लेणी-स.आ.जोगळकर८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
______सह्याद्रीत असंख्य लेणी आहेत.काहींची पडझड झालेली आहे, काही अर्धवट सोडून दिलेली आहेत. काही केवळ खडकाच्या अंतर्भागाची चाचपणी करण्यासाठी खोदलेली आहेत.खर तर नुसत्या लेण्या हा एकच विषय घेतला तर अर्धा जन्म पुरणार नाही इतका सुक्ष्म अभ्यास आहे.अशाच या महाराष्ट्रातील लेणी समुहातील हि 'कार्ले' लेणी 'आई एकवीरा' देवीचे स्थान म्हणून हे आपल्या देशी सर्वांना माहीती आहेच.लोणावळे गटांत एकूण मुख्य चार लेण्या कोंडाणे,भाजें,बेडसें,कार्ले. पैकी कोंडाणे व भाजें लेण्यांचे काळानुसार स्थान पहिले.
प्रस्थर(दगडी) स्तंभांची प्रथा आपल्याकडेच काय अगदी सगळीकडेच जुनी आहे.असीरिया व बाबीलोन या देशांत अशा स्तंभांची पूजा करण्यात येत असे.ग्रीस देशांत त्यांवर धर्माज्ञा खोदण्यांत येत असत.सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्याच्या मूल प्रदेशांत व पवित्र क्षेत्रे दर्शविण्यासाठी व विशेष महत्वाच्या स्तूपांसमोर सुमारे तीस प्रचण्ड एकसंधी प्रस्तर स्तंभ उभारले.सिंह,हत्ती किंवा त्यांच्या चौकडा, त्यावर क्वचित धर्मचक्र,त्रिरत्न अशी धर्मिक प्रतीकें खोदलेले प्रस्तर त्यांच्या त्यांच्या अग्रांवर बसविलेले आहेत.सारनाथ येथील स्तंभशिर्ष हे स्वतंत्र्य भारताचे मानचिन्ह मानण्यात आलेले आहे.भारतीय स्तापत्य व शिल्प कृत्यांत हे स्तंभ व त्यावरील मूर्ती यांना अग्रस्थान आहे.हा स्तंभ अंदाजे पंचेचाळीस फुट उंचीचा आहे.बैठक वर्तुळाकार असून अंग सोळा कोनी आहे.अग्रभागी वाटोळा कंगोरेदार कळस असून त्यावर चौकोनी हर्मिका आहे.या बैठकीला पाठीला पाठ लावून उकिडवे बसलेले चार सिंह आहेत.महारथी अग्निमित्रनक याने हा स्तंभ खोदविला असा त्यावर उल्लेख आहे.
कार्ले येथील चैत्य सर्व बौद्ध चैत्यांत विस्तिर्ण व उत्तुंग आहे.येथे ऐश्वर्य आहे.डामडौल नाही.येथे अभिजात कला आहे,ओसंडती कृत्रीमता नाही.कौशल्याचे प्रदर्शन नाही,मुर्तींची गर्दी नाही.धर्म प्रवर्तकांची अग्रही टोचणी नाही,स्वसंतुष्ठतेचा बडिवार नाही!
वस्तूत: स्तूप हे मृत्यूचे प्रतिक,पण येथे तें जीवनाची प्रेरणा देतें.वैजयंतीचा भूतपाल सेठी हा या लेण्याचा निर्माता.हे लेणें जम्बुद्विपांत अद्वीतीय आहे असें त्याने येथील आपल्या लेखांत नमूद केलें आहे.तेच खरे आहे.या पूर्वी शिल्पकारांनी अनेक लेणीं खोदली न या नंतरही,पण या सारखे हेच, याला जोड नाही,त्याला तोड नाही!
-सह्याद्री
(स. आ. जोगळेकर)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा