किल्ले सुधागड स्थलदर्शन-नवनाथ आहेर


*किल्ले सुधागड भौगोलिक व स्थलदर्शनात्मक माहीती*


किल्ले सुधागड भौगोलिक:-

             व्यापार हा नेहमी सुरक्षित व सोईस्कर मार्गांच्या आणि संपन्न बाजार पेठांच्या शोधात असतो ही खुष्कीचे बहुतांशी मार्ग हे अनेक सत्ताधिशांच्या वाढत्या बलामुळे बंद झाल्याने हिंदुस्थानचा व्यापार हा सर्व पश्चिम सागर किनार्याकडे वळू लागला.पहिली सत्तेची केंद्रे हि जो पर्यंत उत्तरेत होती तो पर्यंत व्यापार हा गुजरातेतील भडोच बंदराच्या जवळ केंद्रित होऊन भडोच(भरुच) बंदराची भरभराट झाली.मात्र पुढे भारताच्या सत्तेचे केंद्र हे सातवाहनांनी दक्षिणपथांत स्थापन केले.त्यामुळे,अर्थातच व्यापार हा पश्चिम सागर किनार्याकडे लोटला गेला व सोपारा,कल्याण,चौल हि बंदरे भरभराटीस आली.चौलच्या उत्तरेस अंबा व दक्षिणेस कुंडलिका या नद्यांची उगमस्थाने आहेत.सोपार्याहून कल्याण मुरबाडमार्गे नाणें घाटांतून जुन्नर नाशिक पर्यंत आणि चौल पासून कोकण दरवाजामार्गे कार्ल्याहून तगर व पैठण पर्यंत व्यापारी वाहतूक सुरु झाली.
          पुढे दक्षिणपथांत राजसत्ता काहीशी स्थिर स्थावर झाल्यावर व व्यापाराची केंद्रे पश्चिम सागरकिनार्याकडे स्थापित झाल्यावर सह्याद्रीतील या घाटवाटांचा वापर वाहतूकीसाठी होऊ लागला.सह्याद्रीत कोंकणातून घाटमाथ्यावर चढणार्या व तात्कालीन काळात वापरात असलेल्या असंख्य घाटवाटा आहेत.पुढे मागे हे मार्ग बळकट झाल्यावर या मार्गांवर लेण्यांची निर्मिती होऊ लागली.दुर्गांच्या निर्मितीचे लेणी हे पहिले पाऊल होय.व्यापारी,उदिमांच्या औदार्यांने बौद्ध भिक्षुकांसाठी उपजिविका वा ज्ञानसाधनेसाठी या लेण्यांची निर्मिती करण्यात आली.यातीलच ठाणाळे व खडसांबळे या लेण्या किल्ले सुधागड जवळ आहेत.पुढे बराच काळापर्यंत या घाटवाटांमार्गे हिंदुस्थानचा व्यापार चालू होता.दिवसेंदिवसांच्या प्रगतीतून या घाटवाटांच्या तोंडावर व पायथ्याला काही किल्ल्यांची निर्मिती झाली.व्यापाराचा व सत्तेचा विस्तार हे यामागिल मुख्य कारण होते.
         पुढे नद्यांच्या मार्गेही शक्य तितकी वाहतूक करता येत असे यातूनच नद्यांच्या दोहोबाजूंनी किल्ल्यांची निर्मिती झाली.अशीच या परिसरातील एक महत्वाची नदी म्हणजे कुंडलिका नदी होय.कुंडलिका नदिचा उगम हा ताम्हिणीच्या घाटात होतो.कुंडलिका नदी ही पुढे साळावच्या खाडीला मिळते म्हणजे रेवदांडा व चौल परिसरात.कुंडलिका नदीच्या उगमापासून अनुक्रमे  सुधागड, सरसगड, सूरगड,अवचितगड,बिरवाडीचा किल्ला,पुढे समुद्राच्या तोंडाला डाव्या बाजूला  कोर्लाई व उजव्या बाजूला रेवदांडा हे किल्ले आहेत.त्याच प्रमाणे या परिसरात सुधागड किल्ल्याच्या जवळ दोन महत्वाचे घाट आहेत जे वर तैलबैला किल्ल्याच्या परिसरात निघतात.ते म्हणजे सवाष्ण व वाघजाईचा घाट.चौल बंदरातून व अष्टागारातून उचललेला माल हा रोह्याच्या खाडी आदी मार्गे तो ज्या परिसरांत न्यायचा आहे त्याच्या जवळील घाट पाहून त्या घाटामार्गे मालाची वाहतूक केली जात असे.

पैकी बोर घाट(खंडाळा घाट) ते ताम्हिणी घाटापर्यंतच्या घाटवाटा पुढिल प्रमाणे.
 
घाटाचे नाव- पायथ्याचे गाव-टोकाचे गाव

बोर घाट-खोपोली-खंडाळा 
कुरवंडा- चावणी-कुरवंडे
आंबेनळी-घोटवडे-कुरवंडे/लोणावळा
पायमोडी(मोराडी)-माणगाव-आतवण
निसणी(सवघाट)-वासुंडे-पेठ शहापूर
कोराई/काठी-कळंब-आंबवणे
अनघाई-मुळशी/कळंब-माजगाव
सवाष्णीचा घाट-कोंडगाव-सालतर
वाघजाई घाट-ठाणाळे-तैलबैला
भोरप्याघाट-सुधागड-तैलबैला
नाणदांड घाट-पाच्छापूर-ऐकोले
नाळेची वाट-खडसंबळे-केवणी/एकोले
डेर्या घाट-नेणवली-घुटका
गाढवलोट घाट-नागशेत-हिर्डी/पिंपरी
सावळ घाट-भिरा-निवे
लेंड घाट-भिरा कँप-डोंगरवाडी
ताम्हिनी घाट-विळे-आधरवाडी/ताम्हिनी
सातपायरीचा घाट-विळे

 या घाटवाटा कोकणातून घाटावर चढत होत्या.यापैकी सवाष्णीचा घाट व वाघजाईचा घाट या दोन मार्गांचा रक्षक किल्ला व सुधागड तालुक्यावर आधिकार असणारा किल्ला म्हणजे भोरप उर्फ सुधागड होय.सुधागड अगदी पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सिमेलगत आहे. रायगड मधील तालुक्याचे नावही सुधागड-पाली तालुका असे आहे.भौगोलिक दृष्ट्या सुधागडच्या पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात.कारण, जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.
(टिप-ठाकूरवाडी(दर्यागाव) मार्गाने स्थलदर्शनास सुरुवात केलेली आहे.)

*बोकडशिल(बोकडशिडीचा) पहारा:-
     पाच्छापूर गावाकडून आपण ठाकूरवाडीत आल्यानंतर ठाकूरवाडीकडील मार्गाने जेव्हा गडचढाई चालू करतो.तेव्हा,काही अंतर चालून गेल्यानंतर आपल्याला पहिली लोखंडी शिडी लागते.त्यानंतर दुसरी लोखंडी शिडी लागते तेथे पुर्वी काही पहारे असण्याची शक्यता आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या मते हाच बोकडशिल पहारा असावा.खरे तर या जागेचे पुर्वीचे नाव 'बोकड शिडीचा' पहारा असे होते.पुढे त्याचा अपभ्रंश होऊन 'बोकशिल पहारा' असे नामकरण झाले असावे.याला कुठलेही पुरावे उपलब्ध नाही मात्र ज्याप्रमाणे गडाच्या दरवाजाच्या अगोदर 'मेट' असते व त्यावरील जे पहारे असतात त्याच प्रमाणे येथेही काही चौक्यांचे अवशेष आपल्याला दृष्टीस पडतात.दुसर्या लोखंडी शिडीवरुन पुढे गेल्यास उजव्या हाताला मोठा चौकीचा एक चौथरा आपल्याला आढळतो.

*पाच्छापूरकडील भग्न दिंडी दरवाजा:-
    बोकडशिडीचा पहारा ओलांडून पुढे आल्यानंतर आपल्याला दगडांमध्ये बांधलेल्या काही पायर्या लागतात.येथेच पुर्वी एक दरवाजा होता.कारण,चांगले निरखुन पाहिल्यास दरवाजाचे अवशेष आपल्या नजरेस पडतात.यावरुन असे लक्षात येते की गडास एक महादरवाजा व दुसरा हा ठाकूरवाडी(पाच्छापूर)कडील दरवाजा असे दोन प्रवेश मार्ग होते.

*पाच्छापूर कडील बुरुज:-
      पाच्छापूर दरवाजातून वर आल्यावर लगेचच उजव्या बाजूला वळाल्यावर आपल्याला एक भला थोरला बुरुज दिसतो.हा चिलखती प्रकारातील
बुरुज असून आजही चांगल्या अवस्थेत आहेत.बुरुजावर काही झाडे उगवलेली आहे.बा रायगड परिवाराकडून या झाडांवर योग्य ती प्रक्रिया करुन त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

*पश्चिमेकडील चिलखती बुरुज:-
      पाच्छापूरकडील बुरुज पाहून सरळ पुर्वेला चालत जाऊन थोड्या अंतरावर पश्चिमेकडे वळल्यास आपल्याला एक मोठा व प्रशस्त बुरुज दिसतो.हा हि चिलखती प्रकारचाच बुरुज आहे.चिलखतात उतरण्यासाठी बुरुजास एक छोटेखानी दरवाजा आहे.या बुुरुजावरुन ठाकूरवाडी,पाच्छापूर इत्यादी सर्व भागांवर नजर ठेवता येत होती.किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा बुरुज असल्याचे आपल्या लक्षात येते.

*पिण्याच्या पाण्याचे टाके:-
चिलखती बुरुज पाहून आपण पुन्हा मुख्य चढाई मार्गावर आल्यास आपल्याला डाव्या बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.या टाकीतील पाणि साधारणपणे मार्च एप्रिलपणे उपलब्ध असते.हे पाणि पिण्यास योग्य आहे.

*तळ्याचा महादेव:-
गड चढून वरती आल्यानंतर सर्व प्रथम दिसते ते तळ्याच्या शेजारील महादेवाचे मंदिर हे मंदिर अगदी काही वर्षांपुर्वी पुर्णपणे पडलेल्या स्थितीत होते.बा रायगड परिवार या संस्थेच्या सातत्याच्या संवर्धन कार्यातून या मंदिराचे पुन्हा निर्माण केले आहे.

*कमळ तळे:-
या महादेवाच्या मंदिराच्या मागेच एक भले थोरले तळे आहे.त्यास कमळ तळे असे नामाभिधान आहे.येथे पुर्वी कमळे उगवत असावित कारण आजही पाऊस पडून गेल्याच्या नंतर काही कालखंडाने वाड्याच्या बाजूच्या छोट्या तळ्यात आजही आपल्याला कमळ उगविल्याचे दिसते.तात्कालिन कालखंडात याही तळ्यात मोठ्या प्रमाणात कमळे उगवत असावित म्हणूनच की काय यास कमळ तळे असे नाव पडले असावे.

*श्री सिद्धेश्वर:-
किल्ले सुधागडास अनेक वर्षापुर्वीचा इतिहास आहे.सुधागडावर अनेक हिंदू घराणी राज्य करत होती.त्यातीलच काही हिंदू सरदार/सैनिकांनी आपले क्षत्रिय दैवताची या ठिकाणी स्थापना केली.कालानुरुप काही शिवपिंडी या पुजेतून निषिद्ध झाल्याने नवनविन ठिकाणी मंदिरे उभारली गेली की काय या बद्दल मात्र निश्चित समजण्यास काही पुरावे नाहीत.गडावर एकूण तिन शिवमंदिरांचे अवशेष व त्याचे पुनर्बांधणी झालेली आहे.कमळ तळ्याच्या मागे म्हणजे सरसगडाच्या दिशेने चालत गेल्यास आपल्याला सिध्देश्वर मंदिराचे पुनर्बांधणी केलेले मंदिर दिसेल.हेच सिद्धेश्वर मंदिर होय.

*काही अपरिचित समाध्या:-
कमळ तळ्याच्या बंधार्याच्या उत्तरेस चालत गेल्यास बंधार्याच्या शेवटी काही समाध्या मातीत गाडलेल्या आम्हास आढळल्या.या समाध्या नक्की कुणाच्या या बाबतीत कळण्यास काही मार्ग नाही.मात्र बा रायगड परिवाराने या समाध्यांच्या आजूबाजूची माती काढून त्या मोकळ्या केल्या आहेत.तेथे एक दिवा लावण्यासाठीचा सोय असलेली एक शिळा आहे.ती कदाचित विरगळ असण्याचा जास्त शक्यता आहे.पण हाती पुरावे नसल्याने आत्ता त्याबाबत निश्चित विधान करने योग्य नाही.पण,पुढे मागे यावर ठोस असा अभ्यास करत या समाध्यांच्या बाबतीत माहिती प्रकाशित करण्यात येईल.

*धान्य कोठारे:-
या समाध्यांच्या पुढे गेल्यास अनेक भग्न वास्तूंचे चौथरे आपणांस दिसतात त्यात एक आयताकृती व भरभक्कम बांधणीचे एक धान्यकोठार आहे.कारण,पश्चिमेकडील या पठारावर बहुतांशी लोकवस्तीचा भाग होता हे येथील भग्न वाड्यांचे अवशेष व इतर गोष्टींवरुन लक्षात येते.

*ओंबळे बुरुंज:-
या धान्यकोठाराकडून आपण धोंडसे गावाकडे चालत गेल्यास आपणास पुढे एक भला थोरला बुरुज आपल्या नजरेस पडतो त्यास 'ओंबळे बुरुज' असे नाव आहे.या बुरुजाहून आपणास धोंडसे व समोरील आसमंत आपल्या पुप्ण नजरेस पडतो.

*पंत सचिवांचा वाडा:-
ओंबळे बुरुजाचे दर्शन करुन आपण पुन्हा माघारी फिरल्यास.आपण दहा ते पंधरा मिनिटाच एका चौसौफी वाड्याकडे येतो.सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती. तथापि श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने पुनर्बांधणीचे काम हाती घेतले.वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. पैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास उपयोगी ठरतात. एक खोली बंद असून त्यामध्ये विश्वस्त मंडळाचे सामान ठेवलेले असते. काही कार्यक्रम अथवा सण असल्यास ती वापरात येते. तर पहिल्या खोलीत बा रायगड परिवार या संस्थेने आपली संवर्धनाची औजारे,जेवणाचे साहित्य आदि वस्तू ठेवलेल्या आहेत.जेव्हा श्रमदान मोहिम असते तेव्हा या साहित्याचा वापर केला जातो.वाड्याच्या बाजूस एका छोट्या घरात वाड्याची देखभाल करणारी आज्जी राहते. ही वयस्क असली तरी पूर्ण वाड्यात शेण सारावण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते.त्याचप्रमाणे बा रायगड परिवारास वाड्याच्या आवारात व अन्य ठिकाणी ज्या काही पुरातन वस्तू मिळाल्या आहेत.त्या सर्व वस्तू वाड्यात एका कोपर्यात ठेवण्यात आल्या आहे.आता येणार्या काही दिवसात वाड्याचे पुन्हा संवर्धन करण्यात येणार आहे.त्यात अनेक गोष्टी अंतर्भुत आहेत.येणार्या दुर्गप्रेमींसाठी अत्यंत हक्काचा निवारा व आरामाची जागा आहे.तेव्हा वाड्याची स्वच्छता हि प्रत्येकाने ठेवली पाहिजे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.नवरात्रीत भोराईदेवीच्या यात्रेच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रमदान केले जाते.त्यासाठी येथे जेवण बनविण्याच्या दगडातील चुलही बनविण्यात आल्या आहेत.

*पिण्याच्या पाण्याची टाकी:-
पंत सचिवांच्या वाड्याच्या जवळ तीन मोठी टाकी असून ती मुख्य पाण्याचा स्त्रोत आहेत. एक टाके ३५ x २५ फूट आहे तर दोन जोडलेली टाकी १५ x २५ फुटाची आहेत. २००८ आणि २००९ साली क्षितीज आणि दुर्गमित्र या संस्थांनी ही २ टाकी पूर्ण साफ केली. पालीवाला महाविद्यालयातील प्राध्यापक सुधीर पुराणिक तसेच पाच्छापूरवासीय श्री भुस्कुटे यांचे बहुमोल सहाय्य लाभले.त्याचप्रमाणे २०१९ मध्ये बा रायगड परिवार या संस्थेने पुन्हा एकदा यातील दर्यागावाकडील पाण्याचे टाके उन्हाळ्यात पुर्ण पाणि काढून तसेच त्यातील चिखल काढून साफ केलेले आहे.

*बांधीव टाकी:-
या तीन टाक्यांच्या समोर टकमक टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजून २ ते ३ टाकी आहेत, जी सुकलेली आहेत. 

*चोर वाट(अपात्कालीन मार्ग):-
पंत सचिवांच्या वाड्यातून भोराई मंदिराकडे जाताना पायर्या संपल्यावर लगेच.येथे बा रायगड परिवाराने दिशादर्शक फलक लावलेला आहे.तेथून
डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटेने खाली उताराने खाली उतरतो. पायवाट उतरून डावीकडे गेलो की बुरुजातून छोट्या दरवाजातून वाकून खाली जाता येते.या ठिकाणाहून आजही धोंडसे गावाच्या मार्गाकडे जाता येते.यात्रेच्या वेळी स्थानिक माहितगार मुले या ठिकाणाहून वर आल्याचे आम्ही पाहिलेले आहे.हा किल्ल्यावर काही अपात्कालीन घटना घडल्यास येथून गडाखाली उतरुन सुरक्षित स्थळी जाण्याचा हा मार्ग होता.दरवाजातून पुन्हा वर येऊन उजवीकडे वळल्यास आपण काही पायऱ्या उतरून सलग तटबंदीवरून चालत अगदी महादरवाजाच्या टोकापाशी पोचतो.ट्रेकक्षितीज व बा रायगड परिवार या संस्थेने काही काळ श्रमदान करून येथील पायऱ्या साफ केल्या आहेत येथील हा पायरीमार्ग पुर्णत: झाडोर्याच्या विळख्यात झाकला होता.ती झाडी झुडपे साफ करुन पुन्हा एकदा हा मार्ग मोकळा केलेला आहे.

*शिवमंदिर:-
चोरदिंडी पाहून पुन्हा वर आल्यास याच रस्त्याच्या विरुद्ध बाजूला एक रस्ता जातो.हा रस्ता वाड्याच्या मागे जातो.वाड्याच्या मागील बाजूस एक शिवमंदिर आहे. येथे आपल्याला अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या आसपास जंगलात काही अवशेष आढळून येतात. तसेच मंदिराच्या आणि वाड्याच्या मध्ये एक चौकोनी आकाराची विहीर आहे.या विहिरीच्या बाबतीत एक अख्यायिकाही आहे की हे एक भुयार आहे व हे भुयार गडाच्या बाहेर निघते.पण हे कुणी पाहिलेले नाही व त्याबाबत असे काही ठोस पुरावेही नाहीत.बहुतांशी प्रमाणात हि विहिर गाडलेली आहे.

*गजलक्ष्मी शिल्प:-
आता आपण भोराईदेवीच्या मंदिराच्या दिशेने फरसबंदी मार्गाने चालत गेल्यास आपल्याला भोराई देवी मंदिराच्या अगोदर डाव्या बाजूस एक गजलक्ष्मी शिल्प आढळते.त्याबद्दल माहीती:-
*गजलक्ष्मी शिल्प:-
मध्यवर्ती कमळावर विराजमान झालेली चतुर्भुज माता लक्ष्मी आणि तिच्या उजवीकडे अन् डावीकडे उदककलश सोंडेमध्ये घेऊन (मातेवर जलाभिषेक करण्यासाठी) उभे असलेले हत्ती असे या शिल्पाचे स्वरूप असते. देवी लक्ष्मीच्या दोन हातांत कमळ, उजवीकडील हात अभय मुद्रेत तर डाव्या हातातील कलशातून पडणारे सुवर्ण दाखविले जाते.
पुराणांत आपल्या पृथ्वीला लक्ष्मी माता संबोधले आहे. हत्ती हे पर्जन्याचे संबोधक आहेत तर कमळ हे अत्यंत पवित्रपुष्प समजले जाते. ग्रीष्म ऋतूत पूर्ण पृथ्वी उन्हाच्या ज्वाळांनी तप्त झालेली असते आणि तिलाच हरित करण्यासाठी आणि धरणीवरील जीवनात नवचैतन्य येण्यासाठी पर्जन्यवर्षाव होत असतो, त्याचीच आखणी या शिल्पात केलेली आहे. अशी ही गजलक्ष्मी समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक मानली जाते.बा रायगड परिवाराने या शिल्पावर एक छोटेखानी मंदिर उभारले आहे.

*भोराई मंदिर
सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत 'भोराईचा डोंगर' म्हणूनच ओळखतात. वाड्यापासून झाडीतून जाणाऱ्या वाटेने आपण भोराईच्या मंदिरापाशी येतो. सुंदर आणि ऐसपैस असलेल्या देवळातील भोराई देवीची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. भोराई देवीचे दर्शन घेण्यास अनेक भाविक येतात. नवरात्रीच्या जत्रेत तर भाविकांचा ओघ असतो. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती कोरला आहे, जणू त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवली आहे.हे एक अद्वितीय असे शिल्प आहे.

*भोराईदेवी मंदिरातील घंटा:-
पुर्वाभिमुख असलेल्या या देवालयातील प्रवेशद्वाराजवळील मोठ्या आकाराची,भगवा रंग असलेली एक पोर्तुगिज बनावटीची घंटा आहे सुस्थितीत असून ती आजही वापरात आहे.घंटेच्या आतिल भागात दोलक(लोलक) नाही.घंटेच्या डाव्या बाजूला अडकविण्यात आलेल्या लोखंडी दांडीने घंटा वाजविण्यात येते.श्री भोराई देवीच्या देवालयातील पोर्तुगिज घंटेवर कोणत्याही प्रकारचा लेख,सालाचा आकडा किंवा क्रॉसचे धर्मचिन्ह नाही.वसईला १७३९ ला जी पोर्तुगिजांसोबतची लढाई त्या लढाईच्या विजयार्थ पोर्तुगिज बनावटीच्या ३५ घंटा चिमाजी आप्पांनी वेगवेगळ्या मंदिरात बांधलेल्या आहेत.त्याच प्रकारातील हि घंटा असावी असा अंदाज आहे.मात्र यास ठोस पुरावे व काही लेख उपलब्ध नाही.



*भोराई मंदिर परिसरातील वीरगळ:-
भोराई देवीच्या मंदिराच्या आवारात दोन वर्षापुर्वी अनेक वीरगळ अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते.बा रायगड परिवाराने सातत्याच्या संवर्धनाने त्यांना योग्य ठिकाणी स्थानापन्न केले आहे.येत्या काळात एक चौथरा बांधून त्यावर वीरगळ ठेवून त्यास एक पत्र्याचे शेड निवारा म्हणून करण्यात येणार आहे.
वीरगळबाबत महत्वाची माहिती-
       लढाई मध्ये मरण पावलेल्या व्यक्तींची दगडी शिल्प स्मारके म्हणजे वीरगळ होय.तर,पती मरण पावल्या नंतर सती गेलेल्या पत्नीची दगडी शिल्प स्मारक म्हणजे सतीशिळा होय. सुधागड वर हे दोन्ही शिल्पे आढळतात. तसेच काही शिल्पांत वीरगळ व सतीशिळा या एकत्रित एकाच दगडात दाखवले आहेत. वीरगळ शिल्पात सर्वांत खाली युध्द प्रसंग दाखवतात व त्यावर विरास अप्सरा स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग दाखवलेला असतो. सर्वांत वर विराचे आराध्य दैवताचे पूजन करताना वीर दाखवतात. सतीशिला शिल्पात सर्वांत खाली वीर मरण पावलेला दाखवतात त्यासोबत काही वेळा पत्नी दाखवतात. त्यावरील प्रसंगात ती स्त्रीची सती जाण्या अगोदर घोड्यावरील मिरवणुक दाखवतात व सर्वांत वर तिच्या आराध्य दैवताची पूजा करताना दाखवतात. आणि महत्वाचे म्हणजे या शिल्पात त्या स्त्री चा हात हात कोपरा पासून दुमडलेला दाखवतात यावरून हे सतीशिळा शिल्प आहे हे निश्चित होत. सुधागड वर वीरगळ हा वाघाशी लढताना मरण पावलेल्या विराचा आहे. तर एक वीरगळ वीरबळी दिलेल्या व्यक्तीचा आहे.अशा अनेक प्रकारचे वीरगळ याठिकाणी आहेत.

*हनुमान मंदिर:-
हनुमान हि देवता शक्तीची देवता म्हणून आपल्या पुजेत पुजनिय आहे.एखाद्या अडचण व एकांत ठिकाणी या देवतेची स्थापना केली जाते.सुधागडावरही हनुमान या देवतेची स्थापना केलेली आहे.भोराईदेवीच्या मंदिराच्या समोरच उजव्या बाजूस हनुमानाचे मंदिर आहे.

*विशाल कोठारे(दारुगोळा कोठार):-
भोराई मंदिराकडून टकमक टोकाकडे जाताना चार विशाल कोठारे दिसतात. हे नेमके कुठले कोठार असावे याचे उल्लेख आढळत नाही, पण दुर्गस्थापत्याचा निट अभ्यास केल्यास असे लक्षात येते की लोकवस्तीपासून लांब अंतरावर दारुगोळ्याची कोठारे असतात.चारही कोठारे समान आकाराची असून त्यांच्यातले अंतरही सारखे आहे. अंदाजे ५ मी रुंद आणि २३ मी लांब अशी ही कोठारे सर्व बाजूने बंद आहेत, फक्त एका बाजूने द्वार आहे. तर बाहेरील चौथरा १२ मी रुंद आणि ४० मी लांब आहे. दोन कोठारांमधील अंतर अंदाजे ७ मी आहे.

*टकमक टोक व बोलते कडे:-
आपण याच दारुगोळा कोठारांकडून मागे आणखी पुढे चालत गेल्यास आपइ पुढे टकमक टोकावर येऊन पोहोचतो.हेच टोक आपल्याला दर्यागावातून चढू लागलो की उजव्या बाजूस कड्याचे टोक दिसतात. हे रायगडाच्या टकमक टोकासारखे दिसते म्हणून यास टकमक असे नाव आहे. तसेच येथे एक प्रचंड मोठी घळ आहे या घळीत आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येतो म्हणून याला बोलते कडे असेही म्हणतात.

*पूर्वेकडील बुरुज:-
भोराई मंदिरावरून महादरवाजा कडे जाताना उजवीकडे जंगलात एक छोटीशी पायवाट जाते. काळजीपूर्वक(येथे बा रायगड परिवाराने दिशादर्शक फलक लावलेला आहे) या वाटेचा मागोवा घेत आपण एका टेकाडापाशी पोचतो.हि पूर्वेकडील बाजू असून येथे पुढे चालत आलो की गडावरील सर्वात मोठा बुरुज आपल्याला आढळतो. हा बुरुज घनगड कडे तोंड करून उभा आहे, आणि थोड्या खालच्या टप्प्यावर आहे. काळजी घेतली तर येथे उतरून हा बुरुज नीट पाहता येतो.हा चिलखती प्रकारचा बुरुज आहे.

*महादरवाजा:-

   'दरवाजा' हे गडाचे मुख्य व दर्शनिय अंग.दरवाजाच्या रचनेवर त्या राजसत्तेच्या वैभवाचे अकलन होत असे.म्हणूनच,दरवाजाच्या दर्शनी भागावर कमळ,शरभ,गजलक्ष्मी,गंडभेरुड,धान्याचे 
 कणिस आदि शक्तिदर्शक व समृद्धीदर्शक शिल्पांची स्थापना आपणांस गडांवर पहावयास मिळते.किल्ले सुधागडाचा हा मुख्य म्हणजेच महा दरवाजा होय.राजधानी रायगडाच्या महादरवाजाशी साधर्म्य दाखवणारा.रायगडा प्रमाणेच याही दरवाजाची बांधणी हि "गोमुखी" पद्धतीची आहे.दोन महाकाय बुरुजांमध्ये अलगद लपवलेला हा दरवाजा आहे.या दरवाजाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा दरवाजा पुर्ण पणे कातळात कोरलेला आहे.या दरवाजाची रुंदी ८.५ फुट तसेच उंची हि १५ फुट आहे.रायगडाच्या महादरवाजापेक्षा हि उंची फक्त ६ इंचाने कमी आहे.आपल्या हिंदू धर्मात कमळ पुजनिय आहे. त्यामुळे ते दरवाजाच्या दर्शनी भागावर कोरले जाते.त्याच प्रमाणे या ही दरवाजावर दोन सुबक कमळे कोरलेली आहेत.त्याच प्रमाणे दोन शरभांची शिल्पे कोरलेली आहेत.शरभ हा एक काल्पनिक महाकाय प्राणि असून. शरभ म्हणजे त्या गडावर राज्य करणारा शासनकर्ता राजा व त्याने पायात पंजाने पकडलेले हत्ती म्हणजे, इतर प्रतिस्पर्धी शाह्या आहेत.त्यांच्यावर विजय मिळवून आनंदाने या सबंध परिसरावर तो शासनकर्ता राज्य करतो आहे.असा त्याचा अर्थ होतो.त्याच प्रमाणे महादरवाजावर वरच्या बाजूस सुबक कमान आहे.दरवाजाची महिरप तसेच, पाण्याचा निचरा होण्यासाठी छान योजना तसेच रात्रीच्या पहार्यासाठी मशाली, पलुते अडकविण्याची सोय आहे.दरवाजाच्या उंबर्यातून पाणी जाण्यासाठीची योजना केलेली आहे.या दरवाजातील हा मार्ग पुढे धोंडसे गावात जातो.बर्याच अंतरापर्यंत पायर्यांचे अवशेष दिसतात. सर्वभक्षी काळाच्या ओघात व वरील पाणलोट क्षेत्राने या पायर्या वाहून गेल्या आहेत.वरील पाणलोट क्षेत्राने हा महादरवाजा पुर्णपणे मातीत गाडला गेला होता.१९८७ च्या आसपास निसर्गमित्र संस्थेने येथे ३ वर्ष काम करून येथी बहुतांश माती काढली.पण पुन्हा ती साचल्यामुळे र संस्थेने दुर्गामित्र, पालीवाला कॉलेज चे विद्यार्थी, निसर्गमित्र तसेच गिरीमित्र प्रतिष्ठान या संस्थांबरोबर २००३ ते २००८ या काळात हे माती साफ केली.उर्वरीत व पुन्हा साचलेली माती बा रायगड परिवाराने पुर्णत: काढून आजमितीस दरवाजाच्या आतिल बाजू पुर्णपणे साफ केली आहे.तसेच बा  रायगड परिवार या संस्थेने या महादरवाजास १९ फेब्रुवारी २०२० रोजी कवाडेही बसविली आहेत.

*महादरवाजा परिसर:-
महादरवाजा परिसर हा विस्तृत असून येथे तटबंदीच्या बाजूने फिरता येते. डावीकडील बाजूने फिरत गेल्यास आपण झाडाझुडपातून भोराईच्या पाठाराकडे येतो. तसेच उजवीकडील वाट बंद असून ती पूर्व बुरुजाकडे जाऊन मिळते. 

*महादरवाजा ते धोंडसे गाव मार्ग:-
महादरवाजातून खाली उतरलो की अजून आपल्याला आजून  दोन दरवाजे दिसतात.गडाचा महादरवाजा हा क्विचितच आपल्याला थेट पहावयास मिळतो.पण बहुतांशी गडांवर महादरवाजाच्या आधी म्यान दरवाजा पहावयास मिळतात.असाच प्रकार येथेही आहे.यायदोन पैकी एक म्यान दरवाजा व एक परवानगी दरवाजा असावा.या बाबत कुठे लिखित असे नाही हे मी तर्कशास्त्राच्या व दुर्गस्थापत्यशास्त्राच्या आधारे येथे नमुद केले आहे. आज मितीस या ठिकाणी खूप पडझड झाली असून एक दरवाजा जवळ जवळ नष्ट झाला आहे.


*कातळात कोरलेली टाकी:-
धोंडसे मार्गावरून खाली जाताना/येताना आपल्याला दोन ठिकाणी सातवाहनकालीन दगडात कोरलेली पाण्याची टाकी आढळतात. पैकी एका टाक्याच्या इकडे कोरलेले सैनिकाचे प्रतिक आहे, ते तानाजी टाके.यांस तानाजी टाके हे नामाभिधान का आहे हे कळण्यास काही मार्ग नाही.किल्ले सुधागडच्या रक्षणार्थ लढता झालेला हा तानाजी नामक वीर नेमका कोणता याबाबत येणार्या कालखंडात आम्ही योग्य तो अभ्यास व तर्कशास्त्राच्या आधारे याचा योग्य तो तपास करण्यास कटिबद्ध आहोत आणि दुसरे हनुमान टाके. या टाक्यांमधील पाणी स्वच्छ आणि थंडगार आहे.

पुढे हा मार्ग धोंडसे गावात जातो.त्याचप्रमाणे ठाणाळे व खांडसांबळे लेणी,वाघजाई व सवाष्ण घाट,तैल बैला किल्ला व घनगड किल्ल्याकडेही वाटा जातात.

-नवनाथ आहेर


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी