मालजी बिन अतोजी जाधव यांच्या नावाची आहे.हि आहे २४ जून १७०२ ची त्यात हि सनद खुद्द ताराबाईंचे पुत्र शिवाजीराजे दुसरे यांच्या आद्नेहून लिहीली गेली आहे.त्यात सुधागडचे सरनाईक मालजी बिन अतोजी जाधव यांनी १६९४ च्या आसपास झालेल्या लढाईचा विचार करुन मौजे धोंडसे तर्फ अतोण हे गाव इनाम म्हणून दिलेले आहे.

हि दोनही इनामपत्रे ही या गोष्टीस पुरावे आहेत की सुधागड संभाजी हैबतराव देशमुख यांनी माळा लावून घेतला.त्यात त्यांच्या सोबत मालजी बिन अतोजी जाधव हे ही होते.हि घटना १६९४ ला घडलेली आहे या विधानास इनाम पत्रांतील तारीख,तिथी आपणास साक्ष देत आहे.

४)इंटरनेट व ब्लॉगर्सच्या माहीतीतील एक आणखी मुद्दा म्हणजे नारो मुकुंद यांच्या सचिव पदाचा.तर शिवाजी महाराजांच्या काळात नारो मुकुंद हे सुधागडच्या सबनिस पदावर होते.ते तेव्हा पंत सचिव नव्हते.पण,पुढे राजाराम महाराजांच्या काळात नारो मुकुंद यांचा मुलगा शंकराजी नारायण हे मात्र सुधागडचे पंत सचिव होते.

______तरी विनंती आहे की सुधागडचा इतिहास सोशल मिडीयावर टाकताना वरील बाबींचा विचार करुन मगच टाकावा.

धन्यवाद...!

-नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)

     

#किल्ले_सुधागड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी