किल्ले राजगड इतिहास व स्थलदर्शन-नवनाथ आहेर


किल्ले राजगड:-
भाग:-१ गाथा दुर्गराज राजगडाची..
_____पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या काठावर व गुंजण मावळाच्या आसमंतात उभा असलेला किल्ले राजगड.सर्वात उंच बालेकिल्ला १३९४ मिटर लाभलेला हा किल्ला.शिवभूपतींच्या स्वराज्याच्या उंचीचा विस्तार दर्शवतो.पुरंधर, सिंहगड, तोरणा या तिनही किल्ल्यांचे बेलाग संरक्षण राजगडास लाभले आहे.त्यातच राजगडाच्या अपसव्य असणार्या तीन माच्या या गडाचे अभेद्यपण राखुन आहेत.शिवरायांनी बांधलेला हा पहिला किल्ला शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची चुणुक दाखवतो.स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन, अभिमानाने स्वराज्य व गुंजण मावळाचे रक्षण करता झालेला दुर्गराज राजगड हा दुर्गांची विरमाळ  जोडणारा एक महत्वाचा दुवा.
_____तर मित्रहो, राजगडास बिरमदेवाचा डोंगर,मुरुमदेवगड, मुरुंबदेवगड, मुरबाद डोंगर, दुरगादेवीचा डोंगर, शहामृगपर्वत, राजगड या नावांनी संबोधले जाते.या किल्ल्यास आफाट असा इतिहास लाभलेला आहे.त्या इतिहास व किल्ल्यावर घडलेल्या ज्ञात अज्ञात घटनांना साक्षी ठेवत व शिवभूपतींच्या अशिर्वादे मी राजगड किल्ल्याबाबतची लेखनमाला सुरु करतोय.समस्त गडदुर्गांच्या धारकर्यांच्या, राजगडावरील पद्मावती मातेच्या, शिवरायांच्या व गडादुर्गांच्या धुळीकणांचरणी अर्पण ....
_____सर्व प्रथम आपण दुर्गराज राजगडाचे स्थलदर्शन व नंतर क्रमाक्रमाने किल्ल्यावरील महत्वाच्या घटनांवल प्रकाश टाकुयात..
तसा, सह्याद्री सर्व ऋतुंत बहारलेलाच असतो.परंतु, प्रजन्यकाळ सरुन गेल्यावर माझा सह्याद्री जो हिरव्या कंच नेसूचा शालू नेसतो.त्यात त्याच मनमोहक व सुंदर साजेस रुप मनाला मोहवु टाकत.चला तर गडे हो, करुयात सफर दुर्गराज राजगडाची, स्वराज्याच्या पहिल्या वहिल्या राजधानीची.आपण शिवापट्टण( पाली) दरवाजाकडुन सुरुवात करुयात.कारण, महादरवाजा हेच किल्ल्याचे महत्वाचे प्रवेशद्वार असते.किल्ल्याचा अभ्यास करताना अनुषंगानेच तो महादरवाजाकडुनच करावा लागतो.

म्यान दरवाजा:-
     पाली गावात आल्यानंतर तुमच्या डोळ्यांना राजगडाचा आक्राळ विक्राळ पसारा दिसु लागेल.हातात पाण्याची बाटली घेऊन आपण चढाईस सरुवात करुयात.जरा जपुन हं..! तो दुर्गांचा राजा दुर्गराज राजगड आहे.घाम निघतो.वरती गेल्यानंतर नागमोडी वाट करुन तटबंधी उजव्या हातास ठेवत एक वाट पुढे एका दरवाजा जवळ जाते.शिवरायांनी तटबंधी उजव्या बाजुस का ठेवावी हे सुद्धा एक दुर्गविज्ञान आहे.मित्रहो..जेव्हा, शत्रू किल्ल्यावर चाल करुन येतो.त्याच्या उजव्या हातात शस्र व डाव्या हातात ढाल असते.आता उजव्या बाजुच्या तटबंधीहुन शिबंदिने कलेला हल्ला तो ढालीनेच रोखु शकतो.जसे, दगड असतील, बाण किंवा इतर काहि.परंतु,दरवाजाकडे जाताना ढालीचा हात बाहेरील बाजुस राहतो.परिणामी तो तटबंधीवरुन झालेला हल्ला उजव्या हातातील तलवार किंवा भाल्याने रोखू शकत नाही.परीणामी त्याचा तिथेच अंत होतो.हे झाले यामागचे कारण.
    आता तुम्ही सरळ पुढे चालत आलात की तुम्हाला पहिला दरवाजा लागेल तो म्हणजे "म्यान दरवाजा".म्यान म्हणजे महादरवाजाचा आधिचा दरवाजा.ज्याप्रमाणे, तरवार म्यान मध्ये सुरक्षित असते.त्याच प्रमाणे महादरवाजाचे संरक्षण हा म्यान दरवाजा करत असतो.कोणत्याही किल्ल्यास कधीच सरळ महाद्वार नसतेच.थोडेफार अपवाद असतील पण, महादरवाजाच्या अगोदर एक किंवा दोन दरवाजे असतातच.या दरवाजाच्या आत गेल्यावर तुम्हाला डावीकडे पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.या दरवाजाच्या वरती सज्जा आहे.या सज्जाची रचनाही लढावु केली आहे.समोरील आसमंतावर नजर ठेवण्याठी व सज्जावरील जंग्यातुन बाण, भाला बरच्यांनी शत्रूवर मारा करती यावा.म्हणून,  याची रचना करण्यात आली होती.
_____
राजदरवाजा किंवा महादरवाजा :-
    म्यान दरवाजापासुन पुढे चालत आलात की, गोमुखी बांधणीच्या उत्तरेकडे चढणार्या पायर्या तुम्हास लागतील.या मार्गाच्या डावीकडील तटबंधीत निरनिराळ्या कोनांतुन खाली शत्रुवर मारा करु शकतील या प्रकारच्या जंग्या ठेवण्यात आल्या आहेत.त्या पायर्या सोबतच तुम्हास उजवीकडे अजुन काहि पायर्या दिसतील त्या उतरल्या की तुम्ही एका बुरुजावरील सज्जावर जातात.त्याचीही रचना लढावु आहे.लहान मोठ्या जंग्यांनी तो सज्ज आहे.आता तो बघुन तुम्ही पुन्हा मुख्य पयरीमार्गावर याल.तो मार्ग तसाच पुढे चालत चालत समोर एक भला थोरला दरवाजा लागेल.हाच तो महादरवाजा किंवा राज दरवाजा.याच्या बाहेरील बाजू लगत एक देवडी आहे.या देवडीत पुर्वी काहींच्या मते मारुतीचे शिल्प होते.ते आता तेथे नाही.
      तुम्ही आता या महादरवाजापुढे आलात.जरा थांबा..…! पहा, विचार करा, आठवा.याच दरवाजातुन आपल्या राजेंची पालखी कित्येकदा आली गेली.राजमाता, आष्टराज्ञी, कन्यका, जामात, युवराज, स्नुषा, नात .इत्यादी सर्व राजघऱाण्याती सान थोर माणसे याच दरवाजातून ये जा करत असत.ज्यांना पालखीचे मान होते.ते सर्वच.मंत्रीगण मातब्बर सरदार, परदेशीय वकील सर्व येताना जाताना या दरवाजाने स्वत: पाहिलेत.
"जरा, त्याला करुवाळत जवळ घेत विचारा.कसा होता रे माझा राजा..?कसा होता त्याचा दरारा...?बेतलेल्या प्रसंगी कसे मार्ग काढत स्वराज्य रक्षिले..वाढविले..?कसे सांग ना..?
तुमच्या मनात निस्वार्थी भावना असतील.तर, तो मनीचे गुज तुमच्या जवळ नक्कीच खोलेल."
_____या महादरवाजाची थोरवी मोठी.जोपर्यंत शिवरा़य हयात होते.तो पर्यंत एकाही गनिमाची टाप टाप झाली नाहि.या दरवाजास बिलगण्याची.स्वराज्यासाठी प्राण अर्पित केलेल्या ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या पदस्पर्शाने व शिवराय, संभाजीराजे, राजाराम महाराज या तीनही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महादरवाजा व ती माती.त्या दरवाजावरील माती हातात घेऊन कपाळी ल्या.ती माती शुरतेचा वारसा सांगणार्या , हयातभर सह्याद्रीत चंजी तंजावर पोहोत दौड घेणार्या, क्षात्रतेजाने चमचमणार्या माझ्या शिवबाराजेंच्या व ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या चरणांची धूळ आहे.ती भाळी लेण्यास कधी चुकु नकात.ती माती भाळी लेवून शपथ घ्या.की हा माझ्या राजांनी बांधलेला राजधानीचा किल्ला.यावर मी कचरा करणार नाही, गडाच्या अस्तीत्वाला धोका पोहचेल असे गैर काहि करणार नाही.लैला मजनु सारखे ठील्लार चाळे करत.तो त्यांचा तेजोमय पराक्रम मातीत मिसळविणार नाहि.उतणार नाहि , मातणार नाही.घेतला वसा कधी टाकणार नाही.
_____चला आता महादरवाज्याच्या आत प्रवेश करा.महादरवाजाच्या आत उजव्या बाजूला एक शिलालेख आहे.पण, तो काळीकाळाच्या ओघात नष्ट होत आलाय.तो वाचता येत नाही.या शिलालेखाच्या वरच्या बाजुस खांबांवर उभी असलेली दौलतबंकीची सदर आहे.दौलत बंकी म्हणजे, द्वारपाळ.माचीवरील सर्व पहारा, गस्त, टेहाळणी, चौकाची जबाबदारी याच्यावर होती.महाद्वाराच्या डावीकडे काही सैनिकांच्या देवड्या आहेत.
    महाद्रारावरील चुनेगच्चीत डावीकडून बालेकिल्लावरुन आलेला एक मार्ग दिसते.तो बालेकिल्ल्यावरील आपात्कालीन मार्ग होता.पद्मावतीमाची संरक्षक हुड्यातुन हा मार्ग खाली उतरत होता.
सर्वभक्षी कळाच्या ओघात व प्रशासन  वाढत्या दुर्लक्षान तो नष्ट होत चाललेला आहे.मी स्वत: कित्येकदा जाऊन पाहीलाय तो पद्मावती माची संरक्षक हुडा गुडघाभर मातीने गाडला आहे.
पुढे तो संपुर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.नष्ट होण्याच्या आत हाता खोरे घमेले घेऊन काहितरी करायला हव..
    पुढे चालत गेलात तर तुम्हाला डाव्या बाजुला एक पाण्याचा तलाव दिसेल.राजमाता जिजाऊंचा वाडा अगदीच जवळ असल्यामुळे त्यामुळे ते पाणी ते वापरत असावेत.काहिजण बोलतात तो घोड्यांा पाणि पिण्यासाठीचा तलाव आहे.रण, एक सांगू इच्छीतो कुठल्याही गडावर घोडे जात नसत.अपवाद असतील काही राजगडासारख्या गडावर घोडा नेला.तर, तो तिथेच जिव सोडेल हे मात्र नक्की.
_____अशाप्रकारे तुम्ही किल्ल्यावर पोहचलात.समोरचा जो पसारा दिसतोय तीच पद्मावती माची होय.


गाथा दुर्गराज राजगडाची भाग-२
स्थलदर्शन
_____मागिल भागात आपण किल्ले राजगडाची सफर करता करता राजमाता जिजाऊंच्या वाड्यामागिल तलावापर्यंत आलो होतो.आता तेथून पुढे निघुयात.
________
तटसरनौबत सदर :-
   पुढे गेल्यावर तुम्हाला अर्धवट स्थितीतील एका इमारतीचे बांधकाम दिसेल.ती इमारत म्हणजेच, तटसरनौबताची सदर होय.पद्मावती माची हि एक महत्वाची माची होती.राजमाता जिजाऊंचे वास्तव्यस्थान, महत्वाचे शासकीय आधिकार्यांचे वास्तव्य, अन्नधान्याची कोठारे, दुय्यम प्रकारच्या राजकीय संपत्तीची कोठारे होती. म्हणजे, तलम कापड, तलवारी, ढाली, भाले, बंदुका, बाण, इत्यादी.गडावरील या कोठारांना शेकारणी साठी लागणारे गवत, कडधान्ये, मसाले, फळे, दुध, भाज्या इ.सामान गड रहाळातुन वरती यायचे. त्यावर, नियंत्रण ठेवण्याचे काम या तटसरनौबताचे होते.त्याचप्रमाणे,गड रहाळातील पंचायत खटले,देणे दारीचे, मान-पानाचे, रान-वनाचे, गुरा-ढोरांचे दिवाणी मामले याच सदरेवर सोडविले जात असत.या ठिकाणी ज्यांचे समाधान झाले नाहि.तर, वरती बालेकिल्ल्यावरील दिवाण ए खास मधील सदरेत हे मामले सोडविले जात.म्हणजे, हि सदर थोडक्यात एक प्रकारचे दुय्य्म न्यायालयच होते.जसे, आजचे फौजदारी न्यायालय.१९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडात हि सदर सुस्थितीत होती.याचे फोटो मला जाणकारांकडुन मिळाले होते.लोखंडी पत्र्याचे छप्पर असणार्या या सदरेची डागडुजी बहुतेक इंग्रजांनी केली असावी.
____
सदरेखालील तळघर :-
    पद्मावतीमाचीवरील या तटसरनौबताच्या सदरेच्या खाली.एक तळघर आहे.गेल्यास तुम्हाला ते दिसेल येथुन नाहि दिसणार.त्या तळघराच्या बाबतीत अनेक जण अनेक मुद्दे मांडतात.काहिजण म्हणतात की खजिना ठेवण्यासाठी याचा वापर होत असावा.काहिजण बोलतात गुप्त मसलतीसाठी याचा वापर होत असावा.पण, जिथे ठीक श्वासही घेता येत नाहि.तिथे गुप्त मसलत या मुळ विधानाच दणका बसतो.खजिना हा बालेकिल्ल्यावरील वास्तूंत ठेवला जाई.ते पुढे पाहुच.मग, या तळघराचे नक्की काय प्रयोजन असावे.माझ्याही मते हे एक त्याकाळचे कारागृहच होते.सर्व सामान्य गुन्हेगाराला न्यायनिवाडा होईपर्यंत.या तळघरात डांबुन ठेवले जात असावे.
_____
सदरे बाजुच्या इमारती:-
     या इमारती प्रामुख्याने तटसरनौबत, शासकीय आधिकारी, राजमाता जिजाऊंचे निवासस्थान, अंबारखाना इत्यादी.या इमारती आहेत.काहिजण बोलतात ते दारु गोळा कोठार आहे.तुम्ही जर खरच गडकिल्ल्यांचे अभ्यासक असाल तर,  या गोष्टीवर तुम्ही काडीमात्रही विश्वास ठेवणार नाहित.कारण, दारुगोळा कोठार हे मनुष्य वस्ती पासून काहिशा अंतरावरच लांब असते.त्याच्याच बाजुला लांबच लांब असे चौथरे आहेत.त्या कचेर्यांचे चौथरे आहेत.
______
महादेव मंदिर:-
 पुढे तुम्हास काहि पायर्या लागतील त्या पायर्या संपताच डाव्या हाताला एक छोटेखानी मंदिर तुम्हास दिसेल.तेच भगवान श्री महादेवाचे मंदिर होय.
______
महादेव टाके:-
    महादेव मंदिराच्या अगदिच मागच्या बाजुस एक खोदिव टाके आहे.यातील पाणि शिवकालात पुजा व इतर शुभ कार्यांसाठी वापरत होते.
_____
छप्पर टाके :-
    महादेव टाक्याच्या बाजुलाच छप्पर असलेले दोन टाके आहेत.साधारण मार्च पर्यंत या टाक्यांमधील पाणि पिण्यास मिळते.पुर्वी सुद्धा या टाक्यांतील पाणि हे पिण्यासाठीच वापरले जात होते.
_____
पद्मावती माता मंदिर :-
   चला आता या टाक्यांच्या उजव्या हाताला एक मोठ मंदिर तुम्हाला सुस्थितीत दिसेल.हेच पद्मावती मातेचे मंदिर होय.राजगडाचा हा डोंगर म्हणजे ब्रम्हऋषींची तपोभुमी व त्यांची पत्नी म्हणजेच हि पद्मावती माता.कालोघातात अनेक मंदिरे बांधली गेली.मात्र स्थान मात्र तेच आहे.काहि समाजकंटकांनी पद्मावती मातेची मुळ शिवकालीन शिवरायांनी प्राण प्रतिष्ठापित केलेली मुर्ती पद्मावती तलावात टाकुन दिली होती.त्यानंतर, १९ व्या शतकात भोर संस्थानाने पुन्हा रिक्त मंदिरात एक घडीव पद्मावती मातेची मुर्ती प्रतिष्ठापित केली.गाभार्याबाहेरील ती मुर्ती हि शिवकालीन आहे.पद्मावती मंदिराच्या उजव्या हातास काहि पाण्याची टाके आहेत.
_____
पद्मावती तलाव:-
  आता त्याच बाजूने आता खाली चला.तुम्हाला उजव्या बाजूस मोठ्ठा तलाव दिसेल.तोच हा पद्मावती तलाव होय.पद्मावती माचीवरील मंत्रीगण, ब्राम्हणगण हे सर्वच हे पाणी वापरण्यासाठी वापरत होते.श्री महादेवा शपथ खोट नाहि बोलणार.ऐन पावसाळ्यात व ऐन हिवाळ्यात मी पहाटे पाच वाजता या तलावावर(तलावात नाहि.).स्नान केले आहे.(रात्रीचा मुक्काम नव्हता.गडच रात्री २वाजता चढुन गेलो होतो.नाहितर आजुन पुरातत्व खाते माझ्यावर तक्रार दाखल करायचे.एवढ्यात ते पटाईत आहेत.बाकी संपुर्ण किल्ला का जमिनदोस्त होईनात.असो).त्या स्वर्गसुखाचा अनुभूती मी घेतली आहे.तुम्हीही कधीतरी नक्की घ्या.
    बर आता तुम्ही पद्मावती तलावाच्या बांधार्यावर आलात.समोर निळेशार पाणि दिसतय.डाव्या हाताला पद्मावती मंदिराकडे जाणारा दुहेरी तटबंधीयुक्त मार्ग दिसतोय.आता जरा उजव्या बाजुला बघा.ते पलिकडे कोपर्यात.काहि शेंदुर लावलेले देव दिसतायेत का..? 
तर त्या आहेत सात आसरा.म्हणजे सात प्रकारच्या जलदेवता.१)मच्छी-मासा२)कूर्मी-कासव३)कर्कटी-खेकडा४)दुर्दरी-बेडुक५)मकरी-मगर६)जतुपी-चतूर७)सोमपा-याकोळी या त्या सात देवता आहेत(हे मत अंतिम नाहि).त्याच प्रमाणे काहि साधनांनुसार तेथेच वाळंजाई देवीचेही ठाणे आहे.जे तोरणा किल्ल्याच्या वाळंजाई दरवाजाच्या खालील बाजुस आहे तसेच.
_____ 
गुप्त दरवाजा(चोर दरवाजा)-
    चला आता त्याच पद्मावती तलावाच्या बांधार्याच्या मागे म्हणजे अगदी उलट चार पाऊले मागे जा.दिसतेय का काहि..?दिसतय ना तोच हा चोर दरवाजा.खर तर आपण यास चोर दरवाजा संबोधू नये.कारण,येथून काहि चोरी करणारे लोक येत जात नसत.तर, हा एक अपात्कालीन मार्ग होता.आता जरी तुम्हाला त्या ठिकाणी लोखंडी रेलिंग दिसतील.परंतु, शिवरायांच्या कालखंडात याठीकाणी साधी मळलेली वाट होती.त्यामुळे, शत्रू दुरुन देखील इथे दरवाजा आहे किंवा असेल हे साधे मत सुद्धा वर्तवू शकत नव्हता.तर, जरा चार पाऊले या दरवाजा मार्गे खाली उतरा बर!बघा समोर अहाहा काय तो देखणा आरस नजारा आहे.खाली अगदीच समोर एखादे गाव  दिसतेय काय..?ते गुंजवणे गाव आहे बर का..! या दरवाजातील मार्ग थेट त्या गावात निघतो.चला आता परत वर या.वर आल्यावर डाव्या बाजुला चार पाऊले चाला.उजव्या बाजुला एक दगडी चौथरा दिसतोय काय..? तो चौथरा बहुतेक या दरवाजाने काहि ओझी वाहुन आणल्यास ती ओझी तात्पुरत्या आरामासाठी तेथे त्या चौथर्यावर ठेवली जात असावीत.
चला पुढे पुढे गेल्यावर तटबंधी लगतच एक उजव्या व एक  डाव्या बाजुला असे दोन बुरुंज आहेत. मार्गासनी-वेल्हे, मार्गासनी-वेल्हे,पावे-वाजेघर,वाजेघर-शिवापट्टण, शिवापट्टण-भुतोंडे इत्यादी मार्ग व पाली ते महादरवाजा, गुंजवणे ते गुप्त दरवाजा या मार्गावर या बुरुंजांवरील तोफा.शिवाच्या तिसर्या डोळ्यासम नजर ठेवून होत्या.या तिसर्या डोळ्यास पाहुन व शिवाच्या शिवगणांस पाहुन शत्रू कधी इकडे फीरकलाच नाहि.इतका त्याचा दरारा.त्या दरार्याची साक्ष देतोय तो दुर्गराज राजगड.ठिल्लार चाळे करत या ठिकाणी सेल्फीच्या नावाखाली हेटाळणी करणार्या भैताडांस तो कधीच कळला नाही, कळणारही नाहि.
_______
उध्वस्त चौथरे :-
उजवी कडे वळा.दुहेरी चटबंधीचा आता नविनच बांधकाम केलेला औरस चौरस रस्ता दिसतोय काय..?
त्याच्या थोड वरती जाऊन डावीकडे बघा.अनेक उध्वस्त घरांचे चौथरे दिसतायेत का..हि घरे ब्राम्हण कारकुन व प्रशासकीय आधिकर्यांची आहेत.
______
सोनोपंत डबीर वाडा:-
   चला आता पुन्हा मागे या व पायर्या चढायला सुरुवात करा.थोडे वर गेल्यावर डाव्या बाजुला एक 
मोठी वास्तू दिसेल.तोच सोनोपंत डबीरांचा वाडा हय
होय.आज तो पर्यटक निवास म्हणुन, वापरला जातो.याच सोनोपंत डबीर यांच्या मुलाने सोनदेव ह्याने हिरोजी इंदुलकरांच्या संगतीत स्वराज्याची दुसरी राजधानी बांधून काढली.
_____
तथाकथीत महाराणी सईबाईंची समाधी :-
      मी एक गडदुर्गांचा धारकरी व शिवरायांच्या चरणांवर इमान वाहिलेला मावळा म्हणुन सांगतो.जो तुम्हास बोलेल की,तो पहा तो चौथरा सईबाईंची समाधी तर त्याचे थोबाड तिथेच सडकवा.या नादान हरामजाद माणसांनी त्या मातेच्या मृत्यूनंतरहि तिच्या समाधीचा हा छळ चालवलाच आहे.संभाजीराजेंसारखा शुर बलिदानी पुत्र या स्वराज्यास बहाल करुन महाराणी सईबाई आजारपणाने स्वराज्यास व महाराज तसेच, संभाजीराजेंना दुधपित्या वयात पोरकं करुन गेल्या.
त्या आजारपणात गडावर असतील काय..?
गडावरील हवा त्यांना त्या काळात मानवली असेल काय..?
त्या समाधीवर पदकमले आहेत.मराठ्यांच्या कोणत्या समाधीवर तुम्हास पदकमले दिसली..?
कोणत्या किल्ल्यावर तुम्हास राहत्या ठिकाणीच समाधी दिसली..?
मराठ्यांच्या कोणत्या समाधीची रोज पुजा केली जाते.रोज तीला दिवा लावला जातो..?
    हि समाधी महाराणी सईबाईसाहेबांची नाहि.ती तर तिकडे खाली आहे.पाली गावाच्या खालच्या अंगास गुंजवणी नदि काठी.जिथे तात्कालीन कालात सुंदर अशा बाग पाली गावात फुलवण्यात आली होती.समाकालीन काहि साधने याला साक्षिदार आहेत.समाधीसाठी जागा दिलेले दानपत्र व त्या जागा मालकाने उदारता दाखवली व उत्खनन संशोधन केले तर, तो इतिहास नक्कीच बोलका होईल व गुंजवणी नदिकाठी अस्ताव्यस्त पडलेल्या त्या चिर्यांना त्यांची योग्य जागा मिळेल.
      मग, ती समाधी कुणाची..? यावर मात्र इतिहास अबोल आहे.मात्र भूगोल बोलतोय.मराठ्यांच्या समाधीवर शिवपिंड कोरलेली असते.तर,ब्राम्हण,प्रभू यांच्या समाध्यांवर विष्णुपदे कोरलेली असतात.हा समाधी शिल्पांचा अभ्यास सांगतो.
_____
त्रिपुरा स्तंभ:-
आता या समाधीच्या उजव्या बाजुस पद्मावती मातेच्या मंदिरासमोर पहा.तुम्हास एक दगडी खांब दिसेल.हाच तो त्रिपुरा स्तंभ.अस म्हणतात की, कार्तिक शुद्ध पौर्णिमेस शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला.म्हणून, त्या दिवशी देवापुढे कापूर जाळून दिपेत्सव साजरा केला जातो.त्या स्तंभाच्या टोकाला कापूर जाळण्यासाठी दगडी दिव्यासारखा भाग आहे.तो जर का दिपस्तंभ असता.तर,त्याला दिवे ठेवण्यासाठी बाजुला काहि उपाययोजना किंवा शलाखा असत्या.
______
       काहि प्रमाणात पद्मावती माचीचा आपण अभ्यास केला.आता तुम्ही स्वत:च जरा तटबंधी फिरुन या.तटबंधीच्या समोरील आसमंत,तटबंधीतील सौचालय व्यावस्था, काहि घरांचे चौथरे वजा अवषेश तुम्हाला दिसतील.
    चला आता पटपट पुन्हा तटसरनौबताच्या सदरेकडून पुढे चला.आता समोर तुम्हाला दोन पाट्या दिसतील एक पाटी सुवेळा माची, बालेकिल्ला व दुसरी पाटी संजिवनी माची.समोरच बालेकिल्लाहि दिसेल.आता आपण बालेकिल्ला पाहण्या आधी संजिवनी माचीचा फेरफटका मारुन येऊ.
    बालेकिल्ल्यास बगल देणारी वाट तुम्ही चालत पुढे व्हा.मी आलोच जरा..
संजिवन माचीचा पसारा पुढील भागात....

गाथा दुर्गराज राजगडाची भाग-३
स्थलदर्शन- संजीवन माची
____चला आपण बालेकिल्ल्यास बगल देऊन पुढे जाणार्या वाटेवर आलो होतो.आता तशीच  बालेकिल्ल्याला बगल देत पुर्व बुरुंजाच्या खालुन एक चिंचोळी वाट पुढे जाते.त्या वाटेने पुढे चला. बाजुला काहि टाक्या दिसतील.टाक्या म्हटल की, पाणि साठवणुक .चला त्या हि पुढे.या ठिकाणी जास्त वेळ थांबुन उपयोग नाहि.सर्वात अवघड, लढावू माची म्हणजे संजीवन माची.तिचा अभ्यास प्रचंड वेळखाऊ व किचकट आहे.
_______
तटसरनोबताची सदर:-
     आता पुढे चालत असताना पहिल्या टप्प्यावर संजीवन माचीच्या तटसरनोबताची सदर आहे.पश्चिमेकडील गावातुन किल्ल्यावर जो दुधाचा रतीब किंवा इतर वस्तू या सर्वांवर तसेच, माचीवरील पहारा, शिबंदी,हत्यारे त्यांची योग्य ती देखभाल व या सर्वांवर कंट्रोलींग हे तटसरनोबताचे काम होते.
आजही या पश्चिमेकडील गावांतून भल्या पहाटे दही व  ताक घेऊन येणार्या छोट छोट्या गवळणी मी पाहिल्यात.या सदरेच्या उत्तरेस काहि घरांचे चौथरे नजरेस पडतात.ते बहुतेक गडावरील शिबंदीची घरटी आहेत.
_____
तिहेरी बुरुंज:-
    पहिला टप्पा खाली उतरुन थोडे मागे चालत आल्यास उजव्या हातास तुम्हाला धडधाकट धाटणीचे तीन बुरुंज दिसतील.पहिला बुरुंज मध्यभागी असलेल्या झुंजार बरुजाच्या थोडासा अलीकडे, दुसरा बुरुज तटाच्या मध्यभागी, तिसरा तटसरनोबताच्या सदरेखाली आहे.या बुरुंजाचे बांधकाम हे चिलखती प्रकारचे आहे.प्रत्येक बुरुजांतून चिलखती तटात खाली उतरण्यासाठी पायर्या आहेत.या बुरुजांचे बांधकाम पाहता शिवकाळात या बुरुजांवर मोठ मोठ्या तोफा होत्या.या तोफा मार्गासनी ते वेल्हा.तसेच खरीव खिंड, वाजेघर, शिवापट्टण रक्षित होत्या.चांगला अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल की, मार्गासनी ते वेल्हे हा मार्ग राजगड व संजीवन माचीला धोका पोहचवु शकत होता व हा मार्ग मोघल व आदिलशहाच्या फौजांना ज्ञात होता.किल्ले सिंहगड व तोरणा पडल्यावर राजगडाला कवेत घेणे सहज शक्य होते व त्याच मुळे शिवरायांच्या नजरेने त्याचा वेध घेऊन हि माची प्रचंड लढाऊ बनविली होती.संजिवन माचीची नामव्युत्पती कथा याच बुरुजांवर घडली.ती श्री आप्पा परब यांनी किल्ले राजगड कथा पंचविसी या पुस्तकात मांडली आहे किंवा कुणाला मी लिहलेली माझ्या लिखाणातील पी डी एफ हवी असल्यास मला संपर्क करावा.
(९९२२९७३१०१)
 ______
पहिला  बुरुंज :-
    तटसरनोबताच्या सदरेकडून दक्षिणेकडून खाली उतरल्यास तुम्हाला एक मोठा बुरुंज दिसेल .मागे वळुन तुम्ही वर बालेकिल्ल्यावर नजर टाकली असता.बालेकिल्ल्याच्या पश्चिम बुरुजाच्या मार्यात हा बुरुंज आहे.समजा,संजीवनी माची शत्रूच्या ताब्यात गेली व गनिम पद्मावती माचीकडे जाण्यास सरसावलाच.तर,बालेकिल्ल्यावरील पश्चिमेच्या बुंजावरील तोफा त्या गनिमाचा चकनाचुर करण्यास पुरेशा होत्या.
   ह्या बुरुंजाच्या उजवीकडे शिवपिंड,नंदी,  मारुती, दीपस्तंभ इत्यादी गोष्टी कालोघातात नामशेष होतायेत होतील, झाल्यात.इथे एक दरवाजा आहे या दरवाजातून आपण, संजिवन माचीच्या दुसर्या टप्प्यावर उतरतो.पुढे गेल्यावर तुम्हाला काही टांके दिसतील इतिहासाला या टाक्यांची नावे ज्ञात नाहित.पण, काहि इतिहासकारांच्या मते हे सटवाईचे टाके आहे.
_____
गुप्त दरवाजा :-
     या कड्याच्या मध्यावर उभारलेला दरवाजा दरवाजा दिसेल तो गुप्त दरवाजा होय.पुर्वी या 
दरवाजातून पाली गावाकडे जाता येत होते.
_____
दुसरा बुरुंज :-
  पुढे चालत राहिल्यास तुम्ही आता मागच्या सारख्याच एका दुसर्या बुरुंजावर येता.या बुरुजाच्या तटावरुन वाकुन खाली पाहिल्यास तुम्हास एक दरवाजा दिसेल.तो आळ दरवाजा आहे.या आळ दरवाजास हा बुरुंज रक्षित उभा आहे.
     या बुरुजांस खेटुन आणखी एक दरवाजा आहे.त्याच्या पायर्या आता पुर्णच.....
______
आळ दरवाजा :-
    या दोन बुरुजाच्या जवळुन असलेल्या दरवाजातुन तुम्ही खाली उतरल्यास डाव्या हाताला जो दरवाजा दिसतो तो 'आळ' दरवाजा होय.हा 'आळ' दरवाजा म्हणजे, राजगडाच्या महत्वाच्या वाटांपैकी एक होय.संजिवन माचीचे हे मुख्य प्रवेशद्वार.त्याच्या पुढे आणखी तीन दरवाजे आहेत.
     या आळ दरवाजावर एक शिल्प आहे.एका हरिणाला उताणे पाडून, दोन वाघ त्याच्यावर पाय रोवून गर्वाने पहात आहेत.मात्र या आळ दरवाजावरील शिल्प हे शिवकालीन वाटत नाही.बहुतेक राजगडाचे बांधकाम करते समयी हे शिल्प त्या ठिकाणी पूर्वीचेच असावे.किल्ला बांधताना हे शिल्प नव्याने त्या दरवाजावर लावले असावे.कारण,राजगडचे बांधकाम होण्याच्या आधिहि हा बिरमदेवाचा डोंगर किल्ला म्हणुन, ज्ञात होता व त्यावर थोड्या आधिक प्रमाणात बांधकामहि उपलब्ध होते.
    या शिल्पाचा आपण शब्दश: अर्थ लावणे कठीण मात्र.मी माझा अंदाज म्हणुन वर्तवतो.दोन शाही बलाढ्य सत्ता एका बिरमदेवाच्या डोंगरावर अथवा आसमंतावर राज्य करणार्या राजावर जेव्हा,  विजय मिळवतात.त्यास पराभूत करुन तो डोंगर आपल्या ताब्यात घेतात.त्या समयी हे शिल्प घडविले गेले असावे.असो शिल्पांचा हा थोर व खोल अभ्यासाचा विषय आहे.माझा तितका अभ्यास व तितकी प्रतिभा नाहि.
_____
म्यान दरवाजा:-
  या आळ दरावाजाला रक्षणारा आणखी एक म्यान दरवाजा पुढे तुम्हास दिसेल.या दरवाजाच्या बाहेरील बाजुस एका मोराने पिसारा फुलवला आहे.या आशयाचे एक शिल्प आहे.मळे व भूतोंडे ही या दिशेंची प्रमुख गावे आसून या गावांस जाणारी पायवाट व दुर्ग तोरण्याकडे जाणारी पायवाट याच आळ दरवाजातून जातात.
  पायदळाचे सरसेनापती येसाजी कंक यांचे गाव भूतोंडे अर्थातच त्यांच्या सोबतचे सैनिक त्याच प्रमाणे अनेक रणधुरंदर याच मार्गे किल्ले तोरण्यावर तसेच, खालील आसमंतात गेले असतील व वर राजगडावर आले असतील.रणधुरंदर नरवीर तान्हाजी मालुसूरे किल्ले सिंहगडावर धारातिर्खी पडले.त्यांचे शव याच 'आळ' दरवाजा मार्गे 'मढे' घाटातून त्यांच्या गावी नेण्यात आले होते.या आळ दरवाजाने स्वराज्याची असणारी पहिली राजधानीचे प्रशासकीय आधिकारी व शिवरायांचा थाटही पाहिला व या स्वराज्याच्या रणकुंडात, अग्निकुंडात गनिमांच्या तरवारींना बहाल केलेल्या विरांची प्रेतेहि पाहिलीत.ती मांदीयाळीही पाहीली.
तो या सर्व घटनांचा साक्षिदार म्हणून त्या दुर्गराज राजगडाशी इमान राखून आहे.त्याची आजची आवस्था पाहुन वाटते.
बेईमान तर आम्ही झालोय.त्या जाज्वल्य इतिहासाशी.असो...
      गडकिल्ले हि मला हिंदुंची आद्य  तिर्थक्षेत्रे वाटतात.ती माझ्या साठी मंदिरांपेक्षा कमी नाहित.त्यांची  शपथ घेऊन सांगतो.जे लिहतोय ते फक्त मऊ गादिवर बसुन नाहि किंवा मोबाईल हातात आहे म्हणुन गुगलवर पाहुन  नाहि की, कुणाच्या पुस्तकातील माहिती इथे तुमच्या समोर कॉपी पेस्ट करत नाहि.त्यांचा फक्त आधार घेतलाय बाकी मी स्वत: या राजगडास एकदा तळवटीतुन पुर्ण प्रदक्षिणा व या आळ दरवाजा मार्गे खाली बापुजी बुवाजी खिंडीत उतरलोय.कित्येकदा हा राजधानीचा गड पायाखाली घातलाय...वाचलाय.....वाचेल....वाचत राहिल.....इमान राखून राहिल....!
  असेच तुम्हीही कधीतरी झगमगाटातील, छानशौकीनीची शहरी दुनिया सोडून या सह्याद्रीत गिरीकंदरांत भटका.कधीकाळी तुमच्या या शहरी जीवनाला लाजवेल इतकी प्रभावळ व श्रीमंती या गिरीदुर्गांनी अनुभवलीय व म्हणुनच आज आम्ही हे जीवन अनुभवतो आहोत.
_____आता पर्यंत बालेकिल्ला ते संजिवनी माचीचे मुख्य प्रवेशद्वार  आळ दरवाजा हा भाग आपण पाहिला.तो फक्त मध्यातुन.आता माघारी फिरताना.या माचीचा महत्वाचा अभ्यासण्या जोगा भाग म्हणजे, कडेची दुहेरी चिलखती तटबंधी.या चिलखती तटांमधील अंतर दिड ते दोन फुट आहे व खोली साधारण १२ ते १५ फुटांपर्यंत आहे.या तटबंधीत व खाली चिलखती बुरुंज आहेत.उतरण्यास दिंड्या व नाळेतुन वर येण्यास दगडी सोपान आहेत.हा भाग बालेकिल्ला किंवा इतर दोन माच्यांच्या तुलनेत खुपच खाली उतरता आहे.त्यामुळे , सर्वात जास्त धोका याच भागातून जास्त होता.म्हणुन, जास्तीत जास्त लढाऊ प्रकारची हि माची शिवरायांनी उभारली.जास्तीत जास्त संरक्षण कसे मिळेल हे सर्वच त्यांनी नजरेसमोर ठेवुन   राजगडाचे बांधकाम केले.याच याच माचिवरील तोफांच्या भांड्यांनी मोघलांना आपला दरारा त्याकाळातच दाखवला.म्हणुनच, या आळ दरवाजाकडे कुणा गनिमाची नजर वर करुन बघण्याची हिंम्मत झाली नाहि.
      चिलखती तटबंदीतील बाह्य तटास तीन ते पाच फुट उंचीची चर्या म्हणजे बाहेरील संरक्षक कठडा सलग बांधला आहे.त्यास जंग्या आहेत.या जंग्यांच्या माध्यमातुन मावळे स्वत:चे रक्षण तर करु शकत होतेच.पण, ़हातीच्या शस्रांनिशी ते गनिमांची मुंडकीही छाटु शकत होते.याबाहेरील तटबंधीच्या आत एक आणखी तटबंधी आहे.पण, त्यास कठडा नाहि.या तटबंधीची फांजी सलग व विस्तृत आहे.
 ______
तटबंधीतील बुरुंज :-
    डोंगरसोंडेच्या धारेवर बांधलेली तटबंधी तिच्या संरक्षणार्थ सबंध तटबंधीस तुम्हास काहि वेगवेगळ्या आकाराचे तर काही सारखे असे बुरुंज दिसतील.संजीवन माचीवर या प्रकारचे एकुण आठरा बुरूंज आहेत.
_____
बिनिचा बुरुंज :-
   संजीवन माचीचा हा शेवटचा दुहेरी तटबंधीचा बुरुंज तुम्हाला तटबंधीवरुन फीरताना दिसेल.हा बुरुंज म्हणजे संजिवन माचीचा जिव की प्राण या सर्व बुरुंजांचा बापच की...अबब !! कीती बेलाग बांधकाम आहे.बघताय ना..? 
एक चांगली मोठी तोफ ३६०° अंशात मारा करु शकेल इतका विस्तृत.खाली अर्ध्याच्या थोड्या खालपर्यंत चिलखती तटबंधी बांधलेली आहे.चिलखताच्या दोन्ही बाजूस दरवाजे त्यावर ये जा करण्यास पायर्या आहेत.तुम्ही भविष्यात या मार्गे कधी तोरण्याकडे गेलात तर, तुम्ही या बुरुंजाच्या खालुनच पुढे जाल.जरा, उलटे फिरुन पहा.एका कातळ कड्यावर हा बुरुंज उभा आहे.पाथरवटांनी छन्नी हातोड्यांना तासून गुळगुळीत करुन बनवलाय तो.ग्रँडर नव्हता होता हो त्या काळी....
    या बुरुंजाच्या आतील बाजुस काहि शिबंदिची घरटी दिसतात.हा बिनिचा बुरुंज तोरणा, लिंगाणा व रायगड ह्यांवर या बिनिच्या बुरुंजाची नजर आहे.मी राजगड ते रायगड करत असताना खुप खुप दुरवरुन हा बिनिचा बुरुंज पाहिला आहे.अर्थातच तो खुप दुरपर्यंत समोरील आसमंतावर बारीक बारीक नजर ठेवुन होता.हे मोगलशाहीच्या सरदारांना चांगलाच ज्ञात होता.राजगडाच्या अपसव्य असणार्या विंचवाच्या नांगी समान सदा दंश करण्यास सज्ज असणार्या या बिनिच्या बुरुंजास ते घाबरुन होते नव्हे होतेच.याची साक्ष किल्ले श्री राजगडाचा भूगोल देत आहे.  
        इ.स १६६५ मध्ये मिर्झाराजा आला होता स्वराज्यावर.त्याचा सरदार चालून आला होता राजगडावर.शिवापट्टणच्या गुंजवणी नदिकाठी पाले पडली.याच बिनिच्या बुरुंजाने आपल्या अंगावर असणार्या तोफेच्या भांड्याच्यायोगे त्या यवनांस प्रहरभर जीव वाचवत खिळवून ठेवले होते.तो दरारा आहे या बिनीच्या बुरुंजाचा.तो आजच्या माझ्या सारख्या हातात मोबाईल फोन घेऊन सेल्फी काढणार्या नादानास कळेल काय बरं..?
    अल्प खजिन्यात असा राजगड व असे बेलाग बुरुंज उभारणारे शिवभूपती असामान्य , अद्वितीय थोर ज्ञात राजकारणी, मत्सुद्दी व काळाच्याहि पुढे नजर फेकणारे.एका दैवता पेक्षा कमी नाहिच.होय, त्यांच्या पराक्रमाची माती करायची नाहि.म्हणून आणि फक्त म्हणूनच त्यांना दैवत ठरवण्यास आम्ही गडदुर्गांचे धारकरी कचरतो.देव आले की दैवी जादू व सामर्थ्य मग का़य सर्व सहज सोपेच की....
पण, नाहि शुन्यातून जग निर्माण करणारे माझे शिवराय 
        "The stetus of war" 
म्हणूनच त्यांची कीर्ती व पराक्रम असेतो विंध्य हिमाचल या पृथ्वीतलावर असेच आधिराज्य गाजवत राहिल.प्रेरणा देत राहिल.घडवत जाईल एक तुम्हा आम्हा दुर्गवेड्यांची व देशभक्तांची एक एक पिढी.
 ______
काहि शिल्पे:-
    बिनिच्या बुरुजावरुन मागे फिरताना एक मारुती शिल्प दिसेल.काही ठिकाणी सिंह सिंहावलोकन करतानाचे सिंहशिल्प आहे.एक हत्ती शिल्प, एक सिंह हत्तीला आपल्या पंजात उचलुन धरतो आहे.या आशयाचे शिल्प आहे.
      काहि ठिकाणी तुम्हास व्याघ्रमुख व मकरमुख इत्यादि शिल्पे आहेत.व्याघ्र म्हणजे वाघ व मकर म्हणजे मगर..मकर मुख हे जलदेवतेचे प्रतिक आहे.असेच एक शिल्प रायगडाच्या बारा टाक्यांवरील एका टाक्यावर आहे.गेलात पाहिलेत की दिसेल.
_____अशा प्रकारे मी हि संजीवनी माची "कशीबशी" या चार ओळीत "बसविली" बसत नाहिच.मला खेद आहे.यात खुप गोष्टी शॉर्टकट व न कळण्यासारख्या आहेत.पण,इलाज नाहि.तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा जाल तेव्हा तुम्हास या बाबी व या माचीचे महत्व ध्यानी येईलच.मला तरी काहि बाबी समजल्या नाहित.मांडता आल्या नाहित.तुम्ही, सुज्ञ अाहात मज नव भटक्यापेक्षा तुम्हाला नक्कीच काहितरी जास्त ज्ञान असेल..
____ चला आता पटपट पुन्हा, जेथुन संजीवनी माचीकडे येण्याच्या वाटेवर उभे रहा.जेथून आपण सुरुवात केली होती.तो राजगड मोठा काहीजण चार तासात किल्ला पुर्ण पाहिला असे सांगतात.तर, काहिजण तीन तीन दिवस भटकुनहि "गड काहि पुर्ण पाहता नाहि आला राव"
असे म्हणतात.शेवटी फरक नजरेचाच....!
      आता पुढे आपण सुवेळा माचीचा अभ्यास करणार आहोत.

गाथा दुर्गराज राजगडाची भाग ४
स्थलदर्शन -सुवेळा माची

_____संजीवन माचीचा यथासांग अभ्यास करुन तुम्ही माघारी फिरलात.आता सुवेळा माची व बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट धरा.
    या सुवेळा माचीची एक लोककथा आहे.राजगडाचे बांधकाम चालू असता.शिवरायांना बांधकामाच्या प्रशासकीय आधिकार्याने या पुर्वेकडील माचीचे बांधकाम पुर्ण झाल्याचे सांगितले.महाराजांनी स्वत: पाहून काहि कमी-उणे सांगावे अशी विनंती केली.
शिवराय एके दिवसी भले पहाटे उठुन स्नान, पुजा आदि कर्मे उरकुन.या माचीकडे निघाले.पुढील आसमंतात गुंजवने गावातील चुली पेटल्या होत्या.त्या धुराची वलये गुंजवने गावातुन उठुन आकाशी झेपावत होती.पहाटेचा थंडगार वारा अंगास झोंबत होता.
सुर्योदयाचा समय होता.शिवरायांनी ते प्रसन्न सकाळचे वातावरण अनुभवले.हि सुवेळ होती.
याच सुवेळेहुन या माचीचे शिवरा़ांनी 'सुवेळा' माची असे नामकरण केले.

पुढे तालत राहिल्यास.तुम्हाला टाकी दिसतील ती टाकी सध्या "महार टाके" नावाने संबोधीत आहे.हि टाकी शिवपुर्व कालीन यादव कुळीतील आहेत.पुढे चला.
_____
उध्वस्त द्वार:-
    याच रस्त्यावर पुढे एक दरवाजा होता.हा एक बाब महत्वाची की राजगडावर आजपर्यंत अनेक इतिहासकारांनी लेखन केले.पण, या दरवाजाचा उल्लेख दिसत नाहि.कुणी केला असेल कर वातनात नाहि.
पण, मी अगदी निरखुन व डोळ्यात तेल घालून पाहिलेय.होय या ठिकाणीही एक दरवाजा होता.त्याची फक्त डावीकडील आडबंद टाकण्यासाठीचीच जागा व उंबर्याचा दगड  शिल्लक आहे.बाकी काहिच त्या ठिकाणी शिल्लक नाहि.सहजरीत्या तो तुमच्या नजरेसहि पडणार नाहि.पण, मी त्या दरवाजाच्या खाणाखुणा पाहिल्या आहेत.गुंजवणे दरवाजा चढून वर आल्यावर लगेच पद्मावती माचीकडे वळा.पद्मावती माचीच्या दिशेने चाला तुमच्या उजव्या हाताला आहे.गेलात तर नक्की पहा.
   या दरवाजाचा उद्देश माझ्या अंदाजे गुंजवणे दरवाजातून वर येणारी लोक या दरवाजात चेक करुन मग, पुढे सोडली जात असावीत व पद्मावती माची व पाली दरवाजाकडुन येणारी सरदार, रयत, प्रशासकीय आधिकारी याच दरजातून गुंजवणे गावात,बालेकिल्ल्याकडे व सुवेळा माचीकडे जात येत असावीत.
      जरी, या बाबतीत कुणी मांडले असेल तर, माझ्या वाचनात नाहि.माझा तितका अभ्यास नाहि.गड पाहिल्या शिवाय काहि लिहायचे नाहि व त्याची पुर्ण आपल्याला माहिती असल्याशिवाय त्या विषयास हात घालायचा नाहि हा आपला फंडा आहे.या दरवाजाविषयी मला काहिच माहित नाहि.जाणत्यांनी मार्गदर्शन करावे.जे दिसले ते लिहिले.सरळ-सोप्पे....
______
गुंजवणे महाद्वार (दरवाजा) :-
   पुढे चालत गेल्यावर तुम्हाला डाव्या हातास.दोन बुरुंजांचे दर्शन होईल.थोडी वाट वाकडी करा.काहि पायर्या? आहेत हे तरी आपले नशिबच म्हणा.
त्या पायर्यांनी उतरुव  डाव्या बाजुला दोन बुरुजांकडे चालत जा.विस्तृत अशा या बुरुजांच्या फांजीवरुन समोरील पुढील आसमंतावर नजर फेकता येत होती.चला आता खाली उतरण्यास सुरुवात करा.दोन्ही बुरुंजाच्या आत अलगद लपवलेला दरवाजा समोर दिसेल.त्याला खाली उतरायला कातळात कोरलेल्या पायर्या आहेत.पण, त्या कालोघातात उन वारा पाऊस यांनी त्या आता झिजल्या आहेत.त्या चार पायर्या उतरुन मागे दरवाजावर नजर टाका.या दरवाजावर गजलक्ष्मीचे शिल्प आहे.अर्थातच हा दरवाजा शिवरायांनी बांधलेला नाहि.त्याची फार फार तर डागडुजी केली असावी.कारण, गजलक्ष्मी शिल्प हे यादव कालीन किल्ल्यांच्या महाद्वारवर अढळते.
याच दरवाजात शिवाजी महाराजांना धन सापडले होते.प्रभाकर भट्टांच्या व शिवरायांच्या आदेशानुसार तेथे उत्खनन झाले होते.या मिळालेल्या धनावरच राजगड कमी आधिक प्रमाणात उभा राहु शकला.हि वस्तूस्थिती.म्हणून, शिवरायांनी हे द्वार तसेच राखले.
_____
म्यान दरवाजा :-
    त्याच पायर्या उतरुन थोड खाली चला.शिवरायांनी गुंजवणे महाद्वार तसेच राखले.परंतु,त्या महाद्वारास या म्यान  दरवाजाचे चिलखती संरक्षण दिले.हा दरवाजा पुर्ण कातळात कोरलेला असून.उन पाऊस झेलत आता......
त्या दरवाजातून उतरणार्या पायरी मार्ग खालील गुंजवणे गावात जातो.गुंज-जमाव, वणी-घाव घालणारा असा जमाव या ठीकाणी किल्ल्याच्या संरक्षणार्थ पाले ठोकुन रहात होता.संकट समयी याच गुंजवणे दरवाजातून ते सैनिक गडावर येत असत.
_____ 
डुबा:-
  चला आता माघारी फिरा  गुंजवणे महाद्वारातून पुन्हा वर या व मुळ वाटेवर येऊन डावीकडे चालत रहा.पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या आसमंत संपेल व तुमच्या समोरच एक टेकडीवजा उंचवट्याचा भाग लागेल.त्यालाच डुबा संबोधले जाते.
_____
मारुती शिल्प :-
   येथून पुढे चालत राहिल्यास तुम्हाला एक दक्षिणाभिमुख मारुती शिल्प दिसेल.हा मारुतीराया आपल्या पायाखाली एका राक्षसास मारीत आहे.या आशयाचे हे शिल्प आहे.या शिल्पाच्या बाजूस काहि छोट्या पाण्याच्या टाक्या आहेत.
_____
उध्वस्त घरांचे चौथरे:-
      थोडे पुढे गेल्यावर तुम्हास उजव्या हाताला उध्वस्त घरांचे चौथरे नजरेस पडतील.ही पद्मावती माचीच्या नंतर याच ठिकाणी थोडा सकल व वस्तीजोगा सपाट भाग आहे.त्यामुळे,या ठिकाणी काहि हजारी,प्रशासकीय आधिकारी.येसाजी कंक, तान्हाजी मालुसुरे, सिलिंबकर इत्यादी रण धुरंदरांची ती घरे असावीत.मी अनेक ठीकाणी वाचले आहे.की,यांचे वास्तव्य या सुवेळा माचीवर होते.ती घरे सर्व भक्षी काळाच्या ओघात जरी नष्ट झाली.तरी, त्यांचा पराक्रम नष्ट झाला नाहि.नागव्या असिलता कमरेस अडकवुन सह्याद्री सह्याद्रीत दौड घेणार्या,स्वराज्याच्या अग्निकुंडात सुमने म्हणून स्वत:चे शिरकमल अर्पण करणार्या मर्द मराठ्यांचे याच ठिकाणी वास्तव्य होते.त्याच ठिकाणी मी लैला मजनू त्या चौथर्यांवर गळ्यात गळे घालून बसलेले पाहिलेत.
त्यांना समजुन सांगायला गेलो.तर, 
"तुझ्या बापाचा किल्ला आहे काय..?"
 हे त्या ठिल्लार नादानांचे शब्दामृतहि पिलोय.
आणि हो..
हे फक्त या स्वाभिमान शुन्य महाराष्ट्रातच होऊ शकते.हे मला ठावुकी आहे.
     पण, याच्याहि पुढे जाऊन तिथे बसून त्यांचा तो पराक्रम आठवा.शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर आज ३५० च्या वर वर्षे लोटली.तरी, अंगावर काटा येतो.साक्षात शिवभूपतींच्या सवे वास्तव्य करणारे मावळे म्हणजे सगळे प्रतिशिवरायच होते.त्यांचा तो मराठी बाणा आठवा.तुम्ही मात्र त्या पराक्रमाशी बेईमान होऊन त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या इतिहासाचा अपमान करु नका.याच चौथर्यांत एक सुवेळा माची सरनोबताची सदर होती.सुवेळा माचीवरील तो महत्वाचा आधिकारी होता.त्याच्या मार्गदर्शनाखाली व हुकुमांखाली हि सुवेळा माची नांदत होती.
_____
झुंजार बुरुंज :-
   चला आता या ठिकाणाहुन पुढे चला.हा दुहेरी पा़यरी मार्ग असलेला बुरुंज दिसेल हा म्हणजे
झुंजार बुरुंज होय.झुंजार बुरुंज म्हणजे शिवरायांच्या दुर्गबांधनीच्या वास्तुशास्राचा, लष्करी नियोजनाचा, संरक्षण प्रयोजनाचा उत्तमोत्तम नमुना होय.त्यावर,चढुन बघासमोरील आसमंत,त्या बुरुंजांची लांबी रुंदी व हे बघुन कल्पना करा.यावर असणारी तोफ व त्या भांड्याच्या मार्यात येणारा आसमंत.हा बुरुंज पुर्वेच्या बाजुने पाहिल्यास तो हत्तीवर ठेवलेल्या अंबारी सारखा भासतो.यावरील संरक्षक  कठडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.जो उरलाय त्यात तुम्ही जंग्या वगैरे पाहू शकता.
_____
सुवेळा माची दरवाजा :-
  या झुंजार बुरुंजावरुन आता खाली उतरा व उजवीकडील पायर्यांनी खाली उतरा याठिकाणी एक दरवाजा आहे होता....
तो संपण्याच्या मार्गावर आहे...संपलाय...नामशेष..

"का नाहि संपणार..?"

माझ्यासारखे फक्त नावापुढे शिवभक्त,शिवश्री, चिवश्री
राजे, सरदार, शिवरायांचा लाडका,शिवकन्या,पाटलांची पोर, जिजाऊंची पोर या सारखे
शब्द लावून फिरणारे व कधिहि या गडकोटांकडे न फिरकणारे.चुकुन 
आले तरी नुसते भगव्यासोबत सेल्फीचे चाळेच करणारे तथाकथीत भक्त असल्यावर नष्ट होणार..होणारच..नव्हे झालेत. वादच नाहि...अगदी खरे..त्रिकालबाधित सत्य.
यावेळी एक अठवत….!

"तो शंभू शिवाचा छावा, 
निर्भिड वंश तो यावा, 
पालटून सत्तेस जाऊ, 
हा भगवा हातात घेऊ"

असो चला पुढे
या दरवाजातून सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्यावर उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे.खिन्न मनाने तो चालत रहा..फक्त..
पायर्या उतरतानाच उजव्या बाजू कडील तटबंधीत एक श्री गणेशाची मुर्ती आहे.हि गणेश मुर्ती शिवकालीन नाहि.शिवकालात श्री गणेश देवता हि गडावर पुजली जात नव्हती.
या मुर्तीच्या अगदीच समोर एक विरगळ आहे.ती विरगळ म्हणजे,१७०३ मध्ये औरंगजेबासी राजगड झुंज घेत होता.त्यावेळी
तोफेचा गोळा लागुन पडलेल्या रणधुरंदर वीर क्षत्रीयकुलोत्पन्न तटसरनोबत संताजी सिलिंबकर यांची ती विरगळ आहे.पुढील काहि भागांत या लढाईचे वर्णन करेलच..
_____
उजवीकडील गुप्त दरवाजा :-
    याच मुर्तीच्या अपसव्य हातास उजव्या बाजूकडील तटबंधीत एक गुप्त दरवाजा आहे.हा दरवाजा झुंजार बुरुंजावरील तोफेच्या भांड्याच्या मार्यात आहे.मी या बाजुने अगदी तळवटीतून राजगडास प्रदक्षिणा घातली आहे.या दरवाजाच्या जवळ आल्याशिवाय तो नजरेस पडत पडतच नाहि.
_____
नेढे :-
   चला आता पुढे चला.वादळ, वारा, पाऊस या कारणां मुळे खडकांचे क्षऱण होते.त्यांची झीज होते.त्यामुळे, यासारख्या नैसर्गिक कृती तयार होतात.कधी काळी हे नेढे म्हणजेच,खडकातील हे होल लहान होते.उन, वारा, पाऊस यांच्या सानिध्यात ते आता मोठे झाले व पुढेहि होत राहिल.यालाच नेढे नावे संबोधले जाते.
____
गुंजवणे गावाकडील एक दरवाजा :-
    पुढे चालत गेल्यावर तुम्हास बालेकिल्ल्याकडे तोंड केलेला एक दरवाजा दिसेल.सुवेळा माचीच्या उजवी कडील काहि गावांतील लोकांच्या रहदारीचा हा मार्ग होता.
चला जरा पटपट मी तुम्हास एक भूयार दाखवतो.इकडे शक्यतो कुणी भटकत नाहि.त्यामुळे, हे भूयार आता जनमानसांच्या विस्मृतीत गेले आहे.तर, तो दरवाजा उतरुन पुढे कड्याला चिटकुन एक वाट पुढे जाते.ती चालत रहा थोड्याशा अंतरावर बिनीच्या बुरुंजाच्या आलिकडेच
 उजव्या हाताला तुम्हास एक भूयार दिसेल.त्याच्या आत आम्ही गेलो होतो.३०-३५ फुट खोल असलेल्या या भुयाराच्या शेवटी एक चौकोनी खोली सदृश भाग आहे.मात्र येथे जाताना जरा जपुन ऑक्सीजनची कमतरता व सरपटणार्या प्राण्यांची तसेच इतरहि जिवघेणी संकटे आहेत.ते तुमच्यावर आधारित आहे.तुम्हास काय करायचे आहे ते.
   चला आता माघारी फिरुन पुन्हा त्या दरवाजात या.
______
पाण्याची टाकं :-
 पुढे चालात गेल्यावर तुम्हास काहि पायर्या दिसतील.त्या पायर्यांनी चढुन गेल्यावर खडकांत खोदलेली एकापुढे एक असी पाच टांकी आहेत.सुवेळा माचीवरील वापरासाठीच्या पाण्यासाठी या टाक्यांचे प्रयोजन आहे.ती आता संपतच आलीत.मी तर फक्त या सोशल मिडीयावर काहितरी लिहुन प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नांत असतो(अस समजा हवं तर..).
पण, कुण्या भगवा झेंडा हाती मिरविणार्या, फोटोबाजी करणार्या,बँनरबाजी व स्वत:स शिवभक्त म्हणविणार्या थोर महात्म्यांनी इकडे लक्ष दिले.तर,नक्कीच या टाक्या पुढेही शिवरायांच्या दुरदृष्टीची एक झलक, एक जित्त जागत  उदाहरण, एक दुर्गविज्ञान, एक विज्ञान, एक अविष्कार  पुढील पिढीस बघायला मिळेल.नाहितर सर्वभक्षी काळ टपुनच बसलाय.हे सर्व सर्व उध्वस्त फस्त करायला. 
____
चिलखती तटबंधी:-
  बाजूस तुम्हाला दुहेरी तटाची चिलखती तटबंधी दिसेल.इतर कुठल्याहि शिवपुर्व कालातील किल्ल्यांवर या अशा दुहेरी तटबंधाची तटबंधी तुम्हास दिसणार नाहि.हे तंत्रज्ञान पुर्णपणे शिवरायांनी आपल्या दुर्गविशारदांच्या मदतीने उभारलेय, निर्मिलेय.जरी, गनिमांच्या तोफगोळ्यांनी बाहेरील तट उध्वस्त झाला.तरी, आतील दुय्यम तटबंधीच्या मदतीने माचीस संरक्षण दिले जाऊ शकेल व बाहेरुन शत्रूस आत नक्की कीती सैनिक आहेत.याचा थांगपत्ता लागत नसे.त्यामुळे,शत्रू संभ्रमात पडून सहाजिकच कच खात होता.हि दुरदृष्टी, हि कल्पकता फक्त शिवरायांचीच होती.ती सत्यात उतरविण्याची दानतही याच राजांत होती.
    या तटबंधीत अनेक शौचकुप उभारण्यात आले होते.प्रातविधी किंवा शरीराची नित्य कर्मे करण्यासाठी सैनिकास लांब जायला लागू नये.कार्यात किंवा पहार्यात खंड पडू नये.हा सर्वच विचार करणारे पृथ्वीतलावरील सार्वभौम राजे म्हणजे 'शिवराय' होत.
______
बिनीचा बुरुंज :-
    पुढे एक उध्वस्त घराचा चौथरा आहे.ते बांधकाम विटांमध्ये आहे.गडाच्या बाहेरील बांधकाम हे दगडात तर, आतील हे विटांत असे(अपवाद).बाजुला जात्याचे घरटे आहे.यावरुन, ते सुवेळा माचीवरील शिबंदिचे धाऩ्य कोठार असावे.
      तर, हा सुवेळा माचीवरचा शेवटचा बुरुंज ज्यास 'बिनीचा बुरुंज' संबोधतात.या बुरुंजाचे अतिशय बेलाग बांधकाम आहे.२० डीसेंबर १७०३ साली शहेनशहां ए हिंदोस्था म्हणविणार्या त्या औरंगजेबाने या सुवेळा माचीच्या या बिनीच्या बुरुंजाचा थाट पाहिला आहे.निधड्या छातीने , छाताडाचेच कोट करुन लढणारे रणमर्द मराठेही पाहिलेत.त्याची साक्ष देत तो बुरुंज राजगडाशी इमान राखून उभा आहे.आम्ही मात्र त्याचे महत्व न जाणून घेता.त्यावर, उभे राहुन सेल्फी काढत फिरतो.कचरा करतो, आम्ही तेथे काहिच्या काहिहि करतो......असो
_____
मारुती :-
    हा बिनीचा बुरुंज चिलखती पद्धतीचा आहे.त्यास चिलखत आहे.त्यात उतरण्यास पायर्या आहेत.या चिलखतात गेल्यावर तुम्हास आतील बाजूस मारुती शिल्प दिसेल.बिनीचा बुरुंज हि राजगडाची अंतिम व व पुर्व बाजू.वाईट दृष्ट शक्तींचा समुळ नाश करण्यासाठी या देवतेची तेथे प्रतिष्ठापना केलेली आहे.
_____आपण सुवेळा माचीचा हा थोडक्यात अभ्यास केला.पद्मावती माची-गुंजवणे महाद्वार-बिनिचा बुरुंज या अनुक्रमे आपण ही या भागातील छोटीशी भटकंती केली.आता या बिनीच्या बुरुंजाहुन माघारी फिरा.डाव्या हातीची तटबंधी धरुन चालत रहा.पुढे तुम्हास काहि खांब असलेल्या टाक्या दिसतील.याच्यातील दुसर्या व तिसर्या टाकीतील पाणि अतिशय थंड व निर्मळ आहे.बाराहि महिने या टाक्यांत पाणि असते.आता अलिकडे पुरातत्व विभागाने या टांक्यांची डागडुजी केल्याने आता त्यांचे आयुष्य वाढले आहे.
_____पाणि पिऊन जरा हुशार व्हा...जरा बसा....
आता आपण पुढील भागात याच तटबंधीने "काळेश्वरी बुरुंज' व तेथून थेट 'बालेकिल्ला' अभ्यासणार आहोत.



गाथा दुर्गराज राजगडाची भाग ५
स्थलदर्शन -
काळेश्वरी बुरुंज व बालेकिल्ला 

_____चला तीन खांबी टाक्यांतील शितल पाणी पिऊन जरा हुशार झालात.
_____
तीन खांबी टाके :-
    तुम्ही ज्या टाक्यांतील पाणि पिलात.जरा,त्यांना बारकाईने लक्ष देऊन बघा.छताला तोलून धरणारे हे औरस चौरस तीन खांब हे टाके सातवाहन काळातील असल्याची साक्ष देतात.कारण,शिवरायांच्या कालखंडात अशाप्रकारच्या टाक्यांची निर्मिती केली जात नव्हती.ती वरुन खाली केली जायची.चला पुढे आता आणखी काही डोंगर कपारीत बांधकाम केलेली पाण्याची टाकी आहेत.त्याच्याहि पुढे गेल्यावर एक थोरला कालवा किंवा तळे दिसेल.आता तो नामशेष होण्याच्याच मार्गावर आहे.या कालव्याच्या दक्षिणेकडील भिंतीत गोमुख आहे.या गोमुखाच्या बाजूस शिवपिंड आहे.अर्थात या कालव्यातील पाणि हे पुजापाठ व इतर धार्मिक कार्यासमयी वापरले जायचे.
______
 मंदिर:-
   या तलावापासून पुढे दक्षिण दिशेस काहि चालत गेल्यास उजव्या हातास एक मंदिर आहे.ते मंदिर नक्की कशाचे म्हणचे त्याचे नामकरण तात्कालीन कालात काय होते.यावर इतिहास मौन बाळगून आहे.(किंवा ते मला माहित नसाव)
हा मात्र मंदिरात शिवपिंड आहे.आपण त्यास भगवान महादेवाचे मंदिर म्हणूऩच संबोधूयात.इतिहास हा सर्वच अभ्यासू वृत्तीने पहायचा नसतो.त्याला भावनिकतेचीही जोड द्यावीच लागते.मागे पुढे कालापर्वते नवनविन पुरावे हाती येत राहतात व इतिहासाचे पुन्हा पुव्हा नव्याने लिखान होत राहते.
या मंदिरात पार्वती माता व श्री गणेशाचीही मुर्ती आहे.
_____
भागीरथी मंदिर:-
   या अनामिक मंदिराच्या खालच्या अंगास श्री भागीरथी मंदिर आहे.
या मंदिरातील मुर्तींचे मी थोडक्यात वर्णन करतो.कारण,पुढे कधी या मुर्ती अस्तीत्वात असतील की नाही हे तर तो काळच जाणो.पण, या माझ्या लेखांच्या निमित्ताने का होईना.इथे या मुर्ती होत्या हे पुढील पिढीस निदान कळेल तरी....
१)श्री गणेशाची घडीव मुर्ती, चार हात, स्थूल काया, उजवा पाय दुमडलेला,सोंड डावीकडे, डोकीवर मुकुट
२)या मुर्तीच्या उजवीकडे देवी.देवी उभी, पायांत नुपुर, चुणीदार वस्र, चार हात, उजवे दोन्ही हात खंडीत,डाव्या वरील हातांत चक्र, खालील हातात त्रिशुळ, गळ्यात पदक असलेला हार, गळाभर दागिने, कानात कर्ण भुषने, डोईवर मुकूट, पायाखाली राक्षस.
३)देवीच्या डावीकडे गणपती, बद्धपद्मासन, चार हातांचा, उजवीकडील वरील हातांत अंकूश उजवा हात तुटलेला, डावीकडील वरील हातांत परशू, खालील हात खंडीत, कान चौकोनी, सोंड डावीकडे, डोक्यावर नागफणी.
४)डीवीकडे स्तंभ, चौकोनी, नक्षिदार.
५)एक उठावदार मुर्ती, पायांत तोडे, उजव्या हाती दंड, डावा हात कमरेवर, कान मोठे, डोक्यावरील उठावदीर मुकुट,गळ्यात पदकाचा हार
६)एका शिळेवर पाच शिव लिंगे...
    या मंदिराच्या दरवाजाबाहेर एक पाण्याचे टाके आहे.यात बाराही महिने पाणि असते.याठीकाणी दीपस्तंभ आहे.या दिपस्तंभाच्या उत्तरेस आणखी एक कुंड आहे.पद्मासनातील मुर्ती, दोन हात, उजव्या हातात दंड, डाव्या हात व मांडीवर रुद्राक्ष,स्थूलपोट, पोटाखाली वस्रबंधन, मानेवर रुळणारा जटाभार, तोंड तोडलेले.

_______
काळेश्वरी बुरुंज व आसमंत:-
  चला आता दक्षिणेकडील वाट पकडुन पुढे चला.तुम्ही आता एका मोकळ्या मैदानात आलात.या माळावर एक टाके आहे.टाके कसले चांगला मोठा तलावच म्हणा की..आता हे टाके पाहून खाली उतरा.आता तुम्ही एका दुहेरी बरुंज नजरेस पडेल.या तटबंधीने चालत गेल्यास एक दरवाजा लागेल.या दरवाजाने गडाच्या बाहेर पडता येते.या वाटेने कुणी जात नाही/काही थोडेफार वाट वाकडी करतात.
आता या दरवाजातून पुन्हा वर या.तुम्हास दुहेरी तटबंधीचा एक थोरला भरभक्कम धाटणीचा एक बुरुंज दिसेल.हाच तो काळेश्वरी बुरुंज होय.
  अस म्हणतात दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे.काळेश्वरी हे एक दैवत आहे.ढोबळ मनाने या शब्दाची उकल केल्यास.काळ+ इश्वरी असा अर्थ निघतो.काळ म्हणजे यम होय व इश्वरी म्हणजे निर्माती, जन्म देणारी, जनन करणारी असा अर्थ अभिप्रेत होतो.ही काळाची आई काळेश्वरी होय.चामुंडा, काळेश्वरी, काळूबाई,  यमाई या महाराष्ट्र देशीच्या मुख्य व वंदनिय पुजनीय देवता आहेत.हा काळेश्वरी बुरुंज म्हणजे, गडावरील दक्षिण दिशेची  दहनभूमी आहे.
     या बुरुंजास पहा.समोरचा आसमंत पहा.या भागात कुठलेही गाव नाही.पण, बुरुंजाच्या दरवाजातून बाहेर पडता येते.त्याचे प्रयोजन माझ्या हाती पुरावे नसताना मांडने हिताचे नाही.ते अपात्कालीन द्वार, चोरदिंडी असावी.इतकेच वर्तवू शकतो.या ठिकाणी दिवसा ढवळ्या सुद्धा एक गूढ व अनामिक शांतता नांदत असते.
   चला बुरुंजावरुन मागे फीरा या ठिकाणी एक देखणी व शिवपिंड असलेली एक समाधी आहे.आता हि समाधी नक्की कुणाची..?
यावर इतिहासाने मौन पाळले.मी ही मौन पाळले.मात्र राजगडावर ज्याची समाधी उभारावी.तो नक्कीच कुणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती असावा.मात्र या बुरुंजाला काळेश्वरी नाव देणारी ती काळेश्वरी मातेची मुर्ती तांदळा कुठेय...?
राहू केतूने ग्रासलेय की माझ्यासारख्या निव्वळ ठिल्लार  चाळे करणार्यांस पाहुन  स्वत:स गायब केले असेल काय बर..?
   बघा भविष्यात पुर्ण निष्ठेने त्या ठिकाणी बसल्यावर तो काळेश्वरी बुरुंज तुमच्याशी मनीचे गुज खोलतोय काय..
_______
बालेकिल्ला :-
  चला आता आल्या मार्गे माघारी फिरा.चालत चालत तुम्ही आता.गुंजवणे महादरवाजाच्या पुढे विरुद्ध दिसणार्या सोपान मार्गाने चालायला लागा.
_______
उध्वस्त  दरवाजा:-
    बालेकील्ल्याच मार्ग चालु केल्यानंतर तुम्हास एक पुर्ण उध्वस्त झालेला दरवाजा दिसेल.बालेकिल्ला महादरवाजाच्या आधिचा हा दरवाजा बहुतेक अतिदक्षता किंवा परवानगी दरवाजा होय.शिवराय व इतर महत्वाचे प्रशासकीय आधिकारीच फक्त या मार्गे बालेकिल्ल्यावर जात असत.याठीकाणी सुद्धा कडेकोट पहारा होता.या दरवाजाच्या पुढे डाव्या बाजूस एक थोरली गुफा आहे.हे बहुतेक द्वाररक्षक बंकींची चौकी होय.शिवकाळात ती गुफा लाकडी तख्त पोशीने सजलेली होती.काळाने ती उध्वस्त केली.
 ______
बालेकिल्ला महादरवाजा:-
   या चौकीच्या पुढे चला.या पायर्या पुर्ण झिजलेल्या दिसतात.काळाच्या ओघात व पाणलोटामुळे या पायर्यांची झीज झाली की एखाद्या इंग्रज आधिकार्याने हा मार्ग तोडला असेल काय....?
या दरवाजासमोर उभे रहा.पहा ते दोन बलशाली बुरुंज हे दोन्ही बुरुंज पंचकोनी आकाराचे बांधलेले आहेत.या दरवाजास व या सोपानमार्गाने या देशीचा राजा व त्यांच्या पायांची चरणधुळ आजूनहि तेथे आहे.तुमची फक्त निष्ठा व ती नजर असल्यास ती धुळ नक्कीच जाणवेल.
"अफजलखानाचे सिरास पिंजरा करुन त्यांत घालून राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजियाचे कोनाड्यांत ठेवावयास पाठविले.पुजा नैवद्य चालविला"
ही साक्ष जेधे करीना ने दिली.प्रतापगडावर तो बोकड आफ्जुल्या कापून त्याचे शिर या महादरवाजाच्या एक कोनाड्यात पुरले.हे त्या यवनांस ठावुकी होते.म्हणूनच की काय.एकाही यवननाने या बालेकिल्ल्याच्या या महाद्वारास लांघून आत प्रवेश करण्याच धाडस केल नाहि.
______
जननी माता मंदिर:- 
   या महादरवाजातून आत गेल्यास डाव्या बाजूला एक चांगल्या स्थितीतील मंदिर आहे.हेच ते जननी मातेचे मंदिर होय.हे मंदिर आता उत्तराभिमुख आहे.कदाचीत शिवकालात पुर्वाभिमुख असावे.जननी जन्म देणारी माता.जननी मातेची मंदिरे बर्याचशा किल्ल्यांवर व पायथ्यास आहेत.ही जननी माता म्हणजे प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापीत करण्याच्या आधि राजगजावर पुजलेली महिशासुर मर्दिनी तर नसेल ..?
असेलही माझा तितका अभ्यास नाही.
_____
सुवेळा माची संरक्षक हुडा :-
   आता या मंदिराच्या मागेच पुर्वेकडील बुरुंजावर चला.बुरुंजाच्या वर जे बांधकाम दिसतेय तोच संरक्षक हुडा आहे.सबंध गुंजवणे महाद्वार, डुबा, काळेश्वरी    बुरुंज व सुवेळा माची या संरक्षक हुड्यावरील तोफा बंदुकांच्या मार्यात होती.या पुढील भागांवर टेहाळणी व प्रसंगी युद्धास सज्ज या प्रकारचा तो हुडा आहे.
______
चंद्रकोर टाके:-
आता या पुर्व बुरुंजाहुन माघारी फीरुन सोपानमार्गाने चालू लागा.पद्मावती माचीच्या दिशेस पाहिल्यास तुम्हाला किल्ले सिंहगड व किल्ले पुरंदर दिसतील.तसेच वर चालत रहा.हा सोपान मार्ग चढल्यावर डावीकडे पहा.एक मोठ्ठ टाक नजरेस पडेल.होय हेच ते चंद्रकोर टाके.हे टाके काहीशा आष्टमीच्या चंद्रकोरीप्रमाणे आहे.म्हणून यास चंद्रकोर टाके नावे संबोधले जाते.याच तळ्यातील पाणी बालेकिल्ल्यावरील महत्वाच्या व्यक्तींनी वापरले.त्यांचा पदस्पर्श त्या ठिकाणी झाला.सप्त मतृकांचे स्थान असणार्या या तळ्यात.काही महाभाग बोटिंग सारखे चाळे करतात.हेच हेच तर दुर्दैव राजं आमचं...
   या तळ्याच्या आसपास छोटी छोटी सात पाण्याची टाकी आहेत.
हि सात पाण्याची टाकी सप्तमातृकांच्या अस्तित्वाचे पुरावे देतात.
_______
ब्रम्हर्षी मंदिर :-
 या टाक्याच्या अगदीच समोर एक मंदिर आहे.हे मंदिर एका टाक्याच्या अर्ध्या भागावर बांधलेले आहे.मंदिरात एक शिवपिंडी आहे.
बिरहमदेवाचा डोंगर म्हणजे ब्रम्हर्षींचे तपाचे स्थान.ब्रम्हदेवाची पुजा हिंदु धर्मात करत नाहित.त्यामुळे, त्याठिकाणी हि शिवपिंड असावी.मात्र स्थान तेच ब्रम्हर्षींचे आहे.कारण,  ज्या प्रमाणे ब्रम्हदेव कमळात बसलेला असतो.त्याच प्रमाणे हे मंदिरही अर्ध्या टाक्यावर आहे.
______
सतीशिळा:-
    या मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे.त्यावर कांकणचुडा असलेला कोपरातून दुमडलेला हात आहे.अर्थात हि कुण्यातरी स्री सती गेल्याच्या स्मरणार्थ घडविली अाहे.पण हि कुणाची....?
_____
गुफा:- 
   आता या मंदिराच्या उजवीकडील तटबंधीलगत एक मोठी गुहा आहे.हे लेणे किंवा गुहा यादवपुर्व काळातील आहे.त्याच्या आतमध्ये छोटी आणखी एक गुहा आहे.अज्ञात कालखंडातील ब्रम्हदेवाच्या अनुयायांचे हे निवासस्थान किंवा अध्यापन स्थान असावे.या गुहेत मी तीन चुली दगड मांडून तयार केलेल्या चुली पाहिल्यात.

"अहो..नशिब माझे व त्या रायगडाचे त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह नाही दिसले...!"
    याच्या तोंडाला एक शेतखाना(संडास) आहे.ते अगदी स्पष्ट दिसते आहे.शिवरायांच्या दुर्गबांधणीचा हा नमुना आहे.
_______
पद्मावती माची संरक्षक हुडा :-
   या गुफेच्या उत्तरेस तचबंधी लगत चालत गेल्यास एका बुरुंजावर बांधकाम दिसते.तो हाच पद्मावती माची संरक्षक हुडा होय.चांगले निरखुन पाहिल्यास हा नुसता हुडा नव्हता तर,चांगली एक रुम होती.
त्याच्या तख्त पोशिच्या लाकडांच्या खाणाखुणा आजही आहेत तिथे.याच बुरुंजाहून समोर सिंहगड दिसतो.याच बुरुंजात एक दरवाजा आहे.तो आता शिवभक्तांच्या अवकृपेने व सरकारच्या दुर्लक्ष पणाने अर्धा गाडला गेलाय.हा दरवाजातील मार्ग खाली थेट पद्मावती माचीवर उतरतो.तो मार्ग आता शिल्लक नाहि.त्याच्या काही पायर्या दिसतात.आता याचा विनाश कुणी केला हे त्या काळाला रोख ठोक विचारल पाहीजे.
 ज्ञात कालात राज कुटुंबातील स्रिया याच मार्गे पद्मावती माचीवर ये जा करत असत.
बघु आमच्या हातून भविष्यात काही यासाठी होतेय का..?
करुच...!
    संजीवन माची दरवाजा,पद्मावती माची, पाली दरवाजा , सोपानमार्ग हे सर्व या बुरुजावरील तोफेच्या मार्यात होते.

गाथा दुर्गराज राजगडाची भाग ६

सरनोबत सेनापती येसाजी कंक

वेळवंड खोरे व गुंजण मावळ  सिमेवर वसलेला दुर्गराज राजगड.जणू गरुडासम सह्याद्रीच्या बसकणीत वसलेला.स्वराज्य बांधणीचा संकल्प व त्याची प्रथम सुरुवात म्हणजे राजगड.शिवरायांच्या कल्पकतेच्या कलागुणांनी साकारलेला एक हा गिरीदुर्ग.अनेकानेक घटनांचा साक्षिदार.स्वराज्याशी हाडामासाच्या मावळ्यांनी जस इमान राखल तसच या दगड चिर्यांनीही राखल.हिर्यासम या दुर्गांच्या विरमाळेला सजवल ते या आपल्या बापुड्या बापजाद्यांनी मावळ्यांनी.आपल्या नसानसात आज त्यांचे रक्त आहे.पण, ते इमानी नक्कीच नाही.माझेही नाही.बेईमानतेच्या या अंधारातून आम्ही सोळाव्या शतकाच्या मध्यावर एका शिवसुर्याच्या अस्तित्वाने निरमळलेल्या प्रकाशात आलो व ते इमान पाहिल की,स्वराज्य या एकाच प्रेरणेने प्रेरीत झालेले अनेक विर महाविर मावळच्या मातीत कसलेले अनेक मावळे आपल्या डोळ्यासमोर उभे ठाकतात.त्यांच्या पराक्रमाची गाथा आजहि महाराष्ट्राने पुन्हा पुन्हा आळवावी.जणू काही त्यांनी हे सर्व आपल्याला करण्यास भाग पाडले.त्यांच्या या महाराष्ट्र देशीच्या भुमीवर सांडलेल्या रुधिराबिंदुनी ते आळवण्यास भाग पाडले.या मावळ्यांत स्वत:च्या कर्तबगारीवर खडे ठाकत यवनी वादळांना आपल्या तरवारीच्या बळावर तोलत पेलत एक नाव अलगद समोर येत.ते म्हणजे,  शिवरायांच्या पायदळाचे सरनोबत वेळवंड खोर्यातील  राजगडाच्या आसमंतातील 'भुतोंडे' गावचे "येसाजी कंक"..

_____कंक म्हणजे क्षत्रिय.महाभारतामध्ये ज्याप्रमाणे, पांडवांना १२ वर्षाचा वनवास होता.त्याच प्रमाणे एक वर्षाचा अज्ञातवासही होता.या समयी हा अज्ञातवास युधिष्ठिराने विराट राजाच्या पदरी सेवेत केला.तेव्हा, त्यांनी नामांतरण करुन 'कंक' हे उपनाम धारण केले व अज्ञातवासात विराट राजाची सेवा केली.यादव कुलोत्पन्न विराट राजाच्या विदर्भातील नगरीत युधिष्ठाराच्या अवती भोवतीचे लोक 'कंक' नावे संबोधले गेले.कृष्णा नदीकाठच्या श्रीक्षेत्र वाई परिसरातील वैराटगड या किल्ल्यावर पुर्वी वैराट नावाच्या जमातीची वस्ती होती.पांडवांच्या वनवासाच्या कालखंडात वैराट लोकांना पांडवांनी जिंकले .सहाजिकच वैराट लोक हे पांडवांचे अनुगामी बनले.पुढे पांडवांच्या विराट राजाच्या अज्ञातवासातील कालखंडात हे लोक युधिष्ठीराच्या समवेत विदर्भात सामावले.युधिष्ठीर यांच्या कंक याचे अनुगामी पुढे 'कंक' नामाभिधान पावले.कुरुक्षेत्रावर कंक लोक पांडवांच्या बाजूने लढले आणि युद्धोत्तर कालखंडात आपापल्या वतनांवर परतले.ते कर्मामुळे क्षत्रिय झाले.वर्ण हे जातीवर नाही तर कर्मावर आधारीत होते.पुढे हे क्षात्रधर्म स्विकारलेले 'कंक' नामक लोक श्री श्रेत्र वाई परिसरात पुन्हा स्थिरावले.स्थिरावलेले हे लोक येथील आसमंत परिसरात विखुरले .यादवकुलोत्पन्न वैराटवंशीय लोकांचा एक जथा.जावळी मुलुखांत्तर्गत सत्ताकारणाने म्हणा कींवा सेवा कारणाने म्हणा स्थिरावले.याच कंक घराण्यातील कंक कुलोत्त्पन्न 

येसाजी कंक पुढे भोर तालुक्यातील भूतोंडे गावी वास्तव्यास होते.

______भुतोंडे गावचे प्रतिष्ठित व तोलामोलाचे देशमुख घराणे.या घराण्याची नाळ शिवरायांच्या लहानपणीच जोडली गेली व शिवप्रभूंच्या सानिध्ध्यात जगलेल्यांनी स्वराज्य प्रेरणेसाठी झोकून न द्यावे तर नवलच.शिवरायांचे लहानपणीचे सवंगडी येसाजी कंक.जावळीच्या मोर्यांचे पारिपत्य करत असताना अनातुलनिय पराक्रम गाजवत येसाजींनी आपल्या कर्तबगारीची मुहुर्तपेढ रोवली.

____पुढे येसाजी कंक हे शिवयांच्या घोडदळाच्या पायदळाचे नाईक होते.पुढे शिवरायांच्या मर्जित आल्यावर ते त्यांचे अंगरक्षक झाले आणि वतन सोडून दुर्गराज राजगडाच्या अपसव्य असणार्या सुवेळा माचीवर कायमचे वास्तव्यास आले.


"लष्कराचा सरनौबत नेतोजी पालकर केला.

 नेतोजी सरनोबती करत असतां सात हजार पागा व तीन हजार शिलेदार अशी दहा हजार फौज जाहाली.मावळे लोकांची सचणी दाहा हजार पावेंतो जाली.यांसि सरनोबत येसाजी कंक म्हणून केला."

   येसाजींच्या सरनोबतीची ही घटना सभासदाने आपल्या बखरीत नोंदली.

__________________________________

"नऊ पाईक व त्यावर दहावा नाईक.मावळे लोकांस एक नाईक, पन्नास लोक म्हणजे पंच नायकी, यांस एक हवालदार, दोन तीन हवाले मिळून एक जुमलेदार,दहा जुमले मिळुन एक हजारी, जुमलेदारास शंभर होन तैनात सालीना, एक सबनीस त्यास चाळीस होन तैनात, हजारी यांस पांचशे होन तैनात.त्याच्या सबनीसास शंभर सव्वाशें होन पर्यंत, ऐशा हजारियांस सात हजारिया मिळोन एक सरनोबत येसाजी कंक म्हणून केला."

"तेव्हां तोरणा किल्ला विजापूरी बादशहातीलच येथें राजकारण करुन मावळे लोक पासलकर,कंक, मालुसुरे वगैरे सरदादल ठेऊंन ममतेंत ठेविले.

-चिटणिस बखर

___________________________________

" शिवाजीराजे पातशाहीस काळ जाले.तेव्हां त्यांचे वडील शहाजीमहाराज वजीर त्यांचे वेळेस दादो कोंडदेवकारकून होता.शामराव निशकंठ ब्राम्हण व मोरो त्रिमळ पिंगळे व येसाजी कंक व तान्हाजी मालुसुरा व बाजी पासलकर हे पायींचे सरदार मोठे शूर धारकरी व मावळे लोक शिपायी असी भरंवस्यांची मनुष्यें जमा करुन मुलूख काबीज करुं लागले;आणि आपला अमल बसविला."

-शेडगांवकर भोसले बखर

"हशम लष्कराचा सरनौबत माणकोजी चोर मराठा सरनौबती करत होता.तो मृत्यु पावला.नंतर त्याजकडील सरनौबतीचे काम दुर करुन  येसाजी कंक यांस हशम लष्कराचा सरनौबत केला व नेताजी पालकर स्वारांचा आधिकारी सरनौबती करीत होते"

-शेडगांवकर भोसले बखर

_________________________________

"

        या मानाला व पदाला साजेसे शौर्य मावळ मातीत घडले होय घडलेच.

प्रतापगडावर आफजलखानाची शिवरायांनी माती केली.येसाजी कंक, तानाजी मालुसुरे, कोंडाजी वडखले, रामजी पांगेरा, कमळोजी साळुंखे , गोदाजी जगताप आदींनी जावळीच्या घनदाट जंगलात पिछाडी सांभाळत.जंगलात लपुन बसत याकुतखान , हसनखान अंकुशखान, मुसाखान, फाजलखानाला या मर्दांनी धुळ चारली.

_______________________     _______ 

या बाबत शिवभारतातील उल्लेख-

"तेव्हां शंभाजी कावजी, काताजी इंगळे, कोंडाजी व येसाजी हे दोघे कंक , कृष्णाजी गायकवाड,सूरजी कांटके, त्याचप्रमाणे जिवा महाला, विसाजी मुरुंबक,शंभाजी करवर, इभ्राइम सिद्दी अशा शिवराजरक्षक दहा महाविरांनी गर्जना करुन म्यानांतून प्रचंड तरवारी उपसून, पर्वतांनी जसें वायूस आडवावे तसा त्यांना(आफ्जुल्ल्याच्या यवनांस) तेंथे विरोध केला.

    कावजी, दोघे कंक, अभिमानी इंगळे, शूर मुरंबक,त्याच प्रमाणे करवर, क्रुर कांटके, गायकवाड आणि सिद्दी ह्यांनी अवेशाने लढणार्या दुसर्याहि शत्रूनां पटापट पाडले.

    कमळाजी सोळंखे, येसाजी कंक , तान्हाजी मालुसुरे, कोंडाजी वरखल आणि रामजी पांगारकर हे पांच अग्नीप्रमाणे तेजस्वी वीर एकेक हजार पायदळासह तसाच पराक्रमानें प्रख्यात व पांच हजार पायदळ असलेला नारायण ब्राम्हण अशा या सर्वच महायोद्ध्यांनी वेगानें येऊन अरण्याच्या मध्यभागी असलेल्या, पुष्कळ योद्यांची गर्दी असलेल्या शत्रु सेनेस चोहोंकडून घेरलें"

-शिवभारत

____________________________________

______पुढे शहिस्तेखानाच्या छाप्याच्या वेळी देखील येसाजी कंक शिवरायांसमवेत होते.

"वाड्यांत खासा जातींने गेले.बराबर येसाजी कंक व तान्हाजी मालुसुरे उभयंता घेतले.वाड्यात त्रिवर्ग येऊन महाला नजीक गेले.तेथे खोजांची चौकी होती.दीपांचा उजेड पाहून, दुसरे वाटेनी होऊन रंगमहालात गेले.तेथें शास्ताखानाचा लेक निजला होता.त्यास पाहोन हाच खान म्हणून तरवार नागवी केली.यश संपादून आले.ते येसाजी कंक व तान्हाजी मालुसुरे यांस मिळोन बहुत आनंद झाला."
-श्री शिवदिग्विजय बखर

त्याच प्रमाणे श्री शिवदिग्विजय बखरीत आग्र्याच्यासभेट समयी देखील येसाजी कंक यांचा उल्लेख आहे.

____शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयासमयी येसाजी शिवाजी महाराजां समवेत होते.

___"अन्न महाराजांचे खातो.त्यांच्या आज्ञेने आलो.त्याच्या आज्ञेने तुझ्या हत्तीसी झुंजलो.बक्षीस मी घेणे मार्गाचे नाहि.आम्हांस आमच्या महाराजांनीकाय कमी उणे केले आहे.तें तुमचे घेऊन निर्वाह करावा.आपलें अन्न सेवन केले असतां आमची बुद्धी भ्रष्ट होईल.जे देणे तें महाराजांकडे द्यावे.माहाराजांची चाकरी करणे हा आमचा धर्म!मी माझ्या महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी तुझ्या हत्तीसीं जुंझलों!"


         छत्रपतींच्या आदेशाने गोवळकोंड्याच्या अबुलहसन कुतुबशहाच्या मदमस्त हत्तीशी झुंज घेतली व त्यास आपल्या पराक्रमाने लोळवले.हे सर्वश्रूत आहेच.शिवरायांच्या सोबतीचा एक एक वीर एका मदमस्त हत्तीच्या ताकदीचा होता.तो वसा दिला होता या मावळमातीने.

______स्वराज्यातील अनेक यशस्वी मोहिमांचे नेतृत्व येसाजी कंकांनी आपल्या पराक्रम गुणांनी यशस्वीपणे पेलले.औरंगजेबाने लहरी चाल खेळत त्याने कुडाळ सावंत व वेंगुर्ल्याच्या देसाई यांच्या मदतीने पोर्तुगीजांना फितवून फोंड्याच्या किल्ल्यावर हल्ला करवीला.

फोंड्याच्या किल्ल्याचे किल्लेदार असताना अवघ्या ८०० मावळ्यानिशी या पिता पुत्रांनी  पोर्तुगीजांना या मावळमातीचा कस दाखवला होता.संभाजीराजेंनी गनिमी काव्याने हा डाव आखला व त्या पोर्तुगिज गव्हर्नरला असा काही लोळवला की, त्याने गोवा ही राजधानी सोडून दुसरीकडे राजधानी स्थापली.पण, संभाजीराजेंना पोहचे पर्यंत पिता पुत्रांनी गड राखला.अतोनात संघर्ष इंग्रजांनी जवळच्या टेकडीवर तोफा चढवल्या.त्यांच्या तोफांचा पल्ला लांब.तटबंधी व बुरुंजावर सलग चार दिवस मारा करत होते.यात येसाजी कंक व वडील पुत्र कृष्णाजी जखमी झाले.येसाजी तर पुर्ण जायबंधी झाले.लढाई नंतर संभाजीराजेंनी त्यांना राहत्या घरी पाठविण्याची आज्ञा केली.पुढे जखमा फुटुन पुत्र कृष्णाजी मयत झाले.

       या युद्धात पराक्रम गाजविला म्हणून संभाजीराजेंनी येसाजी कंकांस १ हजार होन तैनात करुन सन्मान केला.कृष्णाजी कंक यांच्या लहान मुलास पिता स्मरणार्थ 'कृष्णाजी' हे नाव दिले.त्यास सुभेदारी दिली.कृष्णाजीचा भाऊ चाहुजी यास कारभारी म्हणून नेमले.एकशे पन्नास हशम,दहा भोई, तीस दिवटे,वीस आफगिर्या नेमल्या.येसाजींस पालखीचा मान दिला.


"पत्रवतन कृष्णाजी कंक पडती नायेक राज्यामंडळ शके १२ राजपुरीहून फोंडीयास क्रोधन नाम संवत्सर आषाढ श.२ फोंडीयाच्या कोटात फिरंगियांनी लगट केला.राजश्री स्वामी फोंडीयास गेले, गनिमासी गाठी घालून झुंज बहूत केले.ते वक्ती दोघांना जखमा लागोन चकचूर झाले.स्वामिंनी घरी जावयाची आज्ञा केली.ते जखमा फुटोन कृष्णाजी मयत झाले."

(शिवचरीत्र साहित्य खंड दोन:भा.इ.सं.म.पुणे)

___अशा या नरविराने वयाच्या नव्वदाव्या वर्षी सन १७१६ रोजी भूतोंडे गावी आपला देह ठेविला.

______ पोराला खरचटले तरी,दवाखाना दाखवणारे आमचे आजचे बाप.तिथे शिवप्रंभूंच्या चरणी इमान राखत.पोटच्या पोराला गनिमांच्या नंग्या तरवारी व तोफांच्या समोर उभे करणारी ही मांदियाळी वेगळी त्यांची निष्ठा वेगळी, ते रक्त वेगळे, त्यातील धमक वेगळी.या मराठ्यांच्या इतिहासातील हे सुवर्णयुग इतिहासाने सोनेरी पानांत लिहिले.त्या सोनेरी पानांतील ही काही ज्ञात अज्ञात पाने व त्यास साक्षिदार तो दुर्गराज राजगड गुंजण,रोहिड खोरे, वेळवंड खोरे हा आसमंत.

____पण,हयातभर शिवरायांची पाठराखण व हाती तरवारी, दांडपट्टे, धोप घेऊन रानोमाळ दौड घेणार्या रणमर्द मराठया वीराची समाधी?

 कुठे आहे..?

कुठे आहे..?


" परी तयांच्या दहनभूमीवर नाही चिरा, 

              नाही पणती"


        आम्ही त्या शिवतीर्थ रायगडावर जाऊन सेल्फी विथ महाराज समाधी व सिंहासन आदी काढणारे माझ्यासारखे स्वयंघोषीत मावळे व त्यांचे चाळे पाहून या समाधी चिर्यांनी शिवरायांचा प्रत्येक क्षेत्रातील वापर पाहुन.आपापसातील वाद पाहुन...

"नका राजं आम्ही हयातभर तुमच्या चरणांची सेवा केली.आम्हास तुमच नाव घेऊन वापर करणार्या तुमच्याच मावळ्यांना बघवत नाही.राज आपुन रात्री अपरात्री मोहिमा केल्या.प्रसंगी छातीचा कोट करुन वार झेलले.गडकोट सांभाळले.कित्येक मावळ्यांनी स्वत:ला संपवून घेतल.राजं...तुम्ही त्यांच्या मृत्यू वर तुमच्या राहत्या राजवाड्यात तुम्ही चार आसव    गाळलीत.ते या आजच्या विसाव्या शतकातील मावळ्यांना कळेना राजं....."



अस काहिस म्हणत...

         स्वत:स या मावळाच्या मातीत गाडुन, कोंबुन, ठोसुन,नेस्तनाभूत  तर केल नसेल ना..?

  मज गरीब भिकार्याकडे पुस्तक घेण्यास पैसे नाहित.कुण्या श्रीमंताने पुस्तकांतून या समाधीचा शोध घेतला असेल.(तो तर कुणीच घेतला नाही.त्यातहि प्रचंड वाद आहेत.पण, तरीही)

तर,  मज पामरांच्या पुढ्यात टाकावा.ही दंडवत विनंती.

म्हणजे, निदान "सेल्फी विथ सेनापती येसाजी कंक"

समाधी असले चाळे करण्यासाठी निदान तेथे जाऊ.

(तसे मी कधी करत नाही.पण, तसे समजा.लोक म्हणतात तुम्ही प्रसिद्धी साठी फोटोग्राफी करता.तुम्ही निदान तस समजा तरी...)

_____भूतोंडे स्थित त्यांचे आजचे वंशज सुद्धा त्या काळापसून ते आजतागत स्वराज्याची सेवा , रयतेची सेवा वारसा जपत इमाने इतबारे करत आहेतच.त्यांची ती थोरवी मोठी.

कधी गेलात तर 'भुतोंडे' गावी नक्की जा.

तेथे येसाजी कंकांचा वाडा आहे.त्यांची शस्र त्यांनी आजही जपुन ठेवलीत.अगदी कुणीही शिवप्रेमी हे सहज पाहु शकतो.त्यांचा मनमिळावू व लाघवी स्वभाव तुमचे मन तर जिंकेलच.पण, या कंक घराण्याविषयीचा स्वाभिमान दुगुना होईल यात शंका नाही.

मलाही तो वाडा माहीत नव्हता.आमच्या बा रायगड परिवाराचे सतीश दादा शिंदे ह्यांनी नरड्याची घाटी फोडून सांगितले.

" आरे ..जा तेथे आहे तो वाडा पहा जरा.."


तेव्हा, कुठे त्या वाड्याच व या मनाच्या राजगडासम मोठ्या असणार्या त्यांच्या वंशजांचे दर्शन झाले.


धन्यवाद...
लेखनसिमा..
संदर्भ-
-शिवभारत
-सभासद बखर
- मल्हार रामराव चिटणीस बखर
(शिवरायांचा सप्त प्रकरणात्मक इतिहास)
-मराठा साम्राज्याची छोटी बखर(pdf)
-भोसले शेडगांवकर बखर(pdf)
-किल्ले राजगड कथा पंचविसी
व रणपती शिवाजी महाराज
- आप्पा परब
स्वराज्याचे शूर सेनानी-
दामोदर मुग्दुम सर 
(वंशावळ साभार)
पांडवकालीन कंक नावाचा इतिहास
-नेट साभार

संकलन-
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी