गडकोट अर्पणपत्रिका



           हिमालय,अरवली,विन्ध्य व सह्याद्री हे हिंदुस्थानचे मुख्य पर्वत होत.त्यांनी हिंदुस्थानची प्रादेशिक विभागणी व मांडणी केली आहे.सिंधुचे मैदान गंगेचे मैदान व सह्याद्रीचे पठार असे हिंदुस्थानच् मुख्य नैसर्गिक भाग आहेत.सह्याद्री हा दक्षिणपथाचा निर्माता आहे.अगस्तींच्या नेतृत्वाखाली आर्यांच्य् वसाहती दण्डकारण्यात होऊ लागण्यापूर्वीच भूगूंच्या नेतृत्वाखाली आर्यांच्या टोळ्या दक्षिणेत दाखल झाल्या होत्या.क्षत्रपांनी याच मार्गाने दक्षिणापथावर आक्रमण केले होते.अर्थांत सौराष्ट्र हें सह्याद्रीच्या पठाराचे दौर्बल्य आहे.खंबायतच्या आखातापासून ते अष्टागरापर्यंत अपरान्ताचा भाग मैदानी आहे.म्हणून उत्तरेकडून या भागात सहज प्रवेश करता येतो.मात्र या भागांतून पठारावर येण्यासाठी असलेले घाटमार्ग मात्र पुरातन काळापासून सह्याद्रीच्या शिखरांनी व प्रबळ गडकोटांनी रोखून धरलेले आहे हे सह्याद्रीचे महात्म आहे.
        सह्याद्रीच्या सह्यांशी आपण सहकार्य करत नाही किंवा शक्तीचे नियंत्रण करत नाही.झाडे तोडतो,माती वाहून जाऊं देतो हा सर्व दोष आपला आहे.हिंदुस्थानाच्या इतिहासात ज्यांनी नाव गाजविलें त्या मावळ्यांचे निवासस्थान घाचमाथ्यालगतच आहे.एकूण महाराष्ट्राचे महात्म्य,जिवनसामर्थ्य व समृद्धी ही पर्यायाने सह्याद्रीवरच अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.शिशुनाग हा हिंदुस्थानातील पहिला द्नात राजवंश होय.त्यांची राजधानी गिरिव्रज येथे होती.या राजधानीच्या नावातच गिरी आहे आर्थात हि राजधानी डोंगरी होती हे नव्याने सांगावयास नको.अगदी पुरातन काळापासून डोंगरी किल्ल्यांचे महत्व आपल्याला याठिकाणी लक्षात येते.गड व दुर्ग हि संघर्षाची प्रतिके होत.दुर्ग हे शस्त्रसज्ज दुर्गेच्या अराधनेचे आसन.भवानी ही स्वातंत्र्याची आधिष्ठात्री देवता होय.दुर्ग हे स्वातंत्र्य लक्ष्मीचे यद्नकुंड होय.तरवारीचे खणखणाट आणि तोफांचे धडधडाट,रणवाद्यांच्या मैफलित दुर्गांची वास्तूशांती व्हावी लागते.आत्मार्पणाची अहमहमिका व मर्दुमकीची शर्थ यांवर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते.महाराष्ट्रातील किल्ल्यांनी स्वातंत्र्यलक्ष्मीची पूजा अनेक वेळा हरप्रकारच्या साहित्याने केलेली आहे.
    सामन्तावस्थेत असताना सम्राटांच्या संरक्षणासाठी आणि संक्रमणावस्थेत असतांना स्वत:च्या सत्तासंवर्धनासाठी यादवांनी सह्याद्रीचा व त्यावरील गडांचा भरपूर उपयोग करुन घेतला.त्यांनी अनेक गड उभारले व थोडेफार लढवले सुद्धा.परंतु हे जेव्हा सम्राटपदावर आले व अधिष्ठित झाल्यानंतर त्यांचे या गडकोटांच्या महाशक्तीकडे दुर्लक्ष झाले.संकटाच्यावेळी सुद्धा या महीशक्तीचे त्यांना अकलन झाले नाही.त्याचा उपयोग करुन घेता आला नाही.त्यामुळे हि पुर्णच्या पुर्ण सत्ताच लयास गेली."

"शेवटी शाश्वत सत्य हेच की महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचे सह्याद्रि हेच 'अधिष्ठान' आहे..!"
          
युरोपमधील सर्व रस्ते रोमकडे जातात असा एक वाक्प्रचार आहे.असच काही प्राचिन महाराष्ट्राच्या बाबतीतही होत की,प्राचिन महाराष्ट्रातील सर्व रस्ते 'पैठण' या राजधानीकडे व 'तगर' या बाजारपेठे कडे जात असत.महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाणारे रस्ते 'महेश्वर' व 'मांधाता' या नर्मदेच्या  उतारांवरुन,विन्द्याद्री ओलांडून
,उज्जयिनीकडे जात असत.हिंदुस्थानच्या राजसत्तेचे केंद्र उत्तरेंत होते तोवर पश्चिम किनार्यावरील 'भडोच'हल्लीचे भरुच हें बंदर भरभराटींत होते.सातवाहनांच्या आमदानीत राजसत्तेची केंद्रे 'पैठण' व 'नाशिक' येथे प्रस्थापित झाली.त्यामुळे व्यापारी केंद्रे दक्षिणेकडे झुकली.त्यांच्या काळात मुख्यत्वे करुन 'सोपारा' व 'चौल' ही बंदरे भरभराटीस आली.कदम्ब हे सातवाहनांचे दक्षिण महाराष्ट्रातील उत्तराधिकारी.त्यांच्या आमदानीत पश्चिम किनार्यावरील व्यापाराची केंद्रे ही दक्षिणेकडेच गेली.राजमार्गाची धाव हि बहुदा राजधानीकडेच असते.राजसत्तेची केंद्रे बदलली गेली तशी नवे राजमार्ग तयार झाले.त्याच्या नियंत्रणासाठी नव्या योजना,नवे दुर्ग व गड उभारावे लागले.मराठेशाहीच्या दुसर्या शतकांत सर्व रस्ते हे पुण्याकडे वाहू लागले.घाटमाथ्यांच्या भोवती काही गड सामंतांनी  स्थानिक वर्चस्वासाठी उभारलेले आहेत तर काही प्रादेशिक नियंत्रणासाठी साम्राज्यसत्तेने आपल्या आधिकार्यांच्या मार्फत उभारले आहेत.
       सह्याद्रीची पूजा ही मातृभूमीची पुजा तसेच भारतमातेची पुजा होय.आम्ही सह्याद्रीची पुजा करतो.कारण,तोच आम्हाला जन्म देतो व आपले पालनपोषण करतो आणि अखेरीस आम्हाला त्यातच विलीन करुन घेतो.घाटमाथ्यावरील गडकोट हीं सह्याद्रीच्या स्वतंत्र्यप्रेरकतेची प्रतिकें;महाराष्ट्राच्या धारणा न प्रतिकारशक्तीची.त्यांची व्यावहारिक उपयुक्तता नष्ट झाली हा काळाचा महिमा! म्हणून त्यांचे महात्म नष्ट झाले की काय? तर नाही.समतावादी,विश्वशांतीचे पुरस्कर्ते व नवयुगाचे प्रवर्तक सांगतील कीं ही मृत मध्ययुगाची हाडकें आहेत.असतील; मात्र तीं या चालत्याबोलत्या सांगाड्यांहून आधिक जिवंत आहेत.अस्थि असल्याच तर त्या दधीच्याच आहेत.
गडकोटांचे दर्शन संवर्धन हे सह्याद्रीच्या स्वतंत्र्यप्रेरकतेचे पुजन आहे.
भगवा झेंडा हे मराठी क्षात्रवत्तीचे प्रतिक होय आणि मराठी भक्तीभावाचेही.सह्याद्रीच्या मंदिरांच्या शिखरांवर,येथून आघाडीवर निघणार्या सैन्यांच्या पुढे,पंढरीकडे लोटणार्या वारकर्यांच्या खांद्यावर भगवे झेंडे भडकत असतात.भगवी हा साध्या गेरुचा गडद रंग,सह्याद्रीच्या परिसरातील तांबड्या मातीचा रंग होय.आपण सह्याद्रीत कोठेही उभे राहून पाहिल्यास आसमंतात भगवा रंग फडकतांना दिसतो.हाच झेंडा हाती घेऊन शिवाजी महाराजांनी  स्वराज्याचा एक प्रण पुर्णत्वास नेला.
शिवरायांचे वर्णन करताना आंग्ल इतिहासकार म्हणतो की,
"शिवरायांचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते.
,त्यांचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवशावरच होते.
ते खरेखुरे दुर्गस्वामी होते.त्यांचा जन्म दुर्गांत झाला.त्यांना जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे झाले आणि त्यांच्या दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले ते त्यांच्याच प्रयत्नाने झाले.त्यांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रूंना धाक होता.त्यांच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती.त्यांच्या विजयाचा तो पाया होता.त्यांच्या वाढत्या महत्वकांक्षेचा तो जिना होता.दुर्ग हेच त्यांचे निवासस्थान व तेच त्यांच्या आनंदाचे निदान होते.कित्येक दुर्ग त्यांनी स्वत: बांधले  आणि जे आधी बांधले होते.त्या सर्वांना बळकटी आणली."

    आजमितीस मराठ्यांच्या इतिहासाचे ज्वलंत व जिवंत साक्षिदार असणारा हा सह्याद्री व गडकोटांचे दर्शन संवर्धन करणार्या हरएक भटक्या व संवर्धकांच्या चरणी हि माहितीपत्रिका अर्पण.

"वर्तमानासोबत चालता चालता तुझा इतिहास सारा गिरवला,
भविष्याच्या विचारात तुला प्रत्येकाच्या  हृदयामध्ये मिरवला.
 तुझे गुणगाण गाताना मी हि जरा सुखावलो,
तुझी झालेली पडझड पाहून थोडा का होईना दुखावलो.
 तुझ्या पायरीचा चिरा हि तड्यास नेला.
जेव्हा  माझा शिवबा तुला सोडूनी गेला.
तुही रडलास, तुही ढासळलास गेलास परका होऊन,
पायाखालील धूळही म्हटली परत येईन तर शिवबास घेऊन.
तुझे वैभव टिकविण्यासाठी साऱ्या जगाला घालतो  मी साद,
म्हणून सांगतो गडकोटांनो  तुमच्या संवर्धनासाठी पसरतो मी हात."


धन्यवाद.....!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी