मांदाड खाडीबाबतचा गैरसमज-नवनाथ आहेर


______इंटरनेटवर बर्याच ठिकाणी वरील प्रमाणे कुंडलिका नदी ही मांदाड खाडीला मिळते व त्या संरक्षणार्थ तळा व घोसाळगड हे किल्ले आहेत.ही सर्रास चुकीची माहीती पसरवली जात आहे.कुठलाही नव्याने अभ्यास न करता.नेटवरचेच उचलून कॉपी पेस्ट मारायचे.असा काहीसा प्रकार या ठिकाणी चाललेला दिसतो आहे.
________मित्र हो या दोन फोर्ट रेंज या एकमेकांपासून काही अंतरावर आहेत.कुंडलिका नदी ही पुढे साळावच्या खाडीला मिळते म्हणजे रेवदांडा व चौल परिसरात.कुंडलिका नदीच्या उगमापासून अनुक्रमे  सुधागड, सरसगड, सूरगड,अवचितगड,बिरवाडीचा किल्ला,पुढे समुद्राच्या तोंडाला डाव्या बाजूला  कोर्लाई व उजव्या बाजूला रेवदांडा हे किल्ले आहेत.

*त्याच प्रमाणे मांदाड या खाडीवर किल्ले तळगड,किल्ले घोसाळगड व पुढे समुद्राच्या तोंडाला किल्ले जंजिरा तर उजव्या बाजूला सामराजगड आहेत.याच मार्गात प्रसिद्ध "कुडा लेण्यां" चा  समुह आहे.

________त्याच प्रमाणे आणखी एक चुकीची माहीती नेटवर अनावधानाने पसरली आहे की कशी माहीत नाही.नेटवर केलेल्या उल्लेखानुसार इ.स.१६४८ मध्ये महाराजांनी तळगड,घोसाळगड घेतल्याचा उल्लेख दिला आहे.परंतू, महाराजांच्या १६४७-४८ मधील लढायांचा आदमास घेतला असता.
पुढील लढायांचे उल्लेख मिळतात.

१)१६४७ ला महाराजांनी बापूजी मुग्दल नर्हेकर यांच्या करवी किल्ले कोंढाणा घेतला.

२)१६४७ ला खेडे बारे नजिक महाराजांनी शिवापूर पेठ वसवली,कोंढाणा किल्ल्याचा बंदोबस्त केला.
याच वेळी दादोजी कोंडदेव यांचे निधन झाले.दादोजी कोंडदेव हे आदिलशाही कडून किल्ले कोंढाण्यावर सुभेदार म्हणून नियुक्त होते.दादोजी कोंडदेवांच्या निधना नंतर आदिलशाहाने त्यांच्या जागेवर मिया रहीम महमद याची नामजादी केली पण महाराजांनी याच वेळी शिरवळचा सुभानमंगळ कोटही घेतला व किल्ले कोंढाणाही हस्तगत केला.

३)१६४८ ला महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास पाठविले बल्लाळ हैबतरावा करवे त्यांने पुन्हा शिरवळचा सुभानमंगळ कोट हस्तगत केला.यावेळी महाराजांनी कावजींच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले व बल्लाळ हैबतरावाचा पराभव करुन सुभानमंगळ कोट पाडून टाकला.

४)१६४८ मध्ये खळद बेलसरची लढाई झाली.

५)१६४८ ला फत्तेखानाशी लढा दिला.

६)पुढे १६५१ मध्ये  जंजिरेकर हबसी यांनी तळे येथे मोर्चे लावले होते व जागी जागी उपद्रव करत असल्याचे कळल्यावर महाराजांनी बाजीराव पासलकर मोसे खोरेकर यांना सैनिक देऊन राजपुरीवर पाठवले.बाजी पासलकरांनी राजपुरीस शह दिल्यावर हबस्यांकडून काय सावंत म्हणून चालून आले.यात बाजीराव व काय सावंत हे दोघेही रणांत पडले.परंतु येथे तळगड घेतल्याचा उल्लेख नाही.

*पुढे आढावा घेतल्यास-

१६५७-
" महाराज पुरंधरास आले.तेथें(कोंकणांत) सोंढवळकर कोटवळकर उभयतां मर्हाठे थोर माणूस होते.त्यांणी लेहून पाठविले कीं,तळा व घोसाळा किल्ले दोन,शामळाकडे आहे.त्याचे प्रांती आम्हास राहणें.वृत्तीवंत आहों.अनेक प्रकारें उपद्रव देतो.तूं राजा धर्मस्थापक आहेस.तरी इकडे स्वारी आलीं असता दोन जागा अनकूळ होऊन देऊं.ह्या योंगे बहुत प्रांत साधेल.आम्ही ह्या अर्थे पदरांत येऊं,तें श्रवणी पडतांच नेकदार मनुष्य चांगले,अलीं तारीफ केली आणि स्वारी पाठविली.मागाहून खासा स्वारी(शिवाजीराजे)गेली.पुढे लोकांनी तळा किल्ला घेतला."
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_________________________________________
१६५७-
"तळा-घोसाळा सोंढवळकर व कोंढवळकर ,हपसियाचे चाकर,मर्द जमातदार होते.त्यांचे राजकारण महाराजांकडे आले.आपली स्वारी कोंकणांत यावी,म्हणजे तळा -घोसाळा घेऊन देतो व जंजिरियांचेहि राजकारण आलें.ह्यांजवरुन खासा स्वारी कोंकणांत जाऊन दोन किल्ले तळा -घोसाळा घेतला."
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_________________________________________
१६५७-
"त्याचे नजीक सूरगड आहे,तोही घेतला"
-श्रीशिवदिग्विजय बखर
_________________________________________
१६५७-
"त्या लागत्यानी प्रांत जो होता,तो अकर्षण केला.त्या प्रांती शामल हबसी ह्याचा रयतेस उपद्रव होईल,सबब बिरवाडीचा किल्ला नवाच करुन वसविला.
-श्रीशिवदिग्विजय बखर

"बिरवाडी सैदाची,मेट चांगले पाहून किल्ला केला"
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_________________________________________
१६५७-
"पेबचा किल्ला घेतला"
-मल्हार रामराव चिटणिस बखर

वरील बखरींतील उल्लेखांनुसार महाराजांनी सोंढवळकर व कोटवळकर यांच्या मदतीने सिद्द्यांकडून तळगड व घोसाळगड किल्ले घेतले.तसेच पुढे त्याच परिसरातील सूरगड व बिरवाडीचे किल्ले घेतल्याचे उल्लेख बखरींत आहेत.
वरील बखरी ह्या जरी तात्कालीन कालखंडानंतरच्या असतील तरी १६४८ हे साल व त्याकाळची महाराजांची परिस्थिती पाहता.महाराज तेवढे स्थिर स्थावर नव्हते व तेवढा सैन्य साठा ही महाराजांकडे नव्हता असे लक्षात येते.

वरील माहीती वरुन असे निदर्शनास येते की,महाराजांनी हे गड १६४८ नाही तर १६५७ मध्ये घेतलेले आहेत.तरी नेटवरील हे चुकीचे उल्लेख व भौगोलिक चुकीची दिलेली माहीती त्वरीत काढावी वा अपडेट करावी अशी विनंती करतो.
(टिप-फक्त दोनच फोटो उदारहणादाखल दिलेले आहेत.खुप ठिकाणी अशा प्रकारचे उल्लेख आहेत.)
-नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी