सुधागड परिसरातील घाटवाटा-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
_____व्यापार हा नेहमी सुरक्षित व सोईस्कर मार्गांच्या आणि संपन्न बाजार पेठांच्या शोधात असतो ही खुष्कीचे बहुतांशी मार्ग हे अनेक सत्ताधिशांच्या वाढत्या बलामुळे बंद झाल्याने हिंदुस्थानचा व्यापार हा सर्व पश्चिम सागर किनार्याकडे वळू लागला.पहिली सत्तेची केंद्रे हि जो पर्यंत उत्तरेत होती तो पर्यंत व्यापार हा गुजरातेतील भडोच बंदराच्या जवळ केंद्रित होऊन भडोच(भरुच) बंदराची भरभराट झाली.मात्र पुढे भारताच्या सत्तेचे केंद्र हे सातवाहनांनी दक्षिणपथांत स्थापन केले.त्यामुळे,अर्थातच व्यापार हा पश्चिम सागर किनार्याकडे लोटला गेला व सोपारा,कल्याण,चौल हि बंदरे भरभराटीस आली.चौलच्या उत्तरेस अंबा व दक्षिणेस कुंडलिका या नद्यांची उगमस्थाने आहेत.सोपार्याहून कल्याण मुरबाडमार्गे नाणें घाटांतून जुन्नर नाशिक पर्यंत आणि चौल पासून कोकण दरवाजामार्गे कार्ल्याहून तगर व पैठण पर्यंत व्यापारी वाहतूक सुरु झाली.
पुढे दक्षिणपथांत राजसत्ता काहीशी स्थिर स्थावर झाल्यावर व व्यापाराची केंद्रे पश्चिम सागरकिनार्याकडे स्थापित झाल्यावर सह्याद्रीतील या घाटवाटांचा वापर वाहतूकीसाठी होऊ लागला.सह्याद्रीत कोंकणातून घाटमाथ्यावर चढणार्या व तात्कालीन काळात वापरात असलेल्या असंख्य घाटवाटा आहेत.पुढे मागे हे मार्ग बळकट झाल्यावर या मार्गांवर लेण्यांची निर्मिती होऊ लागली.दुर्गांच्या निर्मितीचे लेणी हे पहिले पाऊल होय.व्यापारी,उदिमांच्या औदार्यांने बौद्ध भिक्षुकांसाठी उपजिविका वा द्नानसाधनेसाठी या लेण्यांची निर्मिती करण्यात आली.यातीलच ठाणाळे व खडसांबळे या लेण्या किल्ले सुधागड जवळ आहेत.पुढे बराच काळापर्यंत या घाटवाटांमार्गे हिंदुस्थानचा व्यापार चालू होता.दिवसेंदिवसांच्या प्रगतीतून या घाटवाटांच्या तोंडावर व पायथ्याला काही किल्ल्यांची निर्मिती झाली.व्यापाराचा व सत्तेचा विस्तार हे यामागिल मुख्य कारण होते.
पुढे नद्यांच्या मार्गेही शक्य तितकी वाहतूक करता येत असे यातूनच नद्यांच्या दोहोबाजूंनी किल्ल्यांची निर्मिती झाली.अशीच या परिसरातील एक महत्वाची नदी म्हणजे कुंडलिका नदी होय.कुंडलिका नदिचा उगम हा ताम्हिनीच्या घाटात होतो.कुंडलिका नदी ही पुढे साळावच्या खाडीला मिळते म्हणजे रेवदांडा व चौल परिसरात.कुंडलिका नदीच्या उगमापासून अनुक्रमे सुधागड, सरसगड, सूरगड,अवचितगड,बिरवाडीचा किल्ला,पुढे समुद्राच्या तोंडाला डाव्या बाजूला कोर्लाई व उजव्या बाजूला रेवदांडा हे किल्ले आहेत.त्याच प्रमाणे या परिसरात सुधागड किल्ल्याच्या जवळ दोन महत्वाचे घाट आहेत जे वर तैलबैला किल्ल्याच्या परिसरात निघतात.ते म्हणजे सवाष्ण व वाघजाईचा घाट.चौल बंदरातून व अष्टागारातून उचललेला माल हा रोह्याच्या खाडी आदी मार्गे तो ज्या परिसरांत न्यायचा आहे त्याच्या जवळील घाट पाहून त्या घाटामार्गे मालाची वाहतूक केली जात असे.
पैकी बोर घाट(खंडाळा घाट) ते ताम्हिनी घाटापर्यंतच्या घाटवाटा पुढिल प्रमाणे.
घाटाचे नाव- पायथ्याचे गाव-टोकाचे गाव
बोर घाट-खोपोली-खंडाळा
कुरवंडा- चावणी-कुरवंडे
आंबेनळी-घोटवडे-कुरवंडे/लोणावळा
पायमोडी(मोराडी)-माणगाव-आतवण
निसणी(सवघाट)-वासुंडे-पेठ शहापूर
कोराई/काठी-कळंब-आंबवणे
अनघाई-मुळशी/कळंब-माजगाव
सवाष्णीचा घाट-कोंडगाव-सालतर
वाघजाई घाट-ठाणाळे-तैलबैला
भोरप्याघाट-सुधागड-तैलबैला
नाणदांड घाट-पाच्छापूर-ऐकोले
नाळेची वाट-खडसंबळे-केवणी/एकोले
डेर्या घाट-नेणवली-घुटका
गाढवलोट घाट-नागशेत-हिर्डी/पिंपरी
सावळ घाट-भिरा-निवे
लेंड घाट-भिरा कँप-डोंगरवाडी
ताम्हिनी घाट-विळे-आधरवाडी/ताम्हिनी
सातपायरीचा घाट-विळे
या घाटवाटा कोकणातून घाटावर चढत होत्या.यापैकी सवाष्णीचा घाट व वाघजाईचा घाट या दोन मार्गांचा रक्षक किल्ला व सुधागड तालुक्यावर आधिकार असणारा किल्ला म्हणजे भोरप उर्फ सुधागड.
-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा